आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

"जायकवाडी धरणाला पाणी जाऊ देणार नाही'

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
श्रीरामपूर- मुळा व भंडारदरा धरणातून जायकवाडीसाठी पाणी जाऊ देणार नाही, अशी भूमिका आपण घेतली आहे. त्यासाठी व्यापक जनआंदोलन उभारणार आहोत. सर्व राजकीय पक्षांनी यात सहभागी व्हावे, असे आवाहन खासदार सदाशिव लोखंडे यांनी शनिवारी केले. लोखंडे यांनी श्रीरामपूरला भेट दिली. यावेळी पत्रकारांशी संवाद साधला. मतदारसंघातील विजेचा प्रश्न, पाणी, रेल्वे, घरकूल, परिवर्तन केंद्र, रस्ते आदी विषयांवर चर्चा केली. जायकवाडी धरणात पिण्याच्या पाण्याची आवश्यकता असल्याने गेल्या वर्षी पाणी दिले. आता धरणात पाणीसाठा चांगला आहे. जायकवाडीतून शेतीची आवर्तने सोडण्यात आली. पिण्याच्या पाण्याची अडचण नसताना जिल्ह्यातील धरणातून पाणी सोडण्याचा अट्टहास का केला जातो. आता पाणी सोडण्यास आपला विरोध आहे. त्यासाठी आपण मोठ्या स्वरूपाचे आंदोलन उभारणार आहोत, असा इशारा दिला.
शिर्डी लोकसभा मतदारसंघात अनेकवेळा विविध सामाजिक मागण्यांसाठी राजकीय कार्यकर्त्यांनी जनआंदोलन केले होते. अशा आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांवर दाखल झालेल्या केसेस सरकारने निकाली काढाव्यात, अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे लोखंडे यांनी केली. मुळा-प्रवरा वीज संस्था, निळवंडे, भंडारदरा, गोदावरी, मुळा धरणातील पाणीवाटप, रस्त्यांची दुरुस्ती, नवीन रस्ते, वीजपुरवठा, भंडारदराचे पाणी जायकवाडी धरणात सोडण्यासाठी उपोषण केले होते. पोलिसांनी अशा आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांविरुद्ध गुन्हे दाखल केले होते. हे गुन्हे काढून घ्यावेत, अशी मागणी केल्याची माहिती त्यांनी दिली. यावेळी अशोक थोरे, राजेंद्र देवकर, सचिन बडदे आदी उपस्थित होते.
अधिका-यांना सूचना
भंडारदरा धरणातून शेतीसाठी आवर्तन सुटणार आहे. हे पाणी प्रथम टेलच्या शेतकऱ्यांना मिळाले पाहिजे. नंतर टप्प्याटप्प्याने पाणी वितरित करावे. शेतीची सर्व भरणे झाल्याशिवाय धरणातून पाणी बंद करू नये, अशा सूचना त्यांनी अधिका-यांना दिल्याचे त्यांनी सांगितले.