आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सिंचन घोटाळ्याचे आरोप बिनबुडाचे, खासदार सुप्रिया सुळे यांचे अकोले येथील सभेत स्पष्टीकरण

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोले- राज्यात सिंचन क्षेत्रात 0.01 टक्केच वाढ झाली असेल, तर राज्याचे माजी कृषिमंत्री राधाकृष्ण विखे यांनी साखर उत्पादनात वाढ झाली. फळबागा वाढल्यात, द्राक्ष उत्पादन वाढलेय याचे गणित समजावून सांगावे. उसाला सर्वाधिक पाणी लागते. सिंचनात वाढ झाली नसती, तर ऊस गळीत व साखर उत्पादनात कशी काय वाढ झाली असती? असा सवाल खासदार सुप्रिया सुळे यांनी करून सिंचनावरील आरोप बिनबुडाचे असून जनतेने त्यावर विश्वास ठेवू नये, असे आवाहन केले.
अकोले येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार वैभव पिचड यांच्या प्रचारार्थ आयोजित जाहीर सभेत सुळे बोलत होत्या. अध्यक्षस्थानी अगस्ती कारखान्याचे उपाध्यक्ष सीताराम गायकर होते. माजीमंत्री मधुकर पिचड, वैभव पिचड, कैलास वाकचौरे, मधुकर नवले, गिरजाजी जाधव, कचरू शेटे, आशा पापळ, कुमुदिनी पोखरकर व्यासपीठावर उपस्थित होते. खासदार सुळे म्हणाल्या, शिवसेनेचे उद्धव ठाकरे म्हणतात की, दिल्लीवरून अफजलखानाच्या फौजा महाराष्ट्रात आल्या आहे. त्यांनी मोदीशेठ अफजलखान आहेत की अमित शहा हे स्पष्ट करावे. या अफजलखानाच्या दरबारात तुमचा खासदार मंत्री कसा काय आहे? असा सवालही त्यांनी केला. छत्रपती शिवाजी महाराजांची नावे घेऊन मते मागण्याचा सपाटा लावलेल्यांनी छत्रपतींसाठी काहीच केलेले नाही. अकोले तालुक्यातील पाचपट्टा किल्ल्यावर पिचड यांच्या माध्यमातून शिवसृष्टी निर्माण करण्याचे काम सुरू आहे. ते पूर्ण करण्याचे काम पुढे वैभवच्या हाताने होईल. युतीच्या घटस्फोटाबाबत बोलताना सुळे म्हणाल्या,25 वर्षे एकत्र संसार केला. तेव्हा देवेंद्र फडणवीसांना छत्रपतींच्या नावावर शिवसेनेने खंडणी घेतल्याचे दिसले नाही का? आता खंडणीची वाटणी 60.40 ऐवजी 50.50 वर पोहोचल्यानेच संसार मोडलाय का? याचे उत्तर भागीदारीवरून भांडणे झाल्यानेच आहे.
पक्षाने नवीन चेहरा अकोल्यात दिला आहे. त्यांच्या वडिलांनी तालुक्यात विकासाची अनेक कामे केली आहेत. सिंचनाची सर्व कामे झाली आहेत. आताही मधुकर पिचड यांच्यावरच विश्वास ठेवून वैभवला निवडून दिले, तर मी बारामतीवरून 25 पोते गुलालाची इकडे पाठवून देईल. सुसंस्कृत महाराष्ट्रासाठी पवार साहेबांनी पाहिलेले स्वप्न साकार करण्यासाठी राष्ट्रवादीला मतदान करून सामाजिक परिवर्तनाला साथ करा, असे आवाहन खासदार सुळे यांनी केले. प्रास्ताविक मीनानाथ पांडे यांनी, तर सूत्रसंचालन यशवंत आभाळे यांनी केले.

त्यांना मतदार टाळतील
केंद्रात भाजपचे सरकार येऊन पाच महिने झालेत. मात्र, आजपर्यंत तुम्हाला पाच पैसे तरी मिळाले आहेत का? त्यांनी 25 नाही 50 सभा घेतल्या, तरी महाराष्ट्रातील जनता त्यांना मतदान करणार नाही, असे सुळे म्हणाल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा सुळे यांनी मोदीशेठ असाच उल्लेख केला.