आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘मुळा’तून खरिपासाठी आवर्तन सोडण्याची तयारी; पिण्याच्या पाण्यासाठी विसर्ग सुरू

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - मुळा धरणातून खरीप पिकांसाठी आवर्तन सोडण्याची तयारी सुरू आहे. यासंदर्भात वरिष्ठ स्तरावरून सोमवारी किंवा मंगळवारी (18, 19 ऑगस्ट) निर्णय होण्याची शक्यता आहे. मराठवाड्यासाठी पाणी सोडण्याची वेळ येण्यापूर्वीच आवर्तनासाठी पाण्याचा वापर करण्याचा दबाव स्थानिक प्रशासनावर आहे, तर लाभक्षेत्रातील शेतकर्‍यांच्या गरजेचा विचार करूनही आवर्तन सुरू होण्याची शक्यता आहे.

पावसाअभावी जुलैच्या पहिल्या पंधरवड्यात मुळा धरणाने तळ गाठला होता. उपयुक्त पाणीसाठ्याची पातळी दोन टक्क्यांच्याही खाली आली होती. त्यानंतर पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर वाढल्याने धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ झाली. रविवारी दुपारी धरणाचा पाणीसाठा 18 हजार 800 दशलक्ष घनफुटांपर्यंत (72.30 टक्के), तर उपयुक्त पाणीसाठा 57.20 टक्क्यांवर पोहोचला आहे. पाणलोट क्षेत्रात सध्या पावसाचा जोर ओसरल्याने आवक मंदावली आहे. रविवारी सकाळी 1513 क्युसेकने पाण्याची आवक सुरू होती. ऑगस्टच्या सुरुवातीला विक्रमी 24 हजार क्युसेकपर्यंत आवक वाढली होती. पाणलोट क्षेत्राच्या उलट लाभक्षेत्रात पावसाने दडी मारल्याने खरीपाची पीके धोक्यात आली आहेत.
पाटबंधारे विभागाच्या स्थानिक अधिकार्‍यांशी संपर्क साधला असता खरीप पिकांसाठीच्या आवर्तनाबाबत गेल्या पाच वर्षांचा आढावा वरिष्ठ कार्यालयाला पाठवला आहे. त्यांच्याकडून निर्णय आलेला नसल्याची माहिती देण्यात आली. एक-दोन दिवसांत निर्णय येण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली. दोन वर्षांपूर्वी आवर्तन सोडण्यासाठी आमदारांनी आंदोलने केली होती. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुळाचे पाणी पुन्हा पेटण्याची शक्यता आहे.

मुळा धरणाच्या डाव्या कालव्यातून 230 क्युसेकने मुसळवाडी तलावासाठी पाणी सोडण्यात आले. हे आवर्तन पिण्याच्या पाण्यासाठीचे आहे. शनिवारी (16 ऑगस्ट) सकाळी सहा वाजता हे पाणी सोडण्यात आले आहे.

दरम्यान, जलसंपत्ती अधिनियमाच्या गेल्या वर्षीच्या नियमानुसार मुळा धरणातून जायकवाडी धरणासाठी पाणी सोडावे लागण्याची शक्यता आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशामुळेही गेल्या वर्षी पाणी सोडण्याची वेळ आली नाही. हे प्रकरण न्यायप्रविष्ट असले तरी 15 ऑक्टोबरला जायकवाडीत उपयुक्त पाणीसाठा 33 टक्क्यांच्या खाली असेल. नियमानुसार पाणीटंचाई दर्शवून पाणी सोडण्याची मागणी होणार आहे.
दोन दिवसांत निर्णय होईल
लाभक्षेत्रातील खरीप पिके धोक्यात आली आहेत. आवर्तन सोडण्याची मागणी केली आहे. जिल्हाधिकार्‍यांकडे निवेदन देणार आहोत. पाटबंधारे विभागाच्या अधिकार्‍यांनी खरीप पिकांसाठी आवर्तन सोडण्याचा निर्णय 21 ऑगस्टपर्यंत होणार असल्याची माहिती दिली आहे. आवर्तनासोबतच वांबोरी चारीतही पाणी सोडण्याच्या मागणीची पुर्तता व्हावी.’’
शिवाजी कर्डिले, आमदार