आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नगरच्या महापालिकेत डिझेलचा काळाबाजार

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर - महापालिकेच्या घनकचरा विभागात मोठय़ा प्रमाणात डिझेलचा काळाबाजार होत असल्याची धक्कादायक माहिती शुक्रवारी समोर आली. शहरातील कचरा गोळा करण्यासाठी दर महिन्याला सरासरी नऊ हजार लिटर डिझेल लागत असताना घनकचरा विभागाने मागील महिन्यात तब्बल 18 हजार 848 लिटर डिझेलचा खर्च दाखवला आहे. विशेष म्हणजे ही अफरातफर विभागप्रमुखांच्याच र्मजीने होत असल्याचे एका कर्मचार्‍याने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले.
आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या घनकचरा विभागाकडे मनपा अधिकारी व पदाधिकार्‍यांचे दुर्लक्ष झाले आहे. एकीकडे शहरात कचर्‍याच्या ढिगांची संख्या वाढत असताना दुसरीकडे या विभागातील अधिकारी व काही कर्मचार्‍यांनी स्वत:चे खिसे भरण्याचे उद्योग सुरू केले आहेत. कचरा गोळा करणार्‍या वाहनांना लागणार्‍या डिझेलमध्ये दर महिन्याला लाखो रुपयांची अफरातफर होत असल्याची चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून मनपा वतरुळात सुरू आहे. त्याबाबत ‘दिव्य मराठी’ने चौकशी केली असता घनकचरा विभागात मोठय़ा प्रमाणात डिझेलचा काळाबाजार सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला.
शहरातील कचरा गोळा करून तो डेपोत नेऊन टाकण्यासाठी घनकचरा विभागाकडे सुमारे 40 वाहने आहेत. त्यांच्यासाठी लागणारे डिझेल शहरातीलच एका पेट्रोलपंपावरून आणले जाते. घनकचरा विभाग डिझेलचे अव्वाचे सव्वा बिल तयार करून मनपाची लूट करीत असल्याचे स्पष्ट झाले.
फेर्‍या कमी, डिझेल जादा.. - कचरा गोळा करणार्‍या एका घंटागाडीला रोज सरासरी 5 लिटर, ट्रॅक्टरला 15 लिटर, तर 407 टेम्पोला 7 लिटर डिझेल लागते. प्रत्येक वाहनाच्या सरासरी दोन खेपा होतात. (दोनपेक्षा जास्त खेपा होत असल्या तरी त्या केवळ कागदावरच आहेत.) त्यानुसार घनकचरा विभागातील सर्व वाहनांना रोज 300 लिटर, तर महिन्याला सुमारे नऊ हजार लिटर डिझेल लागते. मात्र या विभागाकडून दर महिन्याला 15 हजार लिटरपेक्षा जास्त डिझेलचा खर्च दाखवण्यात येतो. जून महिन्यात कचरा गोळा करणार्‍या वाहनांसाठी तब्बल 18 हजार 848 लिटर डिझेलचा खर्च दाखवण्यात आला आहे. पंपावरून येणारे हे डिझेल थोड्या प्रमाणात कचरा गोळा करणार्‍या वाहनांसाठी वापरण्यात येते. उर्वरित डिझेलची अधिकारी व काही कर्मचारी संगमताने परस्पर विक्री करतात. यात सर्वांत महत्त्वाची भूमिका विभागप्रमुख बजावत असल्याची माहिती याच विभागातील एका कर्मचार्‍याने दिली.
सुमारे साडेचार लाख लोकसंख्या असलेल्या नगर शहरात रोज शंभर टनांपेक्षा जास्त कचरा तयार होतो. तो गोळा करून त्याची विल्हेवाट लावण्याची जबाबदारी घनकचरा विभागाची आहे. मध्यंतरी कचरा गोळा करण्याचे काम ठेकेदारामार्फत केले जात होते. मात्र गेल्या वर्षभरापासून ठेकेदार मिळत नसल्याने मनपाला आपल्या कर्मचार्‍यांमार्फत कचरा गोळा करावा लागत आहे. मात्र घनकचरा विभागाच्या अकार्यक्षमतेमुळे कचरा संकलनाची वाट लागली आहे. शहरातील अनेक भागात रस्त्याच्या कडेला, भिंतींच्या आडोशाला, मोकळ्या भूखंडांवर कचर्‍याचे ढीग साचले आहेत. काही ठिकाणी कचराकुंड्या असल्या, तरी त्या ओसंडून वाहत असतात. झेंडीगेट, अमरधाम, बसस्थानक परिसर, कोठला, सज्रेपुरा आदी भागात स्वच्छतेचा प्रश्न बिकट झाला आहे. लहान-मोठय़ा वसाहतींमध्येही मोठय़ा प्रमाणात कचरा साचल्याने आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.
वरिष्ठांनाही उलट उत्तरे! - घनकचरा विभागप्रमुख डॉ. एन. एस. पैठणकर नागरिकांना तर सोडाच, वरिष्ठ अधिकार्‍यांनाही जुमानत नसल्याचे काही दिवसांपूर्वी स्पष्ट झाले. शहरातील नालेसफाईबाबत विचारणा करण्यासाठी महापौर शीला शिंदे यांनी उपायुक्त स्मिता झगडे व पैठणकर यांना बोलावले असता पैठणकर यांनी महापौरांसमोरच झगडे यांना उलट उत्तरे दिली. डिझेलच्या अफरातफरीबाबत शुक्रवारी दूरध्वनीवर त्यांच्याशी संपर्क साधला असता बैठकीमध्ये असल्याचे सांगून त्यांनी याबाबत बोलणे टाळले.
सारवासारव... - डिझेलची परस्पर विक्री केल्यानंतर निर्माण झालेली तूट भरून काढण्यासाठी त्यामध्ये रॉकेल ओतले जाते. ‘दिव्य मराठी’चा छायाचित्रकार गॅरेजमध्ये फोटो काढण्यासाठी गेला असता डिझेलमध्ये मोठय़ा प्रमाणात रॉकेलचे मिर्शण असल्याचे दिसून आले. कर्मचार्‍यांनी नंतर सारवासारव करीत गॅरेज बंद केले.
महापालिकेचा कांगावा - घनकचरा संकलनाचा ठेका देण्यासाठी मनपाने अनेकदा निविदा मागवल्या. परंतु याकडे ठेकेदारांनी पाठ फिरवली. मुळात घनकचरा संकलन ठेकेदारामार्फत होऊ नये, यासाठी निविदांमध्ये जाचक अटी टाकण्याचे काम घनकचरा विभागप्रमुखांनी केले.