आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नगर शहराला बनवणार सुंदर, हरित, आधुनिक नॉलेज व टेक्नॉलॉजी सिटी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- शहर विकास हेच आपले अंतिम ध्येय आहे. आधी कोणी काय केले, काय केले नाही, याच्या वादात आपल्याला पडायचे नाही. नगरकर जनतेने मोठ्या विश्वासाने आपल्याला आमदार केले आहे. त्यामुळे त्यांच्या विश्वासाला अजिबात तडा जाऊ देणार नाही. आतापर्यंत मागे पडलेल्या नगर शहराला विकासात आघाडीवर नेऊन नॉलेज व टेक्नॉलॉजी सिटी बनवण्याचा निर्धार शहराचे आमदार संग्राम जगताप यांनी ह्यदिव्य मराठीह्णशी संवाद साधताना व्यक्त केला.

नगर शहर विकासात मागे का पडले आहे, याचा अतिशय सखोल अभ्यास आपण केला आहे. त्यामुळे त्यासाठी काय करायचे, हेही आपल्याला माहिती असल्याचे सुरुवातीसच स्पष्ट करून जगताप म्हणाले की, नगर शहराचा विकास होण्यासाठी सर्वांत प्रथम येथे उद्योगवाढीसाठी प्रयत्न करावे लागणार आहेत. आम्ही त्या दृष्टीने प्रयत्नही सुरू केले आहेत. नगरमध्ये मोठा उत्पादन करणारा उद्योग आला, तर सर्व चित्र बदलण्यास वेळ लागणार नाही. फक्त यासाठी अडचण आहे, ती जागेची. कारण मोठा उद्योग यायचा असेल, तर किमान दोनशे एकर जागेची गरज असते. ती सोडवण्याच्या दृष्टीने प्रयत्न करणार आहे. पूर्वी नगरमध्ये कायनेटिक व व्हिडीओकॉन या कंपन्या जोरात सुरू होत्या. त्यांच्याकडे नगर शहर परिसरात मोठ्या जागा आहेत. व्हिडीओकॉनचे वेणूगोपाल धूत यांच्याशी आपली चर्चाही झाली आहे. महानगरपालिकाही आपल्या ताब्यात असल्याने व्हिडीओकॉन कंपनीला सवलती देण्यासही काही अडचण येणार नाही. अशीच चर्चा लवकरच कायनेटिक कंपनीच्या मालकांशी करणार असल्याचे त्यांनी सांगितले. याशिवाय सध्या एमआयडीसीत कार्यरत असणाऱ्या उद्योजकांच्याही अडचणी सोडवण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली.
सर्व रस्ते काँक्रिटचे करणार
आपल्याच काळात शहरातील पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी सन 2009 मध्ये फेज 2 ' ही 116 कोटींची व 2014 मध्ये भुयारी गटार योजनेसाठी 266 कोटी मंजूर झाले. भुयारी गटार करताना जो रस्ता खोदला जाईल तो पुन्हा तसाच करून देण्याची अट ठेकेदारास घातली जाईल. एकदा सर्व खोदाईशी संबंधित काम पूर्ण झाल्यानंतर शहरातील सर्व रस्ते काँक्रिटचे करणार आहे. सर्व रस्त्यांच्या काँक्रिटीकरणासाठी सुमारे पाचशे ते सहाशे कोटींचा खर्च येईल. त्यासाठी सर्व आराखडा व प्रस्ताव करण्याचे काम सुरू केले असल्याची माहितीही त्यांनी दिली.
शहर सुशोभीकरण करणार
नगर शहरात आल्यानंतर बाहेरच्या लोकांना काहीही विशेष आकर्षण वाटेल असे काहीही नाही, याची खंत आहे. त्यासाठी प्रत्येक मोठ्या चौकाचे सुशोभीकरण करण्यात येईल. त्यासाठी काही उद्योजकांशी प्राथमिक चर्चाही झाली आहे. सर्व चौक प्रायोजकांकडून सुंदर बनवू. या शिवाय उद्यानांसाठी आरक्षित असलेल्या जागा ताब्यात घेऊन तेथे उद्याने उभारली जातील. काही ठिकाणी क्रीडांगणांचाही विकास करू.
वाहतुकीचा प्रश्न सोडवणार
नगर शहरात सर्वांत मोठा व भयावह प्रश्न वाहतुकीचा आहे. त्यावर बाह्यवळण रस्ता लवकरात लवकर पूर्ण क्षमतेने वापरात येणे व नगरमध्ये बहुचर्चित उड्डाणपूल पूर्ण होणे गरजेचे आहे. फक्त हा उड्डाणपूल सध्याच्या आराखड्यानुसार न करता तो नवीन महापालिका कार्यालयापर्यंत लांबवण्याची व तो चारपदरी करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचे जगताप यांनी स्पष्ट केले. तसेच पत्रकार चौक ते सावेडी नाका दरम्यानही उड्डाणपूल उभारण्याची मागणी आपण करू, असे त्यांनी सांगितले.
स्वच्छतागृहाचा प्रश्न सुटणार
शहरात वाहनांच्या पार्किंगचा प्रश्नही गंभीर आहे. तो सोडवण्यासाठी जुन्या जिल्हा रुग्णालयाची जागा वापरण्यात येईल. मुख्य बाजारपेठेत स्वच्छतागृह नाही. त्यामुळे विशेषत: महिलांची मोठी कुचंबणा होते. हा प्रश्न सोडवण्यासाठी जुन्या जिल्हा रुग्णालयाच्या जागेतच मोठे सार्वजनिक स्वच्छतागृह उभारणार असल्याचे त्यांनी सांगितले. बाजारपेठेत ह्यनो व्हेईकल झोनह्ण करण्यासाठीही प्रयत्न करणार असल्याचे जगताप यांनी स्पष्ट केले.
आमदार जगताप यांच्या कल्पनेतील नगर शहर...
मोठ्या शैक्षणिक व व्यवस्थापन संस्था नगरमध्ये येण्यासाठी प्रयत्न करणार
उद्योजकांना सवलती देऊन त्यांना नगरमध्ये येण्याचे निमंत्रण देणार
भुयारी गटार योजना लवकरच पूर्ण करण्यासाठी कटिबद्ध
शहरातील सर्व रस्ते काँक्रिटचे करणार
शहर स्वच्छ सुंदर व हरित करणार