आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काँग्रेस पक्षासाठी हवे सर्वसमावेशक राजकारण, विनायक देशमुख यांचे पक्षश्रेष्ठींना निवेदन

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- एकेकाळी नगर जिल्ह्यातील सर्व जागा जिंकण्याचा विक्रम करणाऱ्या काँग्रेस पक्षाला विधानसभा निवडणुकीत मोठी नामुष्की पत्करावी लागली. बारापैकी नऊ मतदारसंघांत काँग्रेस उमेदवारांची अनामत रक्कम जप्त झाली. त्यामुळे आगामी काळात पक्षाच्या पुनर्बांधणीसाठी सर्वसमावेशक राजकारणाची आवश्यकता आहे, पक्षश्रेष्ठींनी त्याची दखल घ्यावी, अशी मागणी काँग्रेसच्या केंद्र-राज्य योजना सनियंत्रण समितीचे अध्यक्ष विनायक देशमुख निवेदनाद्वारे केली आहे.
देशमुख यांनी काँग्रेसच्या जिल्ह्यातील पराभवाची कारणमिमांसा निवेदनाद्वारे पक्षश्रेष्ठींसमोर मांडली आहे. जिल्ह्यातील उमेदवारांचे तिकीट वाटप कोणाच्या सल्ल्याने झाले, ते माहिती नाही, परंतु त्यात मोठ्या प्रमाणात फिक्सिंग झाली आहे. जिल्ह्यातील काही नेत्यांनी आपल्या नातेवाईकांना पक्षाची उमेदवारी दिली, ही गंभीर बाब आहे. जिल्ह्याच्या दक्षिण भागात काँग्रेस पक्ष दुर्बल झाला आहे. शेवगाव-पाथर्डी, कर्जत- जामखेड या मतदारसंघांत घडलेला प्रकार चिंताजनक आहे. काही नेत्यांनी केवळ मी व माझे नातेवाईक एवढाच संकुचित विचार केल्याने पारंपरिक व हक्काच्या मतदारांनी देखील पक्षाकडे पाठ फिरवली. तिकीटवाटपात जैन, ख्रिश्चन, मुस्लिम इतर मागासवर्गीय अशा घटकांना प्रतिनिधीत्व दिले नाही. जबाबदार नेत्यांनी केवळ आपल्या नातेवाईकांचाच विचार केला. सर्व पदे माझ्याच घरात व नातेवाईकांकडे असावीत, अशा सत्ता पिपासू प्रवृत्तीमुळे जिल्ह्यातील पक्ष संघटना विस्कळीत झाली आहे. बाहेरचा उमेदवार लादू नये, असा ठराव शहर जिल्हा काँग्रेस समितीने एकमुखाने केला होता, पक्षाने मात्र या ठरावास केराची टोपली दाखवली. स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या भावनांचा अनादर केल्यामुळेच उमेदवारांची अनामत रक्कम जप्त होण्याची नामुष्की पक्षावर ओढवली आहे. त्यामुळे या सर्व घटनांचा व परिस्थितीचा विचार करून पक्षाला आगामी काळात कामकाजाची दिशा ठरवावी लागणार आहे. इंदिरा गांधी यांच्या सर्वसमावेशक राजकारणाची जिल्ह्यात पुन्हा एकदा सुरुवात करावी, अशी मागणी देशमुख यांनी पक्षश्रेष्ठींकडे निवेदनाद्वारे केली आहे.