आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Municipal Corporation Commissioner Kulkarni Give Reliance Case Probe Order

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

'रिलायन्स' प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश, आयुक्त कुलकर्णी यांचा निर्णय

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
छायाचित्र: रिलायन्सच्या पैशांतून करण्यात आलेल्या कामांची पाहणी करताना आयुक्त विजय कुलकर्णी. समवेत किशोर डागवाले, कैलास गिरवले, श्रीनिवास बोज्जा आदी. छाया : कल्पक हतवळणे
नगर - खोदकामाच्या नुकसान भरपाईपोटी रिलायन्स कंपनीने दिलेल्या पैशांतून सुरू असलेल्या कामांची चौकशी करण्यात येणार आहे. आतापर्यंत झालेल्या कामांची बिले, प्रस्ताव, तसेच इतर तांत्रिक बाबी तपासून कामांचे प्रत्यक्ष मोजमाप करण्याचे आदेश शुक्रवारी (६ फेब्रुवारी) देण्यात येणार आहेत. त्यानंतर चौकशी करून तसा अहवाल महासभेसमोर ठेवण्यात येणार असल्याची माहिती आयुक्त विजय कुलकर्णी यांनी गुरुवारी दिली.

रिलायन्स जीओ इन्फोकॉम कंपनीमार्फत शहरातील ३९ मार्गांवर केबल टाकण्याचे काम सुरू आहे. त्यासाठी विविध भागांतील रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खोदकाम करण्यात आले आहे. या नुकसान भरपाईपोटी रिलायन्सने मनपाला ५ कोटी ११ लाख रुपये दिले आहेत. त्यातून विविध रस्त्यांची कामे हाती घेण्यात आली आहेत. मात्र, या कामात मोठ्या प्रमाणात अनियमितता आहे. काही ठिकाणचे काम झालेले नसतानाही संबंधित ठेकेदाराला बिले देण्यात आली आहेत. याप्रकरणी मनसेच्या नगरसेवकांनी आंदोलन करून कामाची पाहणी करण्याची मागणी केली होती. त्यानुसार आयुक्त कुलकर्णी यांनी मनसेच्या नगरसेवकांसह गुरुवारी सहा कामांची पाहणी केली. यावेळी शहर अभियंता नंदकुमार मगर, नगरसेवक किशोर डागवाले, कैलास गिरवले, गणेश भोसले, श्रीनिवास बोज्जा, दत्तात्रेय जाधव आदी उपस्थित होते.
प्रोफेसर कॉलनी चौक ते पटवर्धन स्मारक ते कुष्ठधाम रस्त्याचे काम झालेच नसल्याचा दावा मनसे नगरसेवकांनी पाहणीदरम्यान केला. आयुक्तांनीदेखील हे काम झाले नसल्याचे मान्य केले. हॉटेल हिरा ते पंचवटीनगरपर्यंतच्या रस्त्याचे कामही झाले नसल्याचे पाहणीत आढळले. कुशाबा नगरी येथे हे काम सुरू असल्याचे बांधकाम विभागाच्या अधिका-यांनी सांगितले. मात्र, कुशाबानगरी येथील कामाचा या कामाशी काहीच संबंध नसल्याचे मनसे नगरसेवकांनी सांिगतले. कुष्ठधाम रस्त्यावर पॅचिंग करण्यात आले होते, परंतु पावसामुळे हा रस्ता पुन्हा उखडला असल्याचे बांधकामच्या अधिका-यांनी सांगितले. परंतु नगरसेवकांनी अधिका-यांचे म्हणणे फेटाळत काम झालेच नसल्याचा दावा केला. त्यावर आयुक्त कुलकर्णी यांनी रिलायन्सच्या पैशांतून करण्यात आलेल्या कामांची चौकशी करण्याचे आश्वासन दिले. प्रत्यक्ष झालेले काम, त्याचा प्रस्ताव, तसेच इतर तांत्रिक बाबी तपासून कामांचे मोजमाप करण्यात येईल. त्यानंतर चौकशी करून तसा अहवाल महासभेसमोर ठेवण्यात येणार असल्याचे कुलकर्णी यांनी स्पष्ट केले.

जनतेच्या पैशांची लूट सुरू
आयुक्तांसह सहा कामांची पाहणी केली. अनेक ठिकाणी कामे झाली नसल्याचे निदर्शनास आले. काही ठिकाणी डांबराचा पातळ थर देण्यात आला आहे. एकाच रस्त्याच्या कामाचे तीन-तीन तुकडे केल्याचेही पाहणीत स्पष्ट झाले. सहा कामांत एवढा गैरव्यवहार आहे, तर सर्व कामात किती असेल... ही जनतेच्या पैशांची लूट आहे. या प्रकरणाचा पाठपुरावा करू.'
किशोर डागवाले, नगरसेवक.

सर्व कामे नियमानुसारच
आयुक्तांनी नगरसेवकांसह कामांची पाहणी केली. त्यात सर्व कामे झाल्याचे निदर्शनास आणून दिले. ज्या ठिकाणी खोदकाम झाले, तेथील कामासह परिसरातील कामेही करण्यात आली आहेत. नगरसेवकांच्या पत्रानुसार ही कामे करण्यात आली आहेत. महापौरांनीदेखील यापैकी अनेक कामांना भेटी दिल्या आहेत. सर्व कामे नियमानुसारच आहेत.''
नंदकुमार मगर, शहर अभियंता.

गुन्हे दाखल करावेत
ज्या कामांबाबत आमच्या तक्रारी होत्या, ती कामे झालीच नसल्याचे पाहणीत स्पष्ट झाले. आयुक्तांनीदेखील ते मान्य केले आहे. त्यामुळे या प्रकरणात दोषी अधिकारी व ठेकेदारांवर फौजदारी गुन्हे दाखल झाले पाहिजेत. त्यासाठी आयुक्तांनी ठोस भूमिका बजावणे आवश्यक आहे.''
कैलास गिरवले, नगरसेवक.

प्रशासनाला उशिरा जाग
कामांमध्ये मोठ्या प्रमाणात अनियमितता आहे. कामे सुरू असतानाच याबाबत आयुक्तांकडे तक्रारी केल्या होत्या. परंतु त्यांनी तक्रारींची दखल घेतली नाही. आता उशिरा कामांची पाहणी व चौकशी करण्याचा फार्स प्रशासनाकडून सुरू आहे. याप्रकरणी न्यायालयीन लढा सुरूच राहील.''
शाकीर शेख, तक्रारदार.

या कामांची केली पाहणी
*प्रोफेसर कॉलनी चौक ते पटवर्धन स्मारक ते कुष्ठधाम
*भिस्तबाग चौक ते बसस्टॉप व वाणीनगर ते एकविरा चौक
*पाइपलाइन रोड ते बसस्टॉप व वाणीनगर ते भिस्तबाग
*पाइपलाइन रोड ते बसस्टॉप व एकविरा चौक ते श्रीराम चौक
*मराठा मंदिर ते तारकपूर ते प्रोफेसर चौक
*प्रोफेसर चौक ते समर्थ शाळा व परिसर.