आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘मुळा’ २५, तर ‘भंडारदरा’ २६ टक्के भरले

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भंडारदरा - भंडारदरा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात शुक्रवार सायंकाळपासून पावसाने जोर पकडल्याने या भागातील ओढ्या-नाल्यांना पूर आला आहे. परिणामी शनिवारी सकाळी ते सायंकाळी सहा या १२ तासांत ४२९ दशलक्ष घनफूट नवीन पाण्याची आवक झाली. त्यामुळे धरणाच्या पाणीसाठ्यात वेगाने वाढ होऊन तो हजार ७७६ दशलक्ष घनफुटांपर्यंत पोहोचला. मुळा धरणाच्या पाणलोट क्षेत्रातही तुफान पाऊस असल्याने धरणात ३० हजार क्युसेक आवक सुरू असून पाणीसाठा सायंकाळी हजार २८० दशलक्ष घनफुटांवर पोहोचला. पावसाचा जोर कायम असल्याने रविवारी सकाळपर्यंत पाणीसाठा २६ टक्क्यांचा आकडा पार करण्याची शक्यता ‘मुळा’च्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केली.

बुधवारी गुरुवारी या भागात पावसाचा जोर कमी झाल्याने लाभक्षेत्रात चिंतेचे वातावरण होते. मात्र, शुक्रवारपासून पुन्हा धुवांधार पाऊस बरसू लागल्याने पाणलोट लाभक्षेत्राला दिलासा मिळाला. शुक्रवारपासून खऱ्या अर्थाने या भागातील चिरपरिचित पाऊस सुरू झाल्याची प्रतिक्रिया आदिवासी शेतकऱ्यांनी व्यक्त केली.

भंडारदरा परिसरात शनिवारी दिवसभर ६४ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. घाटघर, साम्रद, रतनवाडी उडदावणे, पांजरे येथे त्याच्या दुपटीहून अधिक पाऊस झाला आहे. त्यामुळे १२ तासांत भंडारदरा धरणात ४६४ दशलक्ष घनफूट पाण्याची आवक झाली. निळवंडे धरणातही या पावसाळ्यात प्रथमच शनिवारी दिवसभरात ७० दशलक्ष घनफुटांची आवक झाली. वाकी नदीचा प्रवाह १५७४ क्युसेक होता. हे सर्व पाणी निळवंडे धरणात जात आहे.

विद्युतगृहासाठी पाणी सोडले
मुळाभंडारदरा धरणांच्या पाणलोट क्षेत्रातील जोरदार पावसामुळे निश्चिंत होऊन विद्युतगृहासाठी ७५९ क्युसेक पाणी सोडण्यात आले. त्यातून १२ मेगावॅट विजेची निर्मिती सुरू होऊन हे पाणी पुन्हा नदीत जात आहे. निळवंडे धरणात या पाण्याची, तसेच वाकी कृष्णावंती नदीतून पाण्याची आवक सुरू झाली आहे.

दुसरा शनिवार हा सुटीचा दिवस असल्याने पर्यटकांनी सकाळपासून पाऊस अनुभवण्यासाठी या भागात गर्दी केली होती. शेतांमधून लहान मोठे धबधबे वाहत असल्याने त्यात भिजण्याचा त्यांनी आनंद लुटला. शेंडी ते घाटघर घाटघर ते रतनवाडीमार्गे भंडारदरा या रस्त्यांवर सर्वत्र पर्यटकांची गर्दी झाली होती. आगामी काळात पर्यटकांची गर्दी आणखी वाढणार आहे.

भात लागवडीला वेग
जोरदारपावसामुळे परिसरातील शेतकऱ्यांत उत्साहाचे वातावरण आहे. त्यामुळे आदिवासी शेतकऱ्यांनी रोपे उपटून त्यांची लागवड सुरू केली आहे. घाटघर परिसरात भात लागवड पूर्णही झाली आहे. कळसूबाईच्या पायथ्याशी असलेल्या पेंडशेत, बारी परिसरात, तसेच मुळाच्या पाणलोट परिसरातील कोथळे, पाचनई, पेठेचीवाडी आदी गावांत भात लागवडीला वेग आला आहे.

‘मुळा’च्या पाणलोटात तुफान वृष्टी
मुळानदीच्या पाणलोट क्षेत्रातील हरिश्चंद्रगड परिसरातही जोरदार पाऊस सुरू आहे. शनिवारी सकाळी कोतूळजवळ मुळा नदीचा प्रवाह साडेचार हजार क्युसेक होता. तो दिवसभरात वाढत जाऊन सायंकाळी ३० हजार क्युसेकवर पोहोचला. हे सर्व पाणी वेगाने मुळा धरणात येत आहे. रविवारी सकाळपर्यंत मुळा धरणाचा पाणीसाठा सात हजार दशलक्ष घनफुटांपर्यंत जाण्याची शक्यता आहे.

धरणांतील पाणीसाठा (आकडे दशलक्ष घनफुटांत)
भंडारदरा: २८८८ दशलक्ष घनफूट (शनिवारी सायंकाळी सहापर्यंत), मुळा : ६२२४ दशलक्ष घनफूट, निळवंडे : ६८३. गेल्या १२ तासांतील पाऊस : शनिवारी नोंदवलेला पाऊस पुढीलप्रमाणे (पावसाचे आकडे मिलिमीटरमध्ये, कंसात आतापर्यंतचा पाऊस): घाटघर : ७५ (९२०), पांजरे : ४८ (५८२), रतनवाडी : ६६ (८३२), वाकी : ३६ (४८६), शनिवारी सायंकाळी नोंदवलेला पाऊस भंडारदरा : ६४ (४२८).
बातम्या आणखी आहेत...