आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुळा धरणाच्या उपयुक्त साठ्यात वाढ, 28 टक्के पाणी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - शहराला पाणीपुरवठा करणा-या मुळा धरणात गेल्या आठवड्यापासून नव्या पाण्याची भर पडत असल्याने साठा 28 टक्के झाला आहे. गेल्या आठवड्यात दोन टक्क्यांपर्यंत घसरलेला उपयुक्त पाणीसाठा बुधवारी 12 टक्क्यांच्या वर पोहोचला. पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या कमी-अधिक पावसामुळे येणा-या पाण्यातही चढउतार होत आहे.

मुळा धरणाची एकूण साठवण क्षमता 26 टीएमसी (26 हजार दशलक्ष घनफूट) आहे. यातील साडेचार टीएमसी मृतसाठा आहे. गेल्यावर्षी धरणात 22 हजार 623 दशलक्ष घनफूट पाणी जमा झाले होते. गेल्या वर्षभरात सिंचनासाठीचे रब्बी व उन्हाळी आवर्तन, पाणी योजना व बाष्पीभवनात 17 हजार 750 दशलक्ष घनफूट पाणी वापरले गेले. त्यामुळे जुलैच्या मध्यावर धरणात अवघे दोन टक्के उपयुक्त पाणी शिल्लक होते. पाणीपातळी 1754 फुटांपर्यंत खाली आली होती. पाऊस लांबल्यास नगर शहरावर पाणीकपातीचे संकट घोंगावत होते. मात्र, गेल्या आठवड्यात धरणाचे पाणलोट क्षेत्र असलेल्या अकोले जिल्ह्यातील कोतूळ परिसरात पावसाने जोर धरला. सुरुवातीला चार क्युसेक्स वेगाने येणारे पाण्याने नऊ हजार क्युसेक्सची पातळी ओलांडली होती. मात्र, पावसाचा जोर ओसरल्याने येणा-या पाण्याचा वेग मंदावला आहे.

आठवडाभरात अडीच टीएमसीपेक्षा अधिक नवे पाणी धरणात आले आहे. त्यामुळे नगर शहरावरील पाणीकपातीचे संकट टळले आहे. बुधवारी सायंकाळी सहापर्यंत धरणात मृतसाठ्यासह 7 हजार 105 टीएमसी पाणीसाठा आहे. सध्या धरणात 2 हजार 605 दशलक्ष घनफुट उपयुक्त पाणीसाठा जमा झाला आहे. बुधवारी सकाळी 3822 क्युसेक्स वेगाने आवक सुरू होती. धरणात 6 हजार 822 दशलक्ष घनफूट पाणी होते. सायंकाळी सहापर्यंत त्यात 283 दशलक्ष घनफूट नव्या पाण्याची भर पडली आहे. सायंकाळी पाण्याची आवक वाढून 4227 क्युसेक्सवर पोहोचली. पाणीपातळी 1764.40 फूट झाली आहे. नवीन पाण्यामुळे पाणीपातळी दहा फुटांनी वाढली आहे. पाण्याची आवक लक्षात घेता किमान पाणी योजनांना अडचण जाणवणार नाही. येत्या काही दिवसांत चांगला पाऊस झाल्यास टंचाईचे सावट दूर होऊ शकेल.

कमी-अधिक आवक
पाणलोट क्षेत्रात सुरुवातीला पावसाचा जोर चांगला होता. त्यामुळे आवकही वाढली. मात्र, सध्या पाणलोट क्षेत्रात रिमझिम पाऊस सुरू आहे. परिणामी मुळा नदीपात्रात पाण्याची आवक कमी-अधिक होत आहे. कोतूळ, हरिश्चंद्रगड परिसरात बुधवारी 19 मिलिमीटर पाऊस झाला. पावसाचा जोर वाढल्यास आवकही वाढेल.’’
आर. एम. कांबळे, अभियंता, मुळा धरण.

लाभक्षेत्रातील चिंता कायम
मुळा धरणात समाधानकारक पाणीसाठा होऊ शकलेला नाही. त्यामुळे लाभक्षेत्रात चिंतेचे वातावरण आहे. लाभक्षेत्रातही समाधानकारक पाऊस नसल्याने सिंचनासाठी पाण्याची गरज भासणार आहे. मात्र, धरणातच पाणी येत नसल्याने रब्बी व उन्हाळी आवर्तनाचा प्रश्न कायम आहे. कमी पाणीसाठ्याचा दोन्ही आवर्तनांना फटका बसण्याची शक्यता आहे.

आकडेवारी (दलघफू)
धरणाची एकूण क्षमता : 26000
मृतसाठा : 4500
सध्याचे जमा पाणी : 7105
उपयुक्त पाणी : 2605