आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Municipal Commissioner,Latest News In Divya Marathi

करदात्यांच्या पैशांतून आयुक्तांना साडेचार लाखांचे फर्निचर, आयुक्तांच्या घरात पायपोसही मनपाचेच!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- कर्मचा-यांना वेळेत पगार देऊ न शकणारी नगरची महापालिका गरीब आहे. साहजिकच तेथील अधिकारीही तितकेच गरीब आहेत. इतके की, ते पायपोसही स्वत:च्या पगारातून खरेदी करू शकत नाहीत. विश्वास बसत नाही ना? पण हे खरे आहे. मनपा आयुक्तांच्या घरातील सर्व फर्निचर व साधा पायपोसही मनपाच्या पैशांतून खरेदी केलेले आहे. एरवी प्रशासनाच्या नावाने खडे फोडणारे सत्ताधारी व विरोधकांनीही आयुक्तांच्या निवासस्थानात करदात्यांच्या पैशांतून झालेल्या या नियमबाह्य व ऐशारामाच्या 'घरभरणी' कडे कानाडोळा केला आहे.
कोणताही नियम नसताना आयुक्त विजय कुलकर्णी यांच्या निवासस्थानातील फर्निचर व इतर बाबींवर सुमारे साडेचार लाखांचा खर्च केल्याचे माहितीच्या अधिकारात मिळवलेल्या कागदपत्रांत उघड झाले आहे. एकीकडे दीड महिन्यापासून काविळीचे थैमान सुरू असलेल्या भागात गळक्या जलवाहिन्या बदलण्यासाठी मनपाकडे पैसे नाहीत. मात्र, मनपाच्या पैशांची अशा नियमबाह्य पद्धतीने उधळपट्टी सुरू आहे. या िवरोधात एकाही लोकप्रतिनिधीने भूमिका घेतलेली नाही.
मनपाने आयुक्तांना वसंत टेकडी येथे अलिशान निवासस्थान दिले आहे. चांगला दीड कोटीचा खर्च करून ते उभारण्यात आले आहे. मनपा फक्त आपल्या अधिकाऱ्यांसाठी निवासस्थानाची व्यवस्था करू शकते. तसे करू शकत नसेल, तर त्या शहराच्या दर्जाप्रमाणे या अधिकाऱ्यांच्या वेतनात घरभाडे भत्ता देण्यात येतो. निवासस्थान उपलब्ध केले, तरी त्यातील फर्निचर व इतर बाबी संबंधित अधिकाऱ्याने घ्यायच्या असतात. त्या मनपाने द्याव्यात, असा कोणताही नियम नाही, तरीही मनपा प्रशासनाने १५ ऑक्टोबर २०१२ ते २१ नोव्हेंबर २०१३ दरम्यान सुमारे साडेचार लाखांचे फर्निचर, पडदे व इतर सामान आयुक्तांच्या घरात दिले आहे. विशेष म्हणजे त्यात बेनिटो या परदेशी कंपनीचे ५८ हजार रुपयांचे दोन हायड्रोलिक बेड, ६५ हजारांची दोन कपाटे, १२ हजार रुपयांचे ड्रेसिंग टेबल यासह नऊ हजार आठशे रुपयांची टीव्ही ट्रॉली, डायनिंग टेबल, साठ हजारांचा सोफासेट, साडेसहा हजारांचे शू रॅक आदी मोठ्या वस्तूंसह अगदी पायपोसही खरेदी करण्यात आले आहेत. हे पायपोस १५ ऑक्टोबर २०१२ व ४ मार्च २०१३ असे दोनदा खरेदी करण्यात आले. चार मार्च रोजी खरेदी करण्यात आलेला एक पायपोस ड्युरोसॉफ्ट कंपनीचा असून त्याची किंमत तीन हजार दोनशे रुपये आहे. फक्त गालिचाच १० हजार ५७५ रुपयांचा आहे. सर्व मिळून २७ वस्तू आहेत. या सर्व वस्तू पुण्यातून खरेदी करण्यात आल्या आहेत. हे सर्व सामान आयुक्तांच्या स्वीय सहायकांनी केलेल्या मागणीनुसार पुरवण्यात आल्याचे मनपाने दिलेल्या मािहतीत म्हटले आहे.
पाच महिन्यांत दोनदा खरेदी
मनपाच्या पैशांची कशी उधळपट्टी सुरू आहे, याचे एक उदाहरण म्हणजे यातील पडद्यांच्या खरेदीचे आहे. १५ ऑक्टोबर रोजी १३ हजार २९० रुपयांचे पडदे, ७ हजार २३० रुपयांचे पायपोस व इझी ड्राय किट खरेदी करण्यात आले. त्यानंतर पाचच महिन्यांनी पुन्हा १३ हजार २९० रुपयांचे पडदे, तसेच चार हजार रुपयांचे पायपोस खरेदी करण्यात आले. सामान्य माणूस पाच-सहा वर्षांनी पडदे बदलतो. आमच्या गरीब मनपाच्या ह्यअतिगरीबह्ण आयुक्तांनी पाचच महिन्यांत पडदे बदलले. करदात्यांना सुविधा द्यायला मनपाकडे पैसा नाही. मात्र, कररूपाने गोळा होणारा पैसा अशा पद्धतीने उधळला जात आहे.

आयुक्तांसह शहर अभियंत्याची चुप्पी
फर्निचरवरील उधळपट्टीबाबत शहर अभियंता नंदकुमार मगर यांना विचारणा केली असता त्यांनी आचारसंहितेचे कारण पुढे करत हात झटकले, तर आयुक्त विजय कुलकर्णी यांनी न्यायालयात असल्याचे सांगत बोलणे टाळले.
या उधळपट्टीची चौकशी व्हावी
हा सर्व प्रकार भ्रष्टाचाराचाच आहे. आयुक्तांनी अधिकाराचा दुरुपयोग करून मनपाचा पैसा स्वत:साठी वापरला आहे. जनतेचा कररूपी पैसा असा उधळण्याचा परवाना त्यांना कोणी दिला? या सर्व प्रकाराची चौकशी होऊन संबंधितांना शिक्षा होऊन पैसे व्याजासह वसूल करण्याची गरज आहे. म्हणजे असे करण्यास कोणी अधिकारी धजावणार नाही.'' प्रमोद मोहोळे, अध्यक्ष, सन्माननीय नागरिक प्रतिष्ठान.
फर्निचरची रक्कम वसूल करा
महापालिकेने आयुक्तांचे निवासस्थान जकातीच्या ठेक्यातून बांधले आहे. ज्यावेळी हे बांधकाम सुरू होते, त्याच वेळी फर्निचरसाठी तरतूद करणे आवश्यक होते. यात महापालिकेच्या संबंधित अधिका-यांची चूक आहे. स्थायी समिती व सर्वसाधारण सभेच्या मंजुरीशिवाय अशा प्रकारे लाखो रुपयांचे फर्निचर खरेदी करणे अयोग्य आहे. फर्निचरची खरेदी बेकायदेशीर असेल, तर हा सर्व खर्च आयुक्तांकडून वसूल करणे आवश्यक आहे.'' किशोर डागवाले, सभापती, स्थायी समिती.
ऑफिससाठी फर्निचर देणे योग्य
मनपाच्या आयुक्तांना घरी काम करण्यासाठी कार्यालयीन उपयोगाचे फर्निचर व इतर साहित्य म्हणजे टेबल, खुर्ची, संगणक, प्रिंटर मनपाने पुरवणे चुकीचे नाही. ते आवश्यक आहे. शिवाय त्यांची बदली झाल्यावर हे सर्व सामान तेथेच राहणार आहे. इतर वस्‍तूंच्या पुरवठ्याबाबत मात्र मी काहीही बोलू शकणार नाही.'' एन. डी. कुलकर्णी, माजी शहर अभियंता, मनपा.