आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुरंदरे यांना जाहीर झालेल्या पुरस्कारावरून मनसे राष्ट्रवादीचे पुतळ्यांचे फाशी दहन नाट्य

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना जाहीर झालेल्या महाराष्ट्र भूषण पुरस्कारावरून परस्पर विरोधी मते मांडली जात आहेत. त्याचे पडसाद मंगळवारी नगर शहरात उमटले. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे दिल्ली गेट वेशीला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला फाशी देऊन आंदोलन केले. त्याला प्रत्त्युत्तर देताना राष्ट्रवादीने माळीवाडा वेशीजवळ मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन केले.
पुरंदरे यांना दिल्या जाणाऱ्या पुरस्कारावरून शहरात सकाळपासूनच वादंग सुरू होते. संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी पुरस्काराला विरोध करीत पालकमंत्री राम शिंदे यांचे संपर्क कार्यालय फोडले. त्यानंतर मनसे पदाधिकारी कार्यकर्त्यांनी पुरंदरे यांच्या विरोधात वक्तव्य करणारे माजी मंत्री पवार यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला दुपारी साडेतीनच्या सुमारास दिल्ली गेट वेशीला लटकवून फाशी दिली. यावेळी पदाधिकारी सचिन डफळ, शिरिष जाधव, नितीन भुतारे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. जोरदार घोषणाबाजी केल्यानंतर मनसेचे कार्यकर्ते निघून गेले.
त्यानंतर सायंकाळी साडेपाचच्या सुमारास राष्ट्रवादीचे पदाधिकारी कार्यकर्ते माळीवाडा वेशीजवळ जमले. पोलिसांना चकवा देत, घोषणा करत ठाकरे यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन केले. यावेळी आमदार संग्राम जगताप, महापौर अभिषेक कळमकर, अविनाश घुले, अभिजित खोसे, विपूल शेटिया, अड. शारदा लगड, विजय गव्हाळे, समद खान उपस्थित होते.