आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • More Mess About The Distribution Of Gas In The City To Maintain

नगरमध्‍ये गॅस वितरणाबाबतचा गोंधळ अजून कायम

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर-युनिटेक गॅस एजन्सीमधील वितरणाचा गोंधळ 25 दिवसांनंतरही कायम आहे. घरपोहोच गॅस सिलिंडरसाठी ऑनलाइन बुकिंग करूनही ग्राहकांना दहा दिवसांपेक्षा जास्त काळ वाट पहावी लागत आहे. त्यामुळे सिलिंडर घेण्यासाठी ग्राहकांना सकाळी सात वाजेपासूनच एजन्सीच्या सावेडी येथील गोदामासमोर रांग लावावी लागते. कल्याण रोड परिसरातील ग्राहकांना दहा किलोमीटर अंतरावरून सिलिंडरसाठी यावे लागते.

डिसेंबरपासून युनिटेक गॅस एजन्सीमधील डिलिव्हरी करणार्‍या कर्मचार्‍यांनी काम बंद केल्याने घरपोहोच सेवा बंद झाली आहे. डिलिव्हरी कर्मचार्‍यांनी बिलात गोंधळ केल्यामुळे एजन्सीने त्यांच्यावर कारवाई केली होती. त्यामुळे या कर्मचार्‍यांनी यांनी काम बंद ठेवले आहे. तेव्हापासून एजन्सीने गोदामामधून सिलिंडर वाटप सुरू केले आहे.

भारत पेट्रोलियम, हिंदुस्थान पेट्रोलियम व इण्डेन या तीन कंपन्या शहरातील ग्राहकांना गॅस सिलिंडरचा पुरवठा करतात. या कंपन्यांचे सुमारे दीड लाखाहून अधिक ग्राहक आहेत. सर्वच गॅस एजन्सींनी आता ऑनलाइन बुकिंग सुरू केली आहे. तथापि, बुकिंग करूनही ग्राहकांना दोन आठवडे प्रतीक्षा करावी लागते.

युनिटेक गॅस एजन्सीत ऑनलाइन बुकिंग केल्यानंतर ग्राहकांना मोबाइलवर घरपोहोच सिलिंडर दिल्याचा एसएमएस येतो. प्रत्यक्षात सिलिंडर मात्र मिळत नाही. एजन्सीत संपर्क केल्यास तेथील कर्मचारी उडवाउडवीची उत्तरे देतात. सिलिंडर हवा असेल, तर गोदामाच्या बाहेर उभ्या असलेल्या गाडीतून घेऊन जाण्याची सूचना ते देतात. त्यासाठी ग्राहकांना भल्या सकाळी येऊन गोदामासमोर रांग लावावी लागते. नंबर आल्यानंतर एजन्सीच्या कार्यालयात जाऊन पावती घ्यावी लागते. त्यानंतर मैदानात उभ्या असलेल्या वाहनातून सिलिंडर मिळते. एजन्सीमधील गोंधळाचा नाहक फटका ग्राहकांना सहन करावा लागत आहे. कुठल्याही ग्राहकांना रिकाम्या हाताने पाठवू नका. गॅस वितरण सुरळीत करा, अशा सूचना आपण एजन्सीला दिल्या आहेत, असे पुरवठा अधिकारी सोपान कासार यांनी सांगितले. घरपोहोच गॅस सिलिंडरसाठी 1305 रुपये घेतले जातात. घरपोहोच करण्यासाठी 15 रुपये अतिरिक्त घेतले जातात. मात्र, एजन्सीचे कर्मचारी टाकी घरपोहोच देत नाही. गोदामातून सिलिंडर घेणार्‍या ग्राहकांकडूनही घरपोहोचच्या नावाखाली 15 रुपये घेतले जातात. एजन्सीने घरपोहोच व गोदामाचा दरफलक लावला, तर ग्राहकांचा संभ्रम दूर होईल, अशी प्रतिक्रिया योगेश शिंदे या ग्राहकाने ‘दिव्य मराठी’ शी बोलताना दिली.