आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

राज्य सेवा पूर्व परीक्षेसाठी प्रशासनाची जय्यत तयारी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर: राज्य लोकसेवा आयोगाच्या वतीने घेण्यात येणारी राज्य सेवा पूर्व परीक्षा येत्या रविवारी (10 जून) नगर शहरातील 36 उपकेंद्रांवर घेण्यात येणार आहे. या परीक्षेसाठी प्रशासनाने जय्यत तयारी केली आहे. जिल्ह्यातील एकूण 12 हजार 144 उमेदवार या परीक्षेत आपले नशीब अजमावणार आहेत.
या परीक्षेचे केंद्रप्रमुख म्हणून निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. सदानंद जाधव काम पाहत आहेत. नगर शहरातील एकूण 36 उपकेंद्रांवर (शाळा/महाविद्यालयांत) या परीक्षेची बैठक व्यवस्था करण्यात आली आहे. उमेदवारांना साडेदहा वाजता तेथे प्रवेश दिला जाईल. अकरानंतर येणार्‍यांना प्रवेश दिला जाणार नाही.
उत्तरे लिहिण्यासाठी फक्त काळ्या शाईचे बॉलपेन वापरणे आवश्यक आहे. डिजिटल डायरी, मोबाइल, पेजर, मायक्रोफोन यासारखी साधने परीक्षा केंद्राच्या परिसरात व दालनात आणण्यास मनाई करण्यात आली आहे. या सूचनेचे उल्लंघन करणार्‍याला या व यापुढील आयोगाच्या कोणत्याही परीक्षेला बसता येणार नाही. प्रत्येक उपकेंद्रावर पोलिस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. 100 मीटर अंतरापर्यंत एसटीडी बूथ, फॅक्स व झेरॉक्सची दुकाने बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. परीक्षेच्या दिवशी सकाळी 10 ते दुपारी 1 पर्यंत उपकेंद्रापासून 100 मीटरपर्यंतच्या परिसरात जमावबंदी आदेश लागू करण्यात आला आहे. उमेदवारांची प्रवेशपत्रे ऑनलाइन उमेदवारांच्या प्रोफाइलवर उपलब्ध करून देण्यात आली आहेत. परीक्षेपूर्वी तीन दिवस प्रवेशपत्र प्राप्त न झाल्यास आवश्यक पुराव्यासह आयोगाच्या विक्रीकर भवन (माझगाव) शाखेत संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. उमेदवारांनी प्रवेशपत्र संकेतस्थळावरून घ्यावे, दुय्यम प्रवेशपत्र जिल्हाधिकारी कार्यालयातून देण्यात येणार नाही, असे प्रशासनाने स्पष्ट केले.