आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • MNS News In Marathi, Divya Marathi, Narendra Modi, Raj Thackeray, Nagar

राज ठाकरेंना जिल्ह्यातून बळ मिळण्याची शक्यता धूसर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - नरेंद्र मोदी यांनी मिळवलेल्या अभूतपूर्व यशानंतर मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी त्यांच्या पावलावर पाऊल टाकत निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचा निर्णय जाहीर केला. त्यामुळे पक्षाच्या जिल्ह्यातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला आहे. मात्र, हा उत्साह पक्षाला जिल्ह्यात आमदार मिळवून देण्याची शक्यता धूसर आहे.

राज ठाकरे यांच्या घोषणेचे नगरमध्ये सकारात्मक पडसाद उमटले आहेत. पक्षाच्या स्थापनेपासून जिल्ह्यात मनसे सक्रिय आहे. मात्र, या पक्षाला दखल घेण्याजोगी कामगिरी अजून करता आलेली नाही. गेल्यावेळी पक्षाने प्रस्थापित राजकारण्यांविरुद्ध उमेदवार देण्याचे टाळले होते. जिल्ह्यातील बारापैकी सहा जागांवर मनसेचे उमेदवार लढले. मात्र, एकाही उमेदवाराला अनामत रक्कम वाचवता आली नाही. युतीच्या मताधिक्यावर मनसेचा काडीमात्र परिणाम जाणवला नाही. संगमनेर, शिर्डी, अकोले, श्रीगोंदे, नेवासे व श्रीरामपूर मतदारसंघात गेल्यावेळी मनसेने उमेदवार दिले नव्हते. नगर महापालिकेत चार नगरसेवकांचे बळ ही पक्षासाठी एकमेव जमेची बाजू आहे. विधानसभा निवडणुकीसाठी ही ताकद अपुरी आहे.

ठाकरे यांच्या निर्णयाचा फायदा होईल, असा दावा कार्यकर्ते व पदाधिका-यांकडून होत आहे. काही उत्साही कार्यकर्त्यांनी ठाकरे यांना नगरमधून निवडणूक लढवण्याचे निमंत्रण दिले आहे. तथापि, गेल्या पंचवीस वर्षांपासून शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या नगरमधून ठाकरे निवडणूक लढवण्याची जोखीम पत्करणे अशक्य आहे. पक्षाचे नेते वसंत फडके 14 जूनला अकोले व श्रीरामपूरचा दौरा करून आढावा घेणार आहेत. ठाकरे यांच्या राज्यव्यापी दौ-याची आखणी सध्या सुरू आहे. जिल्ह्यातील कार्यकर्ते, पदाधिकारी यांच्या भेटी ते या दौ-यात घेणार आहेत. त्यांच्या दौ-याचे वेळापत्रक अजून निश्चित झालेले नाही. या दौ-यातच उमेदवार निश्चित होण्याची शक्यता आहे. नाशिक जिल्ह्यात मनसेला बळकटी मिळाली असताना नगरमध्ये पक्ष कमजोर आहे. ठाकरेंचा करिष्मा काम करेल अशी आशा कार्यकर्त्यांना आहे. मात्र, संपर्क व कार्यकर्त्यांची बांधणी असणारा एकही नेता सध्या मनसेकडे नाही.

मनसे विद्यार्थी सेनेची स्वाक्षरी मोहीम
ठाकरे यांनी नगरमधून निवडणूक लढवावी, या मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना स्वाक्षरीची मोहीम हाती घेणार आहे. दोन लाख स्वाक्ष-यांचे संकलन करून त्याचा अहवाल ठाकरे यांना देण्यात येणार आहे, असे शहराध्यक्ष सुमीत वर्मा यांनी सांगितले.

ठाकरे घेणार कार्यकर्त्यांच्या भेटी
ठाकरे यांच्या निर्णयामुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आहे. त्याचा परिणाम निवडणुकीत निश्चित दिसेल. 8 दिवसांत ठाकरेंच्या दौ-याचे नियोजन पूर्ण होणार आहे. या दौ-यात ते जिल्ह्यातील कार्यकर्ते व पदाधिका-यांच्या गाठीभेटी घेतील.’’ सचिन डफळ, जिल्हा संघटक, मनसे.

नगर शहरात चित्र पालटेल...
युवा वर्गाला राज ठाकरे यांचे अधिक आकर्षण आहे. त्यांच्या प्रतिमेचाही निवडणुकीत खूप फायदा होईल. नगर शहर व जिल्ह्यात पक्षाला चांगले वातावरण आहे. किमान नगर शहरातील चित्र यावेळी पालटलेले दिसेल.’’ वसंत लोढा, ज्येष्ठ नेता, मनसे