आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राज्यात सर्वाधिक दुष्काळाच्या झळा नगर जिल्ह्यामध्ये, ४४२ गावांना दुष्काळी उपाययोजना लागू होणार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - नगर जिल्हा हा राज्यातील सर्वाधिक टंचाईग्रस्त जिल्हा म्हणून जाहीर झाला आहे. जिल्ह्यातील तब्बल ४४२ गावे अतिटंचाईग्रस्त असून या गावांना दुष्काळी उपाययोजना लागू होणार आहेत. खरीप हंगामात जिल्ह्यातील ४१६ गावे टंचाईग्रस्त होती. नेवासे तालुक्यात सर्वाधिक ११४ गावे टंचाईग्रस्त आहेत.
जिल्ह्याचे वार्षिक सरासरी पर्जन्यमान ४९७ मिलिमीटर आहे. सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्याने डिसेंबरपासूनच दुष्काळाच्या झळा जाणवू लागल्या आहेत. दोन वर्षांपूर्वी ५९१ मिलिमीटर पावसाची नोंद झाली होती. गेल्यावर्षी मात्र केवळ ३८२ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. कमी पावसामुळे अनेक धरणांमधील पाणीसाठा कमी होऊ लागला असून विहिरींमधील पाण्याची पातळी खालावू लागली आहे. त्यामुळे ग्रामीण भागात टंचाई स्थिती निर्माण झाली आहे.
डिसेंबरपासूनच जिल्ह्याच्या दक्षिण भागातील नगर, शेवगाव, पाथर्डी, कर्जत, जामखेड श्रीगोंदे या भागात दुष्काळी स्थिती जाणवू लागली आहे. सध्या टँकरची संख्या १९८ वर गेली आहे.
खरिपात प्रारंभी ५० पैशांपेक्षा कमी आणेवारी असलेली ३०५ गावे टंचाईग्रस्त म्हणून जाहीर करण्यात आली होती. डिसेंबरमध्ये त्यात आणखी २११ गावे वाढली. एकूण ४१६ गावे टंचाईग्रस्त म्हणून जाहीर करण्यात आली.
जिल्ह्यात रब्बीचे क्षेत्र लाख ४० हजार हेक्टर आहे. रब्बीची एकूण हजार २५३ गावे आहेत. त्यापैकी कोपरगाव, श्रीरामपूर, राहाता, राहुरी, नेवासे, नगर, शेवगाव, पाथर्डी पारनेर या नऊ तालुक्यांतील ४४२ गावांची आणेवारी पन्नास पैशांपेक्षा कमी आहे. त्यामुळे ही टंचाईग्रस्त गावे म्हणून जाहीर करण्यात आली आहेत.

राज्यातील सर्वाधिक टंचाईग्रस्त गावे नगर जिल्ह्यात आहेत. त्याखालोखाल विदर्भातील चंद्रपूर जिल्ह्यात ३९३, तर औरंगाबाद विभागात जालना जिल्ह्यातील ३५६ गावे टंचाईग्रस्त आहेत. सर्वाधिक टंचाईग्रस्त गावे नेवासे तालुक्यात आहेत. तेथे ही संख्या ११४ वर गेली आहे.