आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Municipal Corporation Election Congress Ncp Politics Nagar

...हा तर फक्त ट्रेलर, सिनेमा अद्यापि बाकी

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

श्रीगोंदा - तालुक्यात काँग्रेस व राष्ट्रवादीच्या पहिल्याच मेळाव्यात परस्परांवर नुसते आरोपच झाले नाहीत तर एकमेकांवर कमरेखालचे वार झाले आहेत. जिल्हा परिषद निवडणुकांच्या प्रचारातील हा ट्रेलर असून खरा सिनेमा अजून बाकीच असल्याची जाणीव कार्यकर्त्यांनाही झाली. निवडणुकांच्या पहिल्याच टप्प्यात आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी सुरू झाल्याने दोन्ही काँग्रेससाठी ही निवडणूक टोकाची ठरणार असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पडलेली फूट व काँग्रेसला मिळालेली नव संजीवनी यामुळे तालुक्यातील राजकारणाला वेगळी कलाटणी मिळण्याचे संकेत असले तरी या घडामोडींमुळे पालकमंत्री बबनराव पाचपुतेंची झोप उडाली आहे. राष्ट्रवादीचे कार्यकर्ते असलेले बाजार समितीचे सभापती बाळासाहेब नाहाटा, जिल्हा परिषद सदस्य अण्णासाहेब शेलार, राष्ट्रवादीचे प्रांतिक सदस्य तुकाराम दरेकर यांच्या नेतृत्वाखालील विकास आघाडी स्थिरावण्यापूर्वीच काँग्रेसमध्ये विलीन झाली. या विलिनीकरणाला विखे-थोरात या जिल्ह्यातील मंत्र्यांच्या एकीकरणाचा हातभारही कारणीभूत ठरला.
सोमवारी राष्ट्रवादीच्या मेळाव्यात या बंडखोरांवर कडवी टीका पाचपुते समर्थकांनी केली. स्वत: पाचपुतेंसह सदाशिव पाचपुते तालुकाध्यक्ष विठ्ठल काकडे, विक्रमसिंह पाचपुते यांसह कार्यकर्त्यांनी नाहाटा-दरेकर-शेलार यांच्यासह कुकडीचे संस्थापक कुंडलिकराव जगताप यांच्यावर खास शैलीत टीकेची झोड उठवली. या सगळ्या नेत्यांवर पाचपुतेंचे मोठे उपकार असल्याचे व यातील काहींचे पाप मनात दाबून ठेवल्याची अप्रत्यक्ष भावना सदाशिव पाचपुतेंनी बोलून दाखवली.ज्या ताटात अन्न खाल्ले त्यातच माती टाकण्याचा प्रकार आघाडीतील नेत्यांनी केल्याच्या आरोपामुळे विरोधकांमध्ये मोठी अस्वस्थतता पसरणे स्वाभाविकच होते. पालकमंत्र्यांनी या फोडाफोडीसाठी विखे-थोरात जबाबदार असल्याचा रोख दाखवला. जिल्ह्यात आपले वर्चस्व सहन होत नसल्याने राजकीय सुपारी दिल्याचा आरोपही त्यांनी केला.
राष्ट्रवादीच्या मेळाव्यातील आरोपांना मंगळवारी विखे-थोरात यांच्यासह तालुक्यातील काँग्र्रेसच्या नेत्यांनी जशास-तशी उत्तरे दिली. त्यावरून ही जिल्हा परिषद निवडणूक सर्वार्धाने गाजण्याचा ट्रेलर दिसला. विखेंनी सफाईपेक्षा ‘होलसेल धुलाई’वर भर देताना अप्रत्यक्षपणे पाचपुतेंनी केलेल्या राजकीय सुपारीला पुष्टी दिली. काँग्रेस मंत्र्यांनी पाचपुतेंवर केलेले आरोप कडवट असले तरी ते आपण समजू शकतो. मात्र, नाहाटा व जगताप यांनी पाचपुतेंना टार्गेट करताना कमरेखालचे वार केले त्यामुळे या निवडणुकीत काही वेगळेच विपरीत घडते की काय अशी पुसटची शंका जाणकारांच्या मनाला चाटुन गेली असणार. आगामी निवडणुकीचा हा खरचं ट्रेलर असला, तर पूर्ण सिनेमा कसा असेल याबाबात उलटसुलट चर्चा सुरू झाल्या आहेत.
दरवेळी मोठा खटाटोप करूनही पाचपुतेच बाजी मारीत असल्याने या निवडणुकीत सर्व विरोधक काँग्रेसच्या एका छत्राखाली आल्याने पाचपुतेंची दमछाक होणार हे निश्चित आहे. त्यातच जिल्ह्यातून विरोधकांना मोठी रसद पुरवली जाणार असल्याने प्रचार, आरोप-प्रत्यारोप यांची मर्यादा राहणार नाही. त्यामुळे ही निवडणूक सर्वांसाठीच टोकाची होणार असे चित्र निर्माण झाले आहे.
विखे गटाचे वर्चस्व - विखे-थोरात या निवडणुकीत एकत्र उतरले असले तरी निवडणुकीनंतरही काँग्रेसमधील या दोन गटांचे स्वतंत्र अस्तित्व राहणार आहे. मंगळवारी झालेल्या मेळाव्यात विखे गट ताकतवान झाल्याचे चित्र व्यासपिठावरही दिसले. जेष्ठ नेते शिवाजीराव नागवडे वगळता जगताप, नाहाटा, शेलार, दरेकर, डी. एम. भालेराव, कैलास पाचपुते हे आघाडीतुन आलेले नेते सर्व विखेंना मानणारे आहेत. पाचपुतेंच्या विरोधात सर्वांची एकी करताना थोरात गटाची मात्र बेकी होते की काय ही भितीही काहींना वाटु लागली आहे.