आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुळा धरणावर सी-प्लेन सेवा १५ सप्टेंबरपासून

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
राहुरी - बहुचर्चित मुंबई ते मुळा धरण या सी-प्लेन सेवेला येत्या १५ सप्टेंबरपासून सुरुवात होणार आहे. ही सेवा सुरू करण्यासाठीचे सर्व अडथळे आता दूर झाले असल्याचे मेहेर कंपनीच्या वतीने शुक्रवारी सांगण्यात आले.

मुंबई येथील मेहेर कंपनीच्या वतीने मुळा धरणावरून सी-प्लेन सेवा सुरू करण्यासाठी दीड वर्षापासून प्रयत्न सुरू होते. एमटीडीसी व मेहेर कंपनीच्या वतीने जुहू ते मुळा धरण अशी ही सेवा सुरू होणार आहे. शासकीय मंजुरीविना ही प्रक्रिया रखडली होती. येत्या २५ ऑगस्टपासून मुंबई ते लोणावळा ही सी-प्लेन सेवा सुरू होणार आहे. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात मुंबई ते मुळा धरण अशी सेवा सुरू होईल. या पंधरा आसनी सी-प्लेन सेवेला १५ सप्टेंबरपासून सुरुवात होईल, अशी माहिती मेरीटाईम हेली सर्व्हिसचे (मेहेर) संचालक सिद्धार्थ वर्मा दिली. यापूर्वी ११ मार्च रोजी या सेवेची यशस्वी चाचणी मुळा धरणावर कंपनीच्या वतीने घेण्यात आली होती. आता ही सेवा १५ सप्टेंबरपासून पर्यटकांच्या सेवेत दाखल होणार आहे. अवघ्या ३५ मिनिटांत मुंबई ते मुळा धरण हे अंतर पार करता येईल. मुळा धरणानंतर महाबळेश्वर (पाचगणी), गंगापूर (नाशिक), धोम व भंडारदरा येथे ही सेवा सुरू करण्यात येणार आहे, अशी माहिती मेहेरचे संचालक वर्मा यांनी दिली.
पर्यटनविकासाकडे अजूनही दुर्लक्ष
मुळा धरणावरील सी-प्लेन सेवा लवकरच सुरू होणार असली, तरी जिल्ह्याचा पर्यटन विकास आराखडा अजून कागदावरच आहे. पर्यटकांसाठी आवश्यक असलेल्या सुविधा, तसेच पर्यटनस्थळांची माहिती देण्यासंदर्भात भरीव पावले टाकण्याची गरज असताना त्याबाबत सध्या उदासीनता आहे. सर्किट टुरिझमलाही चालना मिळण्याची गरज आहे. तसे झाले तरच सी-प्लेन सेवेचा नगर शहर व जिल्ह्याला फायदा होऊ शकेल.