आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • More Than Two Lakh Devotees Visit Sai Baba Temple In Shirdi

गुरुपौर्णिमा : दोन लाखांवर भाविकांनी घेतले साईदर्शन

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

शिर्डी - गुरुपौर्णिमेनिमित्त जगभरातून शिर्डीत दाखल झालेले सुमारे दोन लाखांपेक्षा अधिक भाविक सोमवारी साईबाबांच्या चरणी लीन झाले. संस्थानच्या त्रिसदस्यीय समितीचे अध्यक्ष आणि मुख्य जिल्हा न्यायाधीश जयंत कुलकर्णी व त्यांची पत्नी अनुराधा कुलकर्णी यांच्या हस्ते पाद्यपूजा करण्यात आली.

गुरुपौर्णिमा उत्सवानिमित्त आयोजित श्री साईसच्चरित अखंड पारायणाची समाप्तीही सोमवारी झाली. या वेळी बाबांच्या प्रतिमेची व पोथीची मिरवणूक काढण्यात आली. अध्यक्ष जयंत कुलकर्णी, कार्यकारी अधिकारी किशोर मोरे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. यशवंत माने व संस्थानचे पुरोहित उपेंद्र पाठक सहभागी झाले होते. दुपारी चार वाजता गंगाधर नरहर व्यास यांचे कीर्तन झाले. सायंकाळी ठाण्यातील विनोद नाखवा यांचा ‘मी मुंबईचा हाय कोळी’ कार्यक्रम सादर करण्यात आला. त्यानंतर रात्री सव्वानऊ वाजता गावातून श्री रथाची मिरवणूक काढण्यात आली.

सोन्याची थाळी अर्पण : हैदराबाद येथील साईभक्त विजय शहा यांनी 58 ग्रॅम वजनाची सोन्याची थाळी अर्पण केली. तिची किंमत एक लाख 36 हजार रुपये आहे.

विविध पुस्तकांचे प्रकाशन : संस्थानचे जनसंपर्क अधिकारी मोहन यादव यांनी लिहिलेल्या ‘साईचरित्र दर्शन’ या मराठी पुस्तकाच्या दुसर्‍या आवृत्तीचे या वेळी प्रकाशन करण्यात आले. तसेच डॉ. अमृता कस्तुरे यांनी केलेल्या याच पुस्तकाचा हिंदी आणि इंग्रजी अनुवाद यासह संस्थानच्या श्री साईनाथ गुणोपासना (आरती) व साईनाथ स्तवनमंजिरी या पुस्तकाच्या गोविंद माधव यांनी केलेल्या जर्मन अनुवादाचेही प्रकाशन करण्यात आले. खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांच्यासह मान्यवर या वेळी उपस्थित होते.


आज सांगता
गुरुपौर्णिमा उत्सवाची सांगता मंगळवारी होणार आहे. गुरुस्थान मंदिरात सकाळी रुद्राभिषेक, गोपाळकाला, कीर्तन व दहीहंडी होईल. सायंकाळी पूनम खन्ना यांची भजनसंध्या, जयराज कलसी यांचा सुफी व भक्तिसंगीताचा कार्यक्रम होईल.