आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोदींची सभा भाजपच्या विजययात्रेचा प्रारंभ ठरणार; खासदार दिलीप गांधी यांचा विश्वास

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची गुरुवारची (9 ऑक्टोबर) राहुरी येथील सभा अभूतपूर्व गर्दीची असेल, असे नियोजन कार्यकर्त्यांनी केले आहे. जिल्ह्यातील सर्व 12 जागा निवडून आणण्यासाठी सर्व नेत्यांचे जोरदार प्रयत्न आहेत. ही सभा म्हणजे विजययात्रेचा प्रारंभ ठरेल, असा विश्वास खासदार दिलीप गांधी यांनी मंगळवारी रात्री पत्रकार परिषदेत व्यक्त केला. यावेळी पक्षाचे उमेदवार अ‍ॅड. अभय आगरकर, पदाधिकारी अनंत जोशी, दामोदर बठेजा, पक्षाचे प्रदेश संघटक विठ्ठल चाटे आदी उपस्थित होते.
मोदी यांच्या सभेमुळे कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह आहे. या सभेला सर्व 12 उमेदवार उपस्थित राहणार आहेत, असे सांगून गांधी म्हणाले, 25 वर्षांनंतर आम्ही स्वतंत्रपणे निवडणूक लढवत आहोत. राज्यात भाजपचे स्वबळावर सरकार आणण्यासाठी सर्व नेत्यांनी कंबर कसली आहे. केंद्रीय मंत्री स्मृती इराणी, प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस, एकनाथ खडसे, पंकजा मुंडे यांच्या सभा झाल्या आहेत. त्यामुळे जिल्ह्यात भाजपला चांगले वातावरण आहे. मोदी यांच्या सभेचा पक्षाला मोठा लाभ मिळणार आहे. त्यामुळे सर्व 12 जागांवर भाजपचे उमेदवार निवडून येतील, असा विश्वास वाटतो.
भाजपने 12 पैकी 8 ठिकाणी इतर पक्षांतील नेत्यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे निष्ठावंतांच्या नाराजीचा फटका बसणार नाही का, असे विचारले असता गांधी म्हणाले, ही नाराजी तत्कालिक असते. आता सर्व कार्यकर्ते भाजपच्याच उमेदवारांचा प्रचार करत आहेत. इतर पक्षांतील वजनदार उमेदवार आमच्याकडे आले. निवडून येण्याच्या निकषांवर त्यांना उमेदवारी देण्यात आली आहे. विशेष म्हणजे ज्या पक्षांतील लोक भाजपला शिव्या देत होते, तेच आमच्याकडे उमेदवारीसाठी येणे म्हणजे एकप्रकारे भाजपची लोकप्रियता सर्वाधिक असल्याचा पुरावा आहे. राज्यात भाजपचे सरकार येण्यासाठी जास्त जागा येणे आवश्यक आहे. त्यासाठी वेळप्रसंगी अशी तडजोड करणे चुकीचे नाही.
मोदी यांच्या सभेच्या तयारीबद्दल बोलताना गांधी म्हणाले, ही सभा महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या मैदानावर होत आहे. या मैदानाजवळच हेलिपॅड तयार करण्यात आले आहे. संपूर्ण जिल्ह्यातील लोक सभेला येणार आहेत. विद्यापीठाच्या डेअरीजवळ वाहनतळाची व्यवस्था करण्यात आली आहे. नगर-मनमाड महामार्गावरील रहदारीला कोणताही अडथळा निर्माण होणार नाही, याची सर्व काळजी घेण्यात येणार आहे. यावेळी बोलताना उमेदवार आगरकर म्हणाले, नगर शहर हा भाजपचा पारंपरिक बालेकिल्ला आहे. शहराचा विशेषत: उपनगरांचा विस्तार प्रचंड असला, तरी आतापर्यंत संपूर्ण मतदारसंघात दोनवेळा प्रचार फेऱ्या पूर्ण झाल्या आहेत. मतदारांचा प्रचंड प्रतिसाद लाभत असल्याचे त्यांनी सांगितले.
सभास्थळी सुरक्षेच्या दृष्टीने पाहणी
नाशिक विभागाचे पोलिस महानिरीक्षक प्रवीण साळुंके, पोलिस अधीक्षक लखमी गौतम, गुप्तचर यंत्रणा, तसेच अन्य सुरक्षा यंत्रणांनी बुधवारी सभास्थळाची पाहणी केली. पंतप्रधान मोदी यांच्या यंत्रणेची जबाबदारी नवी दिल्ली येथील विशेष विभागाकडे असून वाहनाचा ताफा दिल्ली व गुजरात येथील आहे. खासदार दिलीप गांधी यांनीही सभेच्या स्थळाची पाहणी करून व्यासपीठावरील बैठक व्यवस्थेबाबत सूचना केल्या. त्यांच्यासमवेत भाजपचे प्रांत सदस्य आसाराम ढूस होते.
5 लाखांच्या गर्दीची अपेक्षा
गेल्यावेळी मोदी यांची सभा नगरमध्ये झाली होती, तेव्हा दीड ते दोन लाख लोकांनी गर्दी केली होती. यावेळी मैदान मोठे असल्याने व महामार्गावर असल्याने लोकांना सोयीचे आहे. शिवाय संपूर्ण जिल्ह्यातील लोक येणार असल्याने यावेळी किमान पाच लाख लोक या सभेला येतील व ही सभा विक्रमी गर्दीची ठरेल, असा विश्वास खासदार दिलीप गांधी यांनी व्यक्त केला.

सभा राहुरीलाच का?
ही सभा संगमनेरला होणार होती. मात्र, मोदींच्या धास्तीने सभेचे मैदान विरोधकांनी आधीच बुक केले. त्यामुळे तेथील सभा रद्द करून इतरत्र घेण्याचे ठरले. जिल्ह्याच्या उत्तर व दक्षिण भागाला मध्यवर्ती व सोयीचे ठिकाण म्हणून राहुरीला सभा घेण्याचे निश्चित करण्यात आले. त्यामुळे जिल्ह्यातील लोकांना तेथे येणे सोयीचे होईल, असे खासदार गांधी यांनी सांगितले.