आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रियकराबरोबर पळणा-या मुलीला रोखताना आई जखमी

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

श्रीरामपूर - प्रियकरासोबत पळून जाणा-या मुलीला रोखण्यासाठी चालत्या रेल्वेतून उडी मारणारी आई गंभीर जखमी झाली. तिच्यावर येथील कामगार रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मंगळवारी मध्यरात्री श्रीरामपूर रेल्वे स्थानकावर ही घटना घडली.
आंतरराज्य सांस्कृतिक देवाण-घेवाण कार्यक्रमांतर्गत पुणे येथे आलेली रुपा शंभू चोंगथांब (19) या तरुणीचे तिच्या कलापथकात डीजे वाजवणा-या किरण गायकवाड (19) याच्याशी प्रेमसंबंध जुळले. ही बाब कार्यक्रमाच्या संयोजकांनी या तरुणीच्या इम्फाळ येथील पालकांना कळवली. त्यामुळे तिला घरी घेऊन जाण्यासाठी तिची आई कमलदेवी व भाऊ सरोज पुण्याला आले. ते रुपासह आझाद हिंद एक्स्प्रेसने मणिपूरला जात असताना रुपाच्या सांगण्यावरून तिला पळवून नेण्यासाठी किरण व त्याचा मावसभाऊ निखिल युवराज कांबळे दौंड स्थानकावरून रेल्वेगाडीत बसले. श्रीरामपूर स्थानकावर तिला उतरवून घेण्याचे त्यांनी ठरवले.
गाडी श्रीरामपूर स्थानकात येताच स्वच्छतागृहात जाण्याचा बहाणा करून रुपा खाली उतरली. तिच्या आईला संशय येताच तिने दरवाजाकडे धाव घेतली. तेथील प्रवाशाने रुपा खाली उतरल्याचे सांगितले. मात्र, तोपर्यंत गाडीने वेग घेतला होता. तशाही परिस्थितीत कमलदेवी व सरोज यांनी चालत्या गाडीतून उड्या मारल्या. खाली पडल्याने कमलदेवी यांचे गुडघ्याचे व कमरेचे हाड मोडले. सरोजला किरकोळ खरचटले. कमलदेवी यांच्यावर साखर कामगार रुग्णालयात उपचार सुरू आहेत. किरण व निखिल रेल्वे पोलिसांच्या ताब्यात आहेत. हवालदार हबीब खान याप्रकरणी तपास करीत आहेत.