आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नगर महापालिकेकडे 603 कोटींची देणी थकीत, सुमारे 400 कोटी व्याजाची रक्कम

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - महापालिकेकडे तब्बल ६०३ कोटी २८ लाखांची देणी थकीत असल्याचा खुलासा आयुक्त दिलीप गावडे यांनी मंगळवारी स्थायी समितीच्या सभेत केला. विशेष म्हणजे व्याजाची रक्कम ४०० कोटींपेक्षा अधिक आहे. अभय योजनेंतर्गत मुद्दल भरून व्याज माफ करावे, यासाठी मनपाचे प्रयत्न सुरू असल्याचे गावडे यांनी सांगितले. 
 
अंदाजपत्रकाबाबत मनोगत व्यक्त करताना आयुक्त गावडे यांनी मनपाकडे ६०३ कोटींची देणी थकीत असल्याचे सांगितले. महावितरण, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, पाटबंधारे विभाग, ठेकेदार, तसेच महापालिका कर्मचाऱ्यांचे हे देणे आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे सर्वाधिक ३८९ कोटी ५० लाखांचे देणे थकीत आहे. त्यात व्याजाची रक्कम ३५८ कोटी आहे. नगरपालिका अस्तित्वात असल्यापासून ही रक्कम थकीत आहे. कर्जाचे हप्ते भरल्याने ही परिस्थिती निर्माण झाली आहे. अभय योजनेंतर्गत मुद्दल भरून व्याजाची रक्कम माफ करण्यासाठी मनपा प्रशासन प्रयत्न करत असल्याचे आयुक्त गावडे यांनी सांगितले. 
 
महावितरणचेदेखील १४४ कोटी ७८ लाख रुपयांचे देणे आहे. या रकमेवरील व्याज माफ करावे, यासाठी पाठपुरावा सुरू आहे. पाटबंधारे विभागाचे एक कोटी, ठेकेदारांचे २८ कोटी, महापालिका कर्मचाऱ्यांचे ३० कोटी, तसेच पथदिवे इतर १० कोटी रुपयांची देणी थकीत आहेत. मुद्दल रक्कम भरून हा प्रश्न मनपा निकाली काढणार आहे. 

व्याजमाफीसाठी प्रशासनाचा पाठपुरावा सुरू आहे 
पदाधिकारी तसेच पालकमंत्री, खासदार आमदारांनीदेखील व्याजाची रक्कम माफ करण्यासाठी पाठपुरावा करावा, असे आवाहन गावडे यांनी केले. दरम्यान, मालमत्ताधारक, जिल्हा परिषद, तसेच इतर सरकारी कार्यालयांकडे महापालिकेचे २६५ कोटी रुपये थकीत आहेत. ही थकबाकी वसूल करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचेही आयुक्त गावडे यांनी स्पष्ट केले. 
 
राज्य सरकारकडे पाठपुरावा करणार 
मनपाला६०३ कोटींचे देणे असले, तरी २६५ कोटी रुपये घेणे आहे. ही थकबाकी वसूल करण्यासाठी प्रशासनाने प्रयत्न करावेत, अशी सूचना सभापती सचिन जाधव यांनी केली. मनपाकडील ६०३ कोटींच्या थकबाकीवरील व्याज माफ करण्यासाठी राज्य सरकारकडे पाठपुरावा करू. राज्यात युतीचे सरकार आहे. त्यामुळे व्याजमाफीचा हा प्रश्न नक्कीच सुटेल, असा विश्वास जाधव यांनी व्यक्त केला. 
बातम्या आणखी आहेत...