आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

"मुळा'तून १६ तास आधीच सोडले पाणी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - जिल्ह्यातील धरणांमधून "जायकवाडी'ला पाणी सोडण्यास होत असलेला तीव्र विरोध झुगारून सरकारने याप्रकरणी दबावतंत्राचा वापर सुरू केला आहे. भंडारदरा व मुळा धरणातून जाहीर केलेल्या वेळेपेक्षा एक दिवस आधीच पाणी सोडण्यास पाटबंधारे विभागातील अधिकाऱ्यांना भाग पाडण्यात आले. परिणामी लाभक्षेत्रातील शेतकरी व नेत्यांमध्ये संताप वाढला आहे. आंदोलनाची तीव्रता वाढण्याची शक्यता आहे. मुळा धरणातून सोमवारी दुपारी दोन वाजता नदीपात्रात पाणी सोडण्यास सुरुवात करण्यात आली. येत्या चार दिवसांत मुळा धरणातून साडेतीन टीएमसी पाणी "जायकवाडी'त जाणार आहे.

मुळा धरणातून "जायकवाडी'साठी मंगळवारी (९ डिसेंबर) सकाळी सहा वाजता पाणी सोडण्याचे नियोजन करण्यात आले होते. मात्र, सोमवारी दुपारी दोन वाजता धरणाच्या दरवाजातून अचानक पाणी सोडण्यात आले. नियोजनाच्या १६ तास आधीच पाणी सोडण्याचा दबाव अधिकाऱ्यांवर आणण्यात आल्याचे यातून स्पष्ट झाले आहे. दुपारी तीन वाजता विसर्ग वाढवून १९२५ क्युसेक वेगाने मुळा नदीपात्रात पाणी सोडण्यात आले. याच वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू राहिल्यास आणखी चार दिवसांत निश्चित केलेले साडेतीन टीएमसी पाणी जायकवाडीकडे जाणार आहे. नदीपात्रातील ओलावा, थंडीचे दिवस यातून जवळपास सव्वादोन ते अडीच टीएमसी पाणी "जायकवाडी'त पोहोचण्याचा अंदाज आहे. भंडारदरा धरणातून जायकवाडीसाठी पाणी सोडतानाही अशीच घाई करण्यात आली. "भंडारदरा'तून सोमवारी सकाळी सहा वाजता पाणी सोडण्याचे नियोजन होते. मात्र, रविवारी "भंडारदऱ्या'तून पाणी सोडण्यात आले. "निळवंडे'तून हे पाणी पुढे "जायकवाडी'ला जाणार आहे.

लाभक्षेत्रात ठिकठिकाणी सोमवारी आंदोलने, रास्ता-रोको करण्यात आले. तर नदीपात्रातील बंधाऱ्यांचे दरवाजे काढण्यासही विरोध करण्याचा प्रयत्न झाला. हा विरोध मोडून काढण्यासाठी पोलिसांची मदत घेण्यात आली. पोलिसांचा फौजफाटा तैनात असल्याने दरवाजे हटवण्यात पाटबंधारे विभागाला विरोध झाला नाही. न्यायालयाचा आदेश धाब्यावर बसवून पाणी सोडण्याचा निर्णय झाल्याने लाभक्षेत्रात तीव्र संतापाची लाट आहे.