आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'माउंटन मॅन' राजाराम भापकर गुरुजींचा उद्या दिल्लीत गौरव

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - स्वत: श्रमदान करून, घाम गाळून डोंगर फोडून गावकऱ्यांसाठी ४० किलोमीटर लांबीचा रस्ता तयार करणारे गुंडेगाव येथील राजाराम भापकर गुरुजींना जेएसपीएल फाउंडेशनच्या वतीने देण्यात येणारा राष्ट्रीय स्वयंसिद्ध सन्मान पुरस्कार जाहीर झाला आहे. या पुरस्काराचे वितरण १४ ला नवी दिल्लीत होणार आहे.

आयुष्यभर निष्ठेने समाजासाठी तृणमूल काम करणाऱ्यांना राष्ट्रीय स्वयंसिद्ध पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. सामाजिक बदल घडवून आणणाऱ्या संस्था व्यक्तींपासून इतरांना प्रेरणा घेता यावी, या उद्देशाने या पुरस्कारांना सुरूवात झाली. ग्रामीण विकास, शेती, आरोग्य, शिक्षण, महिला सक्षमीकरण, सामाजिक कार्य, पर्यावरण, उद्योजकता अशा विविध क्षेत्रातील व्यक्ती संस्थांची निवड या पुरस्कारासाठी केली जाते. या वर्षी ३५८ प्रवेशिकांमधून १० संस्था व्यक्तींची पुरस्कारांसाठी निवड करण्यात आली. त्यात भापकर गुरूजींचा समावेश आहे.
पुरस्कार वितरण समारंभ गुरूवारी संध्याकाळी सहा वाजता नवी दिल्लीतील कोपर्निकस मार्गावरील कमानी ऑडिटोरियममध्ये मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे.

सतत ५७ वर्षे राबले हात...
८२ वर्षांच्या राजाराम आनंदराव भापकर गुरूजींनी सलग ५७ वर्षे गावासाठी खपून ४० किलोमीटर लांबीचा रस्ता डोंगर फोडून तयार केला. गुंडेगावहून कोळगावपर्यंतचा हा रस्ता तयार झाल्यामुळे अंतर श्रम वाचून परिसरातील १९ खेड्यांमधील गावकरी आणि विद्यार्थ्यांची मोठी सोय झाली आहे. भापकर गुरूजी कोळगाव येथील जिल्हा परिषद शाळेत प्राथमिक शिक्षक असताना त्यांना या रस्त्याची गरज पहिल्यांदा जाणवली. सात डोंगर ओलांडून त्यांना देऊळगावमार्गे लांबच्या रस्त्याने शाळेत जावे लागत असे. कच्चा पायवाटेने सायकलवरून जाताना फार हाल होत. डोंगर फोडून रस्ता तयार केला, तर हा फेरा वाचूू शकेल, असे त्यांना वाटले. त्यांनी हातात कुदळ घेऊन स्वत:च हे काम सुरू केलं. शाळेत जाण्याआधी दोन तास आणि शाळेतून आल्यावर ते डोंगर फोडून रस्ता तयार करू लागले. आपली आयुष्यभराची पुंजी भापकर गुरुजींनी या डोंगर रस्त्यांसाठी खर्च केली. आपल्या निवृत्तीवेतनातून त्यांना मजुरांना यंत्रासाठी पैसे दिले. भापकर गुरूजींनी तयार केलेल्या या रस्त्यामुळे गुंडेगाव आणि कोळगावदरम्यानचे अंतर २९ किलोमीटरने कमी होऊन फक्त १० किलोमीटरवर आले आहे.
बातम्या आणखी आहेत...