आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पन्नास मतदारसंघांचा ‘मॉडेल’ म्हणून विकास

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर- महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या केंद्र-राज्य योजना सनियंत्रण समितीच्या माध्यमातून योजनांचा प्रचार, प्रसार व अंमलबजावणीसाठी राज्यातील पन्नास विधानसभा मतदारसंघ मॉडेल म्हणून विकसित करण्यात येणार आहेत, अशी माहिती केंद्र-राज्य योजना सनियंत्रण समितीचे प्रदेशाध्यक्ष विनायक देशमुख यांनी रविवारी दिली.

वाढदिवसानिमित्त पत्रकारांशी वार्तालाप करताना देशमुख म्हणाले, केंद्र -राज्य योजना सनियंत्रण समितीने आगामी वर्षभरात हाती घ्यायच्या उपक्रमांच्या कृती आराखडा तयार केला असून प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांच्या उपस्थितीत मुंबईत नुकत्याच झालेल्या पदाधिकार्‍यांच्या राज्यस्तरीय बैठकीत या आराखड्यास मान्यता घेण्यात आली. पुढील आठवड्यात याबाबत मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याशी चर्चा होणार असून त्यानंतर हा आराखडा पक्षाध्यक्ष सोनिया गांधी, उपाध्यक्ष राहुल गांधी व महाराष्ट्राचे प्रभारी मोहन प्रकाश यांना सादर करण्यात येणार आहे.

महाराष्ट्रातील 288 विधानसभा मतदारसंघांपैकी ज्या मतदारसंघांत काँग्रेसचा वारंवार पराभव होतो, असे 50 मतदारसंघ निवडण्यात येऊन तेथे विशेष लक्ष केंद्रित करण्यात येईल. केंद्र व राज्य शासनाच्या योजनांची जास्तीत जास्त अंमलबजावणी या मतदारसंघात करण्यासाठी विशेष प्रयत्न केले जातील. प्रामुख्याने बेरोजगार युवक, महिला, मागासवर्गीय, आदिवासी, अल्पसंख्याक, ज्येष्ठ नागरिक यांच्यासाठी असलेल्या व्यक्तिगत लाभाच्या योजनांचा प्रचार व प्रसार, तसेच अंमलबजावणीसाठी विशेष कृती कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे, असे देशमुख यांनी सांगितले.

केंद्र-राज्य योजना सनियंत्रण समितीच्या माध्यमातून राज्यस्तरावर 20 पदाधिकार्‍यांची कार्यकारिणी कार्यरत असून राज्यातील सर्व म्हणजे 52 संघटनात्मक जिल्ह्यांमध्ये जिल्हाध्यक्ष, जिल्हा कार्यकारिणी व तालुका समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत, असे त्यांनी सांगितले.