आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘मॉडेल रस्ता’ मुदतीत पूर्ण होणे अशक्य

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर - शहरातील ‘मॉडेल रस्ता’ संबोधल्या गेलेल्या बालिकार्शम रस्त्याचे काम पुन्हा एकदा ठप्प झाले आहे. काम पूर्ण करण्यासाठी ठेकेदाराला दिलेल्या दीड वर्ष मुदतीतील एक वर्ष संपले असून आतापर्यंत केवळ 20 टक्के काम पूर्ण झाले आहे. त्यामुळे या रस्त्याची अवस्था ‘असून अडचण नसून खोळंबा’ अशी झाली आहे. उर्वरित सहा महिन्यांत 80 टक्के काम कसे पूर्ण होणार, असा प्रश्न नागरिक उपस्थित करत आहेत.

महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान योजनेंतर्गत मंजुरी मिळालेल्या बालिकार्शम रस्त्याचे प्रत्यक्ष काम सुरू होण्यासाठी तब्बल एक वर्ष प्रतीक्षा करावी लागली. 2 जानेवारी 2013 रोजी आमदार अनिल राठोड, आमदार राम शिंदे, महापौर शीला शिंदे आदींच्या उपस्थितीत मोठय़ा थाटात या कामाचे भूमिपूजन झाले होते. त्यानंतर सहा महिन्यांनी प्रत्यक्ष काम सुरू झाले. भूमिपूजन झाल्यानंतर एका वर्षात केवळ 20 टक्के काम पूर्ण झाले. त्यामुळे उर्वरित कामासाठी आणखी किती वर्षे लागतील, असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.

या रस्त्याचे रुंदीकरण, डांबरीकरण, काँक्रिटीकरण, ड्रेनेजलाइन, साईड गटार, फूटपाथ, व सुशोभीकरणासाठी सुमारे 20 कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत. काम पूर्ण झाल्यानंतर हा रस्ता शहरातील ‘मॉडेल रस्ता’ म्हणून ओळखला जाईल. पहिल्या टप्प्यात परिचय हॉटेल ते एस्सार पेट्रोलपंप या 500 मीटर रस्त्याचे काम सुरू करण्यात आले. त्यावरील 4 इंच जाडीचे काँक्रिटीकरण पूर्ण झाले, परंतु 32 सेंटीमीटर (एम 35) जाडीच्या काँक्रिटीकरणाचे अंतिम काम अपूर्ण आहे. आतापर्यंत 1 हजार 40 मीटर अंतरावरील ड्रेनेजचे काम पूर्ण झाले आहे. परंतु पुढील काम रखडले आहे. पुलांची कामेही अजून अपूर्णच आहेत. ड्रेनेजलाइन टाकण्यासाठी अनेक ठिकाणी रस्त्याचे खोदकाम करण्यात आले. त्यामुळे रस्त्यावरील अपघातांचे प्रमाण वाढले आहे.

मागील दोन महिन्यांपासून काम ठप्प झाल्याने नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. काम सुरू होण्यापूर्वी पोलिस बंदोबस्तात अतिक्रमणे हटवली गेली. परंतु वर्ष उलटले, तरी रस्त्याची अवस्था ‘जैसे थे’ आहे. संपूर्ण रस्ता धुळीने माखला आहे. रस्त्यावरील धूळ कडेच्या घरांत शिरते. या रस्त्याच्या कामाबाबत आतापर्यंत केवळ खोटी आश्वासने मिळाली, विरोधकांची आंदोलने खोटीच होती, कोणीच लक्ष देत नाही, अशी संतप्त प्रतिक्रिया ‘दिव्य मराठी’शी बोलताना नागरिकांनी रविवारी व्यक्त केली.

रस्त्यावरील धुळीमुळे आरोग्याचा प्रश्न गंभीर
पहिल्या टप्प्यातील काँक्रिटीकरणाचे काम अपूर्ण आहे. त्यामुळे रस्त्यावर मोठय़ा प्रमाणात धूळ जमा झाली आहे. वाहनांमुळे उडणारी रस्त्यावरील धूळ थेट घरात येते. अनेकांना दम्याचा त्रास आहे. धुळीमुळे त्यात आणखी भर पडते. संपूर्ण रस्ता तर सोडा, निदान आतापर्यंत झालेले काम तरी तातडीने पूर्ण करण्याची आवश्यकता आहे.’’ विकास मदने, नागरिक.

‘पेव्हर फिनिशिंग’ मशीनची प्रतीक्षा
पहिल्या टप्प्यात हॉटेल परिचय ते एस्सार पेट्रोल पंप या भागात काँक्रिटीकरण करण्यात आले. परंतु 32 सेंटिमीटर (एम 35) जाडीच्या काँक्रिटीकरणाचे अंतिम काम अपूर्ण आहे. ते दज्रेदार व्हावे, यासाठी अत्याधुनिक ‘पेव्हर फिनिशिंग’ मशीनचा वापर करावा, अशा सूचना संबंधित ठेकेदाराला देण्यात आल्या आहेत. परंतु तीन महिने उलटले, तरी हे मशीन उपलब्ध झाले नाही. काँक्रिटीकरणाची जाडी कमी-जास्त होऊ नये, यासाठी या मशीनमध्ये सेन्सर आहेत. त्यामुळे कामात कोणत्याही त्रुटी राहणार नाहीत, अशी अपेक्षा आहे.

पुन्हा समन्वयाचा अभाव
प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार समितीची (पीएमसी) नेमणूक, विजेचे खांब, जलवाहिन्या, समाजमंदिर, तसेच किरकोळ अतिक्रमणांमुळे काम रखडले होते. बांधकाम, पाणीपुरवठा व विद्युत विभाग यांच्यात समन्वय नसल्याने ही स्थिती निर्माण झाली. निवृत्त शहर अभियंता एन. डी. कुलकर्णी यांनी सर्व विभागांमध्ये समन्वय घडवून आणला. महिनाभरापूर्वी कुलकर्णी निवृत्त झाल्याने समन्वय राहिलेला नाही.