आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Municipal Commissioner Vijay Kulkarni Latest News In Divya Marathi

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आयुक्तांच्या विरोधात न्यायालयात फिर्याद, नियमबाह्य फर्निचर खरेदी; पोलिस चौकशीची मागणी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- महापालिका आयुक्त विजय कुलकर्णी यांनी स्वत:साठी महापालिकेच्या पैशांतून सुमारे साडेचार लाख रुपयांचे फर्निचर बेकायदेशीरपणे खरेदी केले आहे. याप्रकरणाची चौकशी करून आयुक्तांविरोधात दखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्याचे आदेश पोलिसांना द्यावेत, अशी मागणी दीपक वर्मा यांनी न्यायालयात दाखल केलेल्या फिर्यादीत केली आहे.
महापालिकेने वसंत टेकडी येथे आयुक्तांसाठी सुमारे दीड कोटी रुपये खर्च करून निवासस्थान बांधले आहे. निवासस्थान उपलब्ध करून दिले असले, तरी त्यातील फर्निचर व इतर बाबी संबंधित अधिका-यांने स्वत:च्या पैशातून घेणे बंधनकारक आहे. मात्र, सध्या या ठिकाणी वास्तव्यास असलेल्या आयुक्त कुलकर्णी यांनी महापालिकेच्या पैशांतून स्वत:साठी सुमारे साडेचार लाख रुपयांचे फर्निचर बेकायदेशीरपणे खरेदी केले आहे."दिव्य मराठी'ने २५ सप्टेंबरला "आयुक्तांच्या घरात पायपोसही मनपाचेच' असे वृत्त प्रकाशित करून हा प्रकार उघड केला. त्यामुळे शहरात खळबळ उडाली, या वृत्ताचा आधार घेत शहरातील ज्येष्ठ नागरिक दीपक शर्मा यांनी आयुक्तांच्या या उधळपट्टीबाबत न्यायालयात फिर्याद दाखल केली. आयुक्तांनी स्वत:साठी बेकायदेशीरपणे खरेदी केलेल्या फर्निचर प्रकरणाची चौकशी करून दखलपात्र गुन्हा दाखल करण्याचे आदेश पोलिसांना द्यावेत, अशी मागणी शर्मा यांनी न्यायालयाकडे केली आहे. या बेकायदेशीर फर्निचर खरेदीप्रकरणी सन्माननीय नागरिक प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रमोद मोहोळे यांनीही शासनाकडे तक्रार केली आहे. मनपातील अिधकारी नागरिकांच्या पैशांचा दुरूपयोग करत आहेत. अधिका-यांचे निवासस्थान व त्यामधील फर्निचरसाठी लाखोंची उधळपट्टी करण्यात येत आहे. याप्रकरणाची चौकशी करून उधळपट्टी केलेली रक्कम संबंधित अधिका-यांकडून वसूल करावी, अशी मागणी मोहोळे यांनी केली आहे.
अशी आहे उधळपट्टी
मनपा प्रशासनाने १५ ऑक्टोबर २०१२ ते २१ नोव्हेंबर २०१३ या कालावधीत सुमारे साडेचार लाख रुपयांचे फर्निचर, पडदे व इतर सामान आयुक्तांच्या घरासाठी पुरवले आहे. त्यात बेनिटो या परदेशी कंपनीचे ५८ हजार रुपयांचे दोन हायड्रोलिक बेड, ६५ हजारांची दोन कपाटे, १२ हजार रुपयांचे ड्रेसिंग टेबल यांसह नऊ हजार आठशे रुपयांची टीव्ही ट्रॉली, डायनिंग टेबल, साठ हजारांचा सोफासेट, साडेसहा हजारांचे शू रॅक आदी मोठ्या वस्तूंसह अगदी पायपोसही खरेदी करण्यात आले आहेत.