आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आई म्हणजे वाट...आयुष्याला मिळणारी नवी पहाट....

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
छायाचित्र: साहित्यिक डॉ. संजय कळमकर यांच्या मातु:श्री आसराई यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त देण्यात येणारा पहिला आसराई पुरस्कार मुंबई येथील ज्येष्ठ कवी प्रशांत मोरे व शैक्षणिक पुरस्कार सारोळा कासार येथील रमजान शेख यांना गुरुवारी चिचोंडी पाटील (ता. नगर) येथे झालेल्या कार्यक्रमात प्रदान करण्यात आला.
नगर - आई या विषयावर कितीही लिहिले, बोलले तरी तो पूर्ण होऊ शकत नाही. आई म्हणजे जीवनाला वाट, तसेच आयुष्याला मिळणारी नवी पहाट असल्याचे ज्येष्ठ कवी प्रशांत मोरे यांनी सांगितले.

साहित्यिक डॉ. संजय कळमकर यांच्या मातु:श्री आसराई यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त देण्यात येणारा आसराई पुरस्कार मुंबईचे मोरे यांना, तर शैक्षणिक पुरस्कार सारोळा कासार येथील रमजान शेख यांना गुरुवारी प्रदान करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी साहित्यिक लहू कानडे होते. यावेळी चित्रकार श्रीधर अंभोरे, कवी शशिकांत शिंदे, रवींद्र सातपुते, ऋता ठाकूर, प्राथमिक शिक्षणाधिकारी अशोक कडूस, माध्यमिकचे उपशिक्षणाधिकारी अरुण धामणे आदी उपस्थित होते.

सात हजार रुपये व सन्मानचिन्ह असे पुरस्कारचे स्वरूप आहे. आई या विषयावर लेखन, काव्य, तसेच व्याख्यानाने माताप्रेमाची महती सांगणारास दरवर्षी हा पुरस्कार दिला जाणार आहे. पुरस्कारप्राप्त कवी मोरे यांनी यावेळी आईची मुलाबाबत असलेली तळमळ, कष्ट याबाबतची महती कविता सादर करून स्पष्ट केली.

शिंदे यांनी बदललेले शेतकरी जीवन व दुष्काळामुळे आलेली हतबलता, तसेच बाराखडीवर आधारित कविता सादर केली. कानडे यांनी प्रशासकीय सेवेत असतानाचे व नंतरचे अनुभव सांगितले. अरुण धामणे यांनी कळमकर यांनी शिक्षण क्षेत्रात काम करीत असतानाही डॉक्टरेट असतानाचे व नंतरचे अनुभव सांगितले. ते म्हणाले, कळमकर यांनी शिक्षण क्षेत्रात काम करत असतानाही डॉक्टरेटसारखी पदवी संपादन केली. साहित्यिक क्षेत्रातही नाव कमावले. त्यामागे निश्चितपणे त्यांच्या मातु:श्री आसराई यांचे संस्कार व कष्ट आहेत.
शिक्षणाधिकारी अशोक कडूस यांनीही साहित्य पुरस्कारप्राप्त रमजान शेख यांनी राबवलेल्या उपक्रमशील शाळेचे कौतुक केले. मोरे यांनी मातामहतीबाबत केलेल्या कवितांची प्रशंसा त्यांनी केली. न्यू आर्टस कॉलेजचे विद्यार्थी प्रतिनिधी अक्षय कर्डिले यांनी शिक्षण क्षेत्रात होत असलेले बदल आत्मसात करण्याची आवश्यकता यावेळी व्यक्त केली.

प्रारंभी बबन बहिरवाडकर महाराज यांचे कीर्तन झाले. आसराई सोशल फाउंडेशनचे विश्वस्त आबासाहेब कोकाटे, राजेंद्र कळमकर व नरेंद्र कळमकर यांनी स्वागत केले. पुरस्काराबाबत संजय कळमकर यांनी माहिती दिली. यावेळी चिचोंडी पाटील विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात घेतलेल्या आई या विषयावरच्या निबंध स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांना प्रशस्ती पत्रक व पुस्तक अशी बक्षिसे देण्यात आली.

यावेळी शाळेचे विद्यार्थी जयश्री खराडे, विशाल पवार, सोनाली कोकाटे, प्रीती कोकाटे, वैष्णवी कोकाटे, प्रियंका क्षीरसागर, दीपक भुजबळ, सुदर्शन ठोंबरे, मयुरी लुटे, मंगेश चव्हाण या विद्यार्थ्यांनाही आई या विषयावरील निबंध स्पर्धेतील यशाबाबत पुरस्कार वितरण करण्यात आले. या कार्यक्रमास धार्मिक, शैक्षणिक, साहित्यिक, सामाजिक व राजकीय क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते.