आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कडेकोट बंदोबस्तात सवार्‍यांचे विसर्जन

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर - देशात दुसर्‍या क्रमांकाच्या मानल्या जाणार्‍या येथील मोहरमच्या सवार्‍यांच्या विसर्जन मिरवणुका शुक्रवारी रात्री शांततेत पार पडल्या. दुपारी बारा वाजता सुरू झालेल्या सवार्‍यांची मिरवणूक दिल्लीगेटबाहेर निघण्यास रात्रीचे पावणेआठ वाजले. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मिरवणुकीसाठी अधिकार्‍यांसह एक हजार कर्मचार्‍यांचा कडेकोट पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला.

देशात लखनऊ व नगर या दोनच ठिकाणी सवारी व ताजिया यांची एकत्रित विसर्जन मिरवणूक काढली जाते. इतर ठिकाणी मोहरमनिमित्त बसवण्यात आलेल्या ताजियांची मिरवणूक निघते. लखनऊमध्ये दुसर्‍या क्रमांकाची विसर्जन मिरवणूक नगरमध्ये काढली जाते. कत्तलच्या रात्रीनिमित्त गुरुवारी मध्यरात्रीच्या सुमारास इमाम हसन व इमाम हुसैन यांच्या कोठला परिसरातील स्वार्‍यांची मिरवणूक काढण्यात आली. विविध यंग पाटर्य़ांनी आणलेल्या टेंभ्यांसह निघलेल्या या मिरवणुकीला भाविकांनी मोठी गर्दी केली. शुक्रवारी सकाळी या सवार्‍या परत कोठला येथे आणण्यात आल्या. दुपारी बारा वाजता छोटे इमाम हुसेन यांची सवारी बाहेर पडली, तर दुपारी सव्वादोनच्या सुमारास बडे इमाम हसन यांची स्वारी मिरवणुकीत सहभागी झाली. या दोन्ही स्वार्‍यांनी दुपारी तीनच्या सुमारास मंगलगेट चौकात भेट झाली. साडेतीन वाजता दोन्ही सवार्‍यांची एकत्रित मिरवणूक सुरू झाली.

बडे इमाम यांची सवारी विसर्जन मार्गावर थोड्या थोड्या अंतराने विसाव्यासाठी थांबवण्यात येते. छोटे इमाम यांची स्वारी यंग पाटर्य़ांचे कार्यकर्ते मागे-पुढे खेळवतात. सवार्‍यांना चादर, हार, फुले अर्पण करण्यासाठी विसर्जन मार्गावर भाविकांनी दुतर्फा मोठी गर्दी केली होती. पोलिसांनी सवारी खेळवताना कार्यकर्त्यांना कोणताही मज्जाव केला नाही. केवळ रस्त्याच्या दुतर्फा उभ्या असलेल्या भाविकांना त्रास होणार नाही याची काळजी पोलिसांकडून घेण्यात येत होती.

आडतेबाजार, पिंजार गल्ली, जुना कापडबाजार, ख्रिस्त गल्ली, बुरुड गल्ली, जुना बाजार, पंचपीर चावडी, जुनी महानगरपालिका, दो बोटी चिरा मश्जिद, कोर्टाच्या पाठीमागून दिल्लीगेट मार्गे मिरवणूक बालिकार्शम रस्त्याने सावेडी गावठाणाकडे नेण्यात आली. सावेडी गावठाणात बनवण्यात आलेल्या बारवेत सवार्‍यांच्या ताबुतांचे विसर्जन करण्यात आले. इमाम हसन व इमाम हुसेन यांच्यासह सावेडीत स्थापन करण्यात येणार्‍या इमामे कासम यांच्या सवारीच्या ताबुताचे विसर्जन या ठिकाणी करण्यात आले.

हिंदू-मुस्लिम एकतेचे प्रतीक
हिंदू-मुस्लिम एकतेचे प्रतीक म्हणून शहरातील मोहरम सणाकडे बघितले जाते. हिंदू धर्मियांच्या वतीने नवस बोलून ते फेडले जातात. बडे इमाम यांची सवारी हिंदू बांधवाच्या खांद्यावर असते. वाहिरा कोंडी (ता. आष्टी, जि. बीड) येथील हिंदू बांधवही जबाबदारी गेल्या 18 ते 19 वर्षांपासून पार पाडीत आहेत. तसेच मिरवणुकीत करबल्याच्या लढाईतील शस्त्रही हेच लोक खांद्यावर वाहून नेतात.