आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मराठी चित्रपट मुंबई-पुण्यातच नव्हे, तर राज्यात चालावे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- केवळमुंबई-पुण्यात मराठी चित्रपट चालतात, महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात मराठी चित्रपट चालत नाहीत. ते चालले पाहिजेत, त्यासाठी त्या भागात चांगले चित्रपटगृहे तयार झाली पाहिजे, अशी अपेक्षा एलिझाबेथ एकादशी या चित्रपटाचे दिग्दर्शक परेश मोकाशी यांनी व्यक्त केली.
स्नेहालयतर्फे आयोजित करण्यात आलेल्या सांगड संमेलनासाठी मोकाशी नगरमध्ये आले असता, त्यांनी "दिव्य मराठी' शी संवाद साधला. ते म्हणाले, मराठी चित्रपट पाहण्यासाठी मुंबई, पुण्यात प्रेक्षक चांगली गर्दी करतात. मात्र, महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात असे चित्र पहावयास मिळत नाही. बहुतांश चित्रपट हे ग्रामीण भागातील कथेवर आधारित असताना देखील ग्रामीण भागातीलच प्रेक्षक चित्रपटगृहात हे चित्रपट पाहण्यासाठी जात नाहीत. बहुदा ग्रामीण भागात मल्टिप्लेक्स चित्रपटगृह नसल्यामुळे प्रेक्षक चित्रपट पाहण्यासाठी येत नसावेत. चित्रपटांसाठी दिल्या जाणाऱ्या अनुदानाला माझा वैयक्तिक विरोध आहे, असे ते म्हणाले.
उद्योग-व्यवसायाला अनुदान दिले जात नाही, मग चित्रपटाला का अनुदान? यात सरकारचा हेतू चांगला असला, तरी अनेक जण कमी बजेटमध्ये चित्रपट तयार करून अनुदानाची पूर्ण रक्कम घेतात हे योग्य नाही. महाराष्ट्रात वर्षाला १७७ ते २०० मराठी चित्रपट तयार होतात. त्यापैकी अवघे तीन किंवा चार चित्रपट कोट्यवधींचा व्यवसाय करतात. उर्वरित दीडशेहून अधिक चित्रपटांच्या बाबतीत मात्र तसे होत नाही. मराठीत फँड्री, लई भारी, दुनियादारी हे चित्रपट आले.
या चित्रपटांचा प्रेक्षकवर्ग हा वेगळा आहे. त्यामुळे या चित्रपटांना यश मिळाले.
मराठी प्रेक्षक हा प्रगल्भ आहे. मुंबई-पुण्यातील प्रेक्षक चित्रपटगृहात जाऊन चित्रपट पाहतात. मात्र, बीड, नगर, आैरंगाबाद, नागपूर या भागातील प्रेक्षक हा चित्रपटगृहात जाऊन चित्रपट पहात नाही. मी चित्रपट क्षेत्रात आहे, नाव आहे, चित्रपट, नाटके करतो ते सर्व ठीक आहे. पण अनेकजण पाणी, पर्यावरण यासह अन्य सामाजिक विषयांवर काम करतात, त्यांचे काम माझ्या कामाहून मोठे आहे. चित्रपट क्रिकेट याला जास्त प्रसिद्धी दिली जाते. मात्र, सामाजिक कार्य करणाऱ्या संस्था लोकांना त्यांच्या कामाच्या तुलनेत कमी प्रसिद्धी दिली जाते. हे चित्र कुठतरी बदलले पाहिजे.
वेग‌ळ्या आशयावरील हिंदी सिनेमा करतोय
"एलिझाबेथएकादशी'नंतर आता हिंदी चित्रपट तयार करण्याचे काम सुरू केले आहे. "हिर रांझा की भय कथा' असे या चित्रपटाचे नाव आहे. भारत-पाकिस्तान सीमे‌वर असलेल्या परिस्थितीवर आधारित हा चित्रपट आहे. वेगळ्या आशयावर आधारित असलेला हा चित्रपट प्रेक्षकांना नक्कीच आवडेल, असा विश्वास मोकाशी यांनी यावेळी व्यक्त केला.