आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शहर पाणी वितरणाचे नियोजन कोलमडले, महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- वाढते अनधिकृत नळजोड, त्यामुळे कमी दाबाने होणारा पाणीपुरवठा, तसेच पाणी वितरणाचे ढिसाळ नियोजन यामुळे शहरात मागील काही दिवसांपासून पाणीटंचाई निर्माण झाली आहे. केडगाव, मुकुंदनगर व सावेडी उपनगरात हा प्रश्न अधिक गंभीर आहे. महापालिका प्रशासन मात्र सर्व काही आलबेल असल्याचे सोंग आणत आहे. पदाधिकारी व नगरसेवकही पाणीप्रश्नाबाबत गंभीर नसल्याने नागरिक हवालदिल झाले आहेत.
महापालिकेचा पाणीपुरवठा विभाग मनमानी पध्दतीने पाणी वितरण करत असल्याने नागरिकांची मोठ्या प्रमाणत गैरसोय होत आहे. ठरावीक भागात जास्त वेळ, तर काही भागात जाणीवपूर्वक कमी प्रमाणात पाणी सोडणे, नागरिकांना पूर्वकल्पना न देता पाणी सोडण्याच्या वेळा बदलणे, नागरिकांशी हुज्जत घालणे असा मनमानी कारभार सध्या पाणीपुरवठा विभागाकडून सुरू आहे. पदािधकारी व नगरसेवकही त्याकडे दुर्लक्ष करत आहेत. नियमित पाणीपट्टी भरूनही पुरेसे पाणी मिळत नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला आहे. शहरातील अनेक अंतर्गत जलवाहिन्यांना ठिकठिकाणी गळती लागली आहे. त्यामुळे दूषित पाणीपुरवठ्याचे प्रमाण वाढले आहे. शिवाय अनधिकृत नळजोडांचे प्रमाणही दिवसेंदिवस वाढत आहे. शहरातील मालमत्तांची संख्या दीड लाखाच्या पुढे गेली आहे. अधिकृत नळजोडांची संख्या मात्र अजूनही 45 हजार एवढीच आहे. त्यामुळे इतर मालमत्ताधारकांना पाणी कुठून व कसे मिळते, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. महापालिका प्रशासन मात्र सर्व काही माहिती असूनही गप्प आहे. अनधिकृत नळ कनेक्शनच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. त्याचा फटका नियमित पाणीपट्टी भरणाऱ्या नागरिकांना बसत आहे. त्यांच्या वाट्याचे हजारो लिटर पाणी अनधिकृत नळजोडधारक पळवत आहेत. अनेक भागातील अंतर्गत जलवाहिन्यांवर मर्यादेपेक्षा जास्त जोड झाले आहेत. त्यामुळे प्रत्येक नळाला कमी दाबाने पाणीपुरवठा होतो. पुरेसे पाणी मिळावे, यासाठी नागरिक सर्रास नळांना इलेक्ट्रीक मोटार जोडून पाणी भरतात.
पाणी वितरणाचे योग्य नियोजन केल्यास आहे त्या परिस्थितीत नागरिकांना मुबलक पाणी मिळू शकते. परंतु सुस्तावलेल्या पाणीपुरवठा विभागामुळे पाणी वितरणाच्या नियोजनाचा बोजवारा उडाला आहे. नळांना विद्युत मोटार जोडून पाणी भरणा-यांवर दंडात्मक कारवाई करण्यात येईल, असे प्रशासनाकडून वारंवार सांगण्यात येते. प्रत्यक्षात मात्र ही कारवाई कधीच होत नाही. प्रशासनाच्या या गलथानपणामुळेच वारंवार पाणीटंचाई निर्माण होत असून पदािधकारी व नगरसेवकांनी त्याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी नागरिक करत आहेत.
"फेज 1' ची प्रतीक्षा
केडगावसाठी स्वतंत्र पाणी योजना हाती घेण्यात आली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेले या योजनेचे काम आता अंतिम टप्प्यात आहे. नवीन सहा हजार नळजोड दिल्यानंतर योजना कार्यान्वित होणार आहे. आतापर्यंत केडगावकरांना पाण्यासाठी दाहीदिशा फिरावे लागले. आता योजना सुरू होणार असल्याने येथील नागरिकांना मुबलक पाणी मिळणार आहे. त्यासाठी त्यांना आता अवघ्या काही महिन्यांचीच प्रतीक्षा करावी लागणार आहे. तथापि, त्यासाठी केडगावकरांनाच भुर्दंड बसणार आहे.
कर्मचारी सत्कार समारंभात
आमदार संग्राम जगताप यांचा महापालिकेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या वतीने शनिवारी सत्कार करण्यात आला. पाणीपुरवठा विभागप्रमुख परिमल निकम यांच्याकडे कार्यक्रमाच्या नियोजनाची जबाबदारी होती. शहरातील विविध भागात पाणीप्रश्न निर्माण झाला असतानाही निकम यांनी सर्व व्हॉल्वमन व कर्मचाऱ्यांना कार्यक्रमास हजर राहण्याचे आदेश दिले. शिवाय इतर विभागातील अधिकारी कर्मचारीदेखील कार्यालयास टाळे लावून या कार्यक्रमास शनिवारी हजर होते.