आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोहरम मिरवणुकीत सामाजिक ऐक्य, कडेकोट पोलिस बंदोबस्तामुळे कोणताही अनुचित प्रकार नाही

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - देशभरात प्रसिद्ध असलेल्या ५२६ वर्षांचा इतिहास असलेल्या नगर शहरातील मोहरमची सवारी विसर्जन मिरवणूक बुधवारी रात्री शांततेत, परंतु विलंबाने पार पडली.
कोठला मंगलगेट हवेली येथून दुपारी बारा वाजता मिरवणुकीला सुरुवात झाली. तत्पूर्वी मंगळवारी रात्री ‘कत्तलकी रात’ची मिरवणूक शांततेत पार पडली. मिरवणुकीत कोणताही अनुचित प्रकार घडू नये, म्हणून पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला होता. मुंबई, पुणे आणि अनेक ठिकाणांवरून शिया समाजातील समाजबांधव आणि महिलांनी तसेच इतर धर्मियांनीही या मातममध्ये सहभागी होण्यासाठी दर वर्षीप्रमाणे यंदाही शहरात हजेरी लावली.

परंपरागत पद्धतीनुसार मंगळवारी मध्यरात्री बारा वाजता कत्तलची रात्र मिरवणूक निघाली. पाच टेंभे मिरवणुकीत सहभागी झाले होते. कोठला येथून छोटे इमाम बडे इमाम यांची सवारी निघाली. या दोन्ही सवाऱ्या शहरातील मिरवणूक मार्गावर फिरवून बुधवारी सकाळी साडेअकरा वाजता आपापल्या ठिकाणी आल्या. कत्तलच्या रात्री निघणाऱ्या या दोन्ही सवाऱ्या दुसऱ्या दिवशी सकाळी पर्यंत आपापल्या ठिकाणी येत असतात. मात्र, यंदा या दोन्ही सवाऱ्या यायला उशीर झाला. छाती बडवत ‘या हुसेन या हुसेन’चा नारा देत मातम मिरवणूक शहरातील प्रमुख मार्गावरून कोठला भागात नेण्यात आली.

मोहरमनिमित्त अनेक भाविकांसह मुस्लिम बांधव कत्तलच्या रात्रीचा विसर्जन मिरवणुकीचा रोजा करतात. हा रोजा सोडण्याची व्यवस्था शहरातील अनेक मशिदींमध्ये करण्यात येते. गेल्या काही वर्षांपासून रोजा करणाऱ्या भाविकांची संख्याही वाढली आहे. विसर्जन मिरवणुकीत चार सरबताच्या गाड्या दोन ताजिया सहभागी झाले. विसर्जन मिरवणूक बारा इमाम कोठला, मंगलगेट, पिंजारगल्ली, बुरुडगल्ली, पंचपीर चावडी, जुनी मनपा चौक, सबजेल चौकातून कोर्टाच्या पाठीमागून दिल्ली दरवाजाकडे येते. बारा इमाम कोठला ट्रस्टचे मुख्य विश्वस्त बडेसाहब जहागीरदार, शकूर शेख, खलील शेख यांच्यासह मुजावर सर्वधर्मीय समाजबांधव यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. तरूणांची संख्या मोठी होती.

बुधवारी दुपारी बारा वाजता कोठला येथे इमाम हुसेनची सवारी मानकऱ्यांनी उठवली. त्यानंतर मंगलगेट हवेली येथे ही सवारी आली. इमाम हुसेन इमाम हसन या दोन्ही सवाऱ्यांची भेट होते. मंगलगेट हवेलीत आल्यानंतर मिरवणुकीला सुरुवात होते. या मिरवणुकीत मानकऱ्यांसह समाजबांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले. विसर्जन मिरवणुकीत लहान मुलांसह तरुणही मोठ्या संख्येने सामील झाले. या हुसेन.. या हुसेन अशा घोषणा देत सवारीला खांदा देत होते. मिरवणूक मार्गावरील बारा इमाम कोठला, पंचपीर चावडी, जुनी मनपा, सबजेल चौक, चौपाटी कारंजा ते दिल्ली दरवादा मार्गाला जोडणारे इतर रस्ते बंद केले होते.

मोहरमनिमित्त झेंडीगेट येथे नालसाहब चौक दादू सुभेदार मित्रमंडळाच्या वतीने भाविकांना सरबताचे वाटप करण्यात आले. यावेळी प्रेस क्लबचे प्रभारी अध्यक्ष मन्सूर शेख, दादू सुभेदार, आसिफ बाबुलाल, नसीर शेख, मुस्तफा खान, फारुक बागवान, अमन भय्या, मोहंमद सौदागर, समी शेख, अजहर सुभेदार, अल्तमाश सुभेदार, अफशान सुभेदार, रशीद शेख, अली रजा, बी. के. अज्जू, गनीभाई सुभेदार आदी उपस्थित होते. मिरवणुकीत तरुणांची उपस्थिती लक्षणीय होती. ठिकठिकाणी सवाऱ्या थांबवून शेरे चादरी अर्पण केल्या जात होत्या. सरबताच्या गाड्यांमधून सरबत रोठचेही वाटप करण्यात आले.

बंदोबस्तासाठी नेमलेल्या पोलिसांकरिताही अल्पोपाहाराची व्यवस्था करण्यात आली होती. पोलिसांचा मोठा फौजफाटा मिरवणूक मार्गावर बंदोबस्तासाठी तैनात होता. पारंपरिक डोलीबाजाच्या तालावर मोहरमची मिरवणूक निघाली. कोणताही अनुचित प्रकार घडता मिरवणूक शांततेत, परंतु विलंबाने पार पडली.
भिंगारमध्येही सवारी मिरवणूक
भिंगारमध्ये लिंगायत गवळी समाजाकडे गवळी वाड्यातील सवारी असते. भिंगारच्या सर्व भागात ही सवारी मिरवण्यात आली. शहरातील सर्वधर्मियांनी या मिरवणुकीत उत्साहाने सहभाग घेतला. मिरवणूक मार्गावर ठिकठिकाणी सरबताचे वाटप करण्यात आले. या मिरवणुकीत तरूणांची संख्या लक्षणीय होती. नगरमध्ये महापालिकेच्या जुन्या इमारतीपासून सरबताचे वाटप करणाऱ्या गाड्या मिरवणुकीच्या बाहेर काढण्यात आल्या. शहरातील संपूर्ण मिरवणूक मार्गावर पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.

मिरवणुकीचे छायाचित्रण
मोहरम विसर्जन मार्गावरील प्रमुख पाच ठिकाणी उंच मनोरे उभारण्यात आले होते. मिरवणुकीतील प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवण्यासाठी सुमारे वीस ठिकाणी सीसीटीव्ही लावलेले होते. मिरवणुकीत महिलांची छेडछाड होऊ नये, म्हणून छेडछाडविरोधी पथक तैनात होते. कोतवाली तोफखाना पोलिसांचेही पथकही होते. शहर विभागाचे सहायक पोलिस अधीक्षक चिन्मय पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली चोख पोलिस बंदोबस्त होता.
बातम्या आणखी आहेत...