आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोरया चिंचोरे गावाचा झाला कायापालट

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर - दहा वर्षांपूर्वी अंतर्गत गट-तट, राजकारण, हेवेदावे, त्यातून होणार्‍या मारामार्‍या, पोलिस ठाण्यात दरमहा एकतरी गुन्हा दाखल होणार, अशी ज्या गावाची ओळख होती, त्याच गावाला दोन वर्षांपूर्वी महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहिमेचा प्रथम पुरस्कार मिळाला. हे गाव म्हणजे नेवासे तालुक्यातील मोरया चिंचोरे. सोनई येथील ‘यशवंत सामाजिक प्रतिष्ठान’च्या प्रयत्नांतून या गावाचा कायापालट झाला. ज्येष्ठ कवी व दिग्दर्शक गुलजार अन् शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर यांनाही या गावाचे बदललेले रूप पाहण्याची भुरळ पडली.

सुमारे दहा वर्षांपूर्वी मोरया चिंचोरे या गावाचे चित्र पूर्ण वेगळे होते. अंतर्गत राजकारण, मारामार्‍या यामुळे तेथील गावकरी वैतागले होते. गावातील वाद तर इतके टोकाचे असत, की एखाद्या कुटुंबात काही दु:खद घटना झाली, तर दुसर्‍या गटाचा माणूसही तेथे उपस्थित नसायचा. येथील सगळे गावकरी गुण्यागोविंदाने नांदावेत, म्हणून यशवंत सामाजिक प्रतिष्ठान पुढे आले. अध्यक्ष प्रशांत गडाख यांनी गाव दत्तक घेतले. राजकीय कुटुंबातील व्यक्ती समाजकारणात आल्यावर साधारणपणे विविध शंका मनात येतात. पण, गडाख यांनी बोलण्यापेक्षा कृतीवर अधिक भर दिला. त्यामुळे मोरया चिंचोरे गावकर्‍यांचा विश्वास बसला.

हे गाव दत्तक घेतल्यानंतर अध्यक्ष गडाख यांच्यासह ‘यशवंत प्रतिष्ठान’च्या सर्व सदस्यांनी स्वत: र्शमदान करून या गावात बंधारे बांधले. रस्ते, दवाखाना यासारखी विकासाची कामे केली. त्यानंतर गावकर्‍यांचीही त्यांना साथ मिळाली. गडाख यांनी गावकर्‍यांना पटवून दिले की, या गावात आपण ग्रामपंचायत, जिल्हा परिषद, आमदारकी, खासदारकी या निवडणुकीत कोणालाही मत मागणार नाही. त्यामुळे गावकर्‍यांना विश्वास वाढला. मग आपोआप गावातील सर्व गटातील युवक विकासकामांसाठी एकत्र आले.

गावात विकासकामे झाल्यामुळे कटुता संपुष्टात आली. गेल्या चार वर्षांत गावातील सर्व वादही मिटले. आता गावातील एकही प्रकरण पोलिस ठाण्यात दाखल नाही. पूर्वी गावात टोकाचे वाद होत होते. आता मात्र सगळे गावकरी गुण्यागोविंदाने एकत्र नांदत आहेत. याच प्रयत्नांचे फलित म्हणून महाराष्ट्र राज्य शासनाचा 2011 चा ‘महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहिमे’चा 3 लाख रुपयांचा प्रथम पुरस्कार मोरया चिंचोरे या गावाला मिळाला. आता राज्य शासनाच्या ‘आदर्श गाव संकल्प व प्रकल्प योजने’त हे गाव समाविष्ट करण्यात आले आहे. जानेवारी 2013 मध्ये ज्येष्ठ कवी-दिग्दर्शक गुलजार, आंतरराष्ट्रीय कीर्तीचे शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर यांनी गावात येऊन उपक्रमांचे कौतुक केले होते. यंदा डॉ. अनिल काकोडकर हे गावातील विकासकामे पाहायला येणार आहेत.

समाजाचे देणे लागतो
मी शिक्षण संस्था, व्यवसाय आणि कुटुंब या सोबतच राजकारणातही सक्रिय आहे. मात्र, एक माणूस म्हणून आपण या समाजाचे काहीतरी देणे लागतो, या भावनेतून मी सामाजिक काम करतो. व्यवसायासाठी तुमच्या अंगी कल्पकता लागते. परंतु राजकारणात वेळप्रसंगी आक्रमक व्हावे लागते. अनेकदा खंबीर भूमिका घ्यावी लागते. या खंबीर भूमिकेतूनच मोरया चिंचोरे गावाचे रूप पालटण्यात यश आले आहे.’’ प्रशांत गडाख, अध्यक्ष, यशवंत प्रतिष्ठान.