आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Mp Gandhi's Son Removed From Bhartiya Janta Yuva Morcha

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

भारतीय जनता युवा मोर्चाच्या कार्यकारिणीतून खासदार गांधी यांच्या मुलाची हकालपट्टी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
छायाचित्र: सुवेंद्र गांधी
नगर - खासदार दिलीप गांधी यांचे चिरंजीव नगरसेवक सुवेंद्र गांधी यांची भारतीय जनता युवा मोर्चाच्या शहर जिल्हाध्यक्ष पदावरून हकालपट्टी करण्यात आली. दोन उपाध्यक्षांसह आणखी चार पदाधिका-यांचीही उचलबांगडी करण्यात आली असल्याचे पत्रक भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष अॅड. अभय आगरकर यांनी सोमवारी प्रसिद्धीस दिले. तडकाफडकी झालेल्या या कारवाईने शहर भाजपमध्ये खळबळ उडाली आहे.

अॅड. आगरकर यांनी दिलेल्या पत्रकात म्हटले की, गेल्या काही दिवसांपासून पक्षाच्या संघटनात्मक बाबींचा जाहीर ऊहापोह काही पदाधिका-यांकडून सुरू आहे. त्यामुळे सदस्य नोंदणी अभियानात अडथळे येत आहेत. भाजप हा बळकट जनाधार व प्रामाणिक कार्यकर्त्यांची फळी असणारा पक्ष आहे. याच बळावर विधानसभा निवडणुकीत पक्षाने ४० हजार मते मिळवली. काही पदाधिका-यांच्या चुकीच्या वागण्यामुळे पक्षाच्या प्रतिमेवर प्रतिकूल परिणाम होत आहे. चुकीचे वागणा-या पदाधिका-यांची उचलबांगडी करण्यात आली आहे.

प्रजासत्ताक दिनी पक्ष कार्यालयात झालेल्या कार्यक्रमात पदाधिकारी व कार्यकर्त्यांना बोलावले नसल्याचा आरोप करून अॅड. आगरकर यांची पदावरून हकालपट्टी करण्याची मागणी शहर जिल्हा उपाध्यक्ष अनिल गट्टाणी व मनेष साठे यांनी केली होती. हकालपट्टीची मागणी करणा-या गट्टाणी व साठे यांनाच अॅड. आगरकर यांनी घरचा रस्ता दाखवला आहे.

खासदार गांधीशी असलेल्या अंतर्गत मतभेदातून सुवेंद्र गांधी यांची पदावरून उचलबांगडी करण्यात आली, तर िकशोर बोरा व प्रशांत मुथा यांना शहर जिल्हा सरचिटणीस पदावरून पायउतार करण्यात आल्याचे अॅड. आगरकर यांनी पत्रकाद्वारे कळवले आहे. प्रदेश भाजपने शहरात एक लाख सदस्य नाेंदणीचे लक्ष्य दिले आहे. सदस्य नोंदणी अभियानासंदर्भात सोमवारी सकाळी झालेल्या बैठकीत शहराचे दक्षिण, मध्य, उत्तर नगर व भिंगार असे चार विभाग करण्यात आले. दक्षिण नगरसाठी प्रमुख म्हणून जगन्नाथ निंबाळकर व सहप्रमुख म्हणून राजू एकाडे यांची निवड बैठकीत करण्यात आली. मध्य नगरसाठी प्रमुख म्हणून सचिन पारखी व सहप्रमुख म्हणून ज्ञानेश्वर काळे, उत्तर नगरसाठी प्रमुख म्हणून भय्या गंधे व सहप्रमुख म्हणून अशोक कानडे, तर भिंगारसाठी प्रमुख म्हणून महेश नामदे व सहप्रमुख म्हणून दामू माखिजा यांची निवड करण्यात आली. या बैठकीतच सुवेंद्र गांधी यांच्यासह पाच पदाधिका-यांना हटवण्याचा निर्णय घेण्यात आला.

त्यांना अधिकारच नाही
पक्षाच्या घटनेप्रमाणे प्रदेशाध्यक्षांच्या परवानगीशिवाय कुणाही पदाधिका-याला हटवता येत नाही. शहर जिल्हाध्यक्षांचा हा निर्णय बेकायदेशीर आहे. राष्ट्रवादीत फेरी मारून आलेल्यांनी आम्हाला पक्षनिष्ठा शिकवू नये. आम्ही तीन पिढ्यांपासून संघ व पक्षासाठी काम करत आहोत.'' अनिल गट्टाणी, पदच्युत शहर जिल्हा उपाध्यक्ष, भाजप.

नवनियुक्त पदाधिकारी
शहर जिल्हा उपाध्यक्ष - भय्या गंधे, जगन्नाथ निंबाळकर, शहर जिल्हा सरचिटणीस - सचिन पारखी, शहर जिल्हा चिटणीस - बाळासाहेब गायकवाड, उदय अनभुले, भाजयुमो शहर जिल्हाध्यक्ष - प्रवीण ढोणे.