आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Mns Support Ncp congress In Municipal Corporation Nagar

मनसेचे चार नगरसेवक अखेर आघाडीबरोबरच

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर - मनसेच्या चार नगरसेवकांनी शेवटी दोन्ही काँग्रेसच्या आघाडीबरोबर जाण्याचा निर्णय मनसेचे संपर्कप्रमुख संतोष धुरी यांनी शुक्रवारी जाहीर केला. विशेष म्हणजे मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्या वाहनावर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी दगडफेक केली होती. ती विसरून हा निर्णय घेण्यात आला. राज ठाकरे यांनी ‘इगो’ बाजूला ठेवून विकासासाठी आघाडीसोबत जाण्याचा निर्णय घेतल्याचा दावा धुरी यांनी केला.

राज यांच्या वाहनावर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी आठ महिन्यांपूर्वी भिंगारमध्ये तुफान दगडफेक केली होती. उपमुख्यमंत्री अजित पवार व ठाकरे यांच्यामध्ये झालेल्या शाब्दिक युद्घाची ही परिणीती होती.

खुद्द ठाकरे यांच्या वाहनावर झालेली दगडफेक राज्यभर चर्चेचा विषय ठरली. त्यानंतर हा वाद चिघळला. मात्र, दोन्ही नेत्यांनीच माघार घेत कार्यकर्त्यांना आवरले. थेट पक्षाध्यक्षांच्या वाहनावर झालेली दगडफेक मनसेच्या जिव्हारी लागली. नगरकरांनी महापालिका निवडणुकीत त्रिशंकू कौल दिला. त्यामुळे मनसेच्या चार नगरसेवकांना सत्तास्थापनेत अधिक महत्त्व आले. युतीचे पुरस्कृत चार अपक्ष नगरसेवक निवडून आल्याने सत्तास्थापनेत आपलीच भूमिका महत्त्वाची असल्याच्या हवेत मनसेचे पदाधिकारी होते. मात्र, राष्ट्रवादीने युतीचे पुरस्कृत उमेदवार पळवण्यात यश मिळवले व आपसूकच मनसेची भूमिका दुय्यम ठरली. भिंगारच्या घटनेमुळेच आघाडीला पाठिंबा देण्याबाबतचा निर्णय घेण्यास मनसेला विलंब झाला.

सोमवारी (30 डिसेंबर) होणार्‍या महापौर व उपमहापौरपदाच्या निवडणुकीत पक्षाची भूमिका स्पष्ट करण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत धुरी यांनी राष्ट्रवादीसोबत जाण्याबाबत सारवासारव केली. सत्तेसोबत गेल्याने विकासाला चालना मिळणार आहे. त्यामुळेच राज ठाकरे यांनी ‘इगो’ बाजूला ठेवून आघाडीला पाठिंबा देण्यास समर्थन दिल्याचे धुरी म्हणाले. मात्र, गेली पाच वर्षे मनसे सत्तेसोबत असतानाही विकास का झाला नाही? या प्रश्नावर मागचा इतिहास माहिती नसल्याचे सांगत त्यांनी माघार घेतली. विकासाबाबत नवनियुक्त नगरसेवकांना प्रशिक्षण देण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. प्रयत्न करूनही पक्षाला निवडणुकीत अपेक्षित यश आले नाही. उमेदवारी निश्चित करण्यात चुका झाल्या असतील, अशी कबुलीही त्यांनी दिली. नवनियुक्त नगरसेवक गटनोंदणीसाठी नाशिकला गेल्याने ते अनुपस्थित होते, तर प्रमुख पदाधिकारीही पत्रकार परिषदेला उपस्थित नव्हते. शहर संघटक सचिन डफळ, सतीश मैड, अनिता दिघे या वेळी उपस्थित होत्या.

निर्णयापूर्वीच मनसेचे नगरसेवक आघाडीकडे
मनसेचे दोन नगरसेवक आघाडीच्या गळाला लागले होते. या नगरसेवकांच्या बळावरच राष्ट्रवादीने महापौरपदाचा उमेदवार जाहीर करण्यासाठी घेतलेल्या पत्रकार परिषदेत मनसे आमच्यासोबतच असल्याचे सांगितले होते. वरिष्ठ पातळीवर कोणताही निर्णय झाला तरी मनसेचे नगरसेवक आमच्यासोबत असल्याचा राष्ट्रवादीच्या दाव्यावर शुक्रवारी धुरी यांनी शिक्कामोर्तब केले.

पद न मिळाल्यास पाठिंबा काढणार नाही
सन्मानाने पद मिळवण्याची संधी असताना निर्णय घेण्यास विलंब झाल्याने मनसेला पदासाठी आघाडीच्या मागे जाण्याची वेळ आली आहे. पदाबाबत राष्ट्रवादीचे आमदार अरुण जगताप यांच्यासोबत चर्चा सुरू असल्याचे धुरी म्हणाले. पद न मिळाल्यास पाठिंबा काढणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले, तर पाच वर्षांसाठी पाठिंबा दिल्याचेही धुरी यांचे म्हणणे आहे.

स्थायी समितीसाठी प्रयत्न
आमदार अरुण जगताप यांनी शुक्रवारी सकाळी धुरी यांची भेट घेऊन चर्चा केली. स्वीकृत नगरसेवकपदावर पाणी सोडण्याची तयारी मनसेकडून दाखवण्यात आली आहे. त्याऐवजी स्थायी समितीसोबत आणखी एखादी समिती मिळवण्याचा मनसेचा प्रयत्न आहे. स्विकृत नगरसेवक घेताना राष्ट्रवादीला साथ देण्याच्या बदल्यात स्थायी समितीचे सभापतिपद पदरात पडण्याची अपेक्षा मनसेला आहे.

कार्यकारिणीत फेरबदल
जिल्ह्यात विस्कळीत झालेले पक्षाचे संघटन सुरळीत करण्यात अधिक शक्ती खर्च करावी लागल्याचे धुरी या वेळी म्हणाले. जानेवारी किंवा फेब्रुवारी महिन्यात पक्षाच्या जिल्हा कार्यकारिणीत व्यापक फेरबदल करण्यात येणार आहेत. आगामी लोकसभा व त्यानंतर येणार्‍या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हे फेरबदल करण्यात येणार असल्याचे धुरी म्हणाले.