आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Municipal Corporation Election Hi Tech Camping In Nagar

उमेदवारांना लळा हायटेक प्रचाराचा..

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर - महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विविध सॉफ्टवेअर कंपन्यांनी शहरात दुकाने थाटली आहेत. ‘जिंकण्याचा सुवर्ण पर्याय’ अशी जाहिरात करून या कंपन्या उमेदवारांना आकर्षित करत आहेत. उमेदवार सॉफ्टवेअरसाठी 30 ते 35 हजार रुपये मोजत आहेत. सॉफ्टवेअरच नाही, तर निवडणूक प्रचारासाठी हवे ते साहित्य भाडेतत्त्वावर देऊ, असे या कंपन्या सांगत आहेत.

अनेकांसाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची आहे. त्यासाठी पाण्यासारखा पैसा ओतण्याची त्यांची तयारी आहे. सॉफ्टवेअर कंपन्यांनी ही संधी साधून आपली दुकाने थाटली आहेत. सध्या शहरात 16 कंपन्यांमार्फत अत्याधुनिक सॉफ्टवेअर पुरवले जात आहे. त्यात तीन ते चार स्थानिक कंपन्यांचा समावेश आहे. प्रभागनिहाय मतदारयादी, वेगवेगळ्या जाती-धर्माच्या मतदारांची अचूक संख्या, त्यांचा पत्ता व मोबाइल नंबर या माहितीसह प्रत्येक मतदारापर्यंत कमी वेळेत कसे पोहोचता येईल, याची सर्व माहिती या सॉफ्टवेअरमध्ये आहे. अनेकांनी या सॉफ्टवेअरची खरेदी केली आहे. त्यात विद्यमान नगरसेवकांचाही मोठय़ा प्रमाणात समावेश आहे.

एका सॉफ्टवेअरची किंमत 30 ते 35 हजार रुपये आहे. उमेदवारांसाठी ही रक्कम किरकोळ आहे. सॉफ्टवेअरची जाहिरात करण्यासाठी कंपन्यांनी शहरात आकर्षक पत्रके वाटली आहेत. काही कंपन्यांचे प्रतिनिधी मनपा कार्यालयात ठाण मांडून बसले आहेत. कार्यालयात येणार्‍या प्रत्येकाच्या हातात पत्रक देण्यात येते. केवळ पत्रक देऊन ते थांबत नाहीत, तर तुमचा उमेदवार कोण आहे, अशी विचारणाही करतात.

सॉफ्टवेअरमध्ये काही बिघाड झाल्यास कंपन्यांकडून दुरुस्तीची हमी देण्यात येते. त्यासाठी प्रत्येक कंपनीने तीन-चार सॉफ्टवेअर इंजिनिअर शहरात ठेवले आहेत. या सॉफ्टवेअर वापरामुळे मतदारांच्या खासगी जीवनात मात्र व्यत्यय येणार आहे. रात्री-अपरात्री हवे तेवढे बल्क एसएमएस व व्हाईस कॉल त्यांच्या मोबाइलवर पडणार आहेत. एका प्रभागातून कमीत कमी पाच ते सहा उमेदवार प्रचारासाठी सॉफ्टवेअरची मदत घेणार आहेत. त्यामुळे या सर्वांच्या एसएमएस व व्हाईस कॉलचा भडिमार मतदारांवर होणार आहे.

असे आहे प्रचाराचे साहित्य
मोबाइल व टॅब्लेट अँण्ड्रॉईड सॉफ्टवेअर, मल्टिकलर मतदार स्लीप, प्रचार सीडी रेकॉर्डिंग, प्रचारपत्रके, जाहीरनामे ड्राफ्टींग व प्रिंटिंग, खर्चाचे रजिस्टर, बॅचेस, बोर्ड, मतदार स्लीप आदी साहित्य कंपन्या पुरवणार आहेत. लॅपटॉप व कॉम्प्युटर भाड्याने देण्याची व्यवस्थाही कंपन्यांनी केली आहे.

उमेदवारांनी प्रत्यक्ष भेट घ्यावी
निवडणूक जवळ आली की, सर्वांनाच मतदारांची आठवण होते. अनेक उमेदवार खासगी कंपन्यांची मदत घेऊन हायटेक प्रचार करतात. वेळी-अवेळी एसएमएस व व्हाईस कॉल पाठवून मतदारांचे खासगी जीवन खराब करतात. मोबाइल कंपन्यादेखील परस्पर मोबाइल नंबर देऊन मोकळ्या होतात. त्याचा त्रास मतदारांना सहन करावा लागतो. त्यामुळे उमेदवारांनी हायटेक प्रचार न करता मतदारांच्या प्रत्यक्ष भेटी घेऊन त्यांच्या समस्या जाणून घेणे आवश्यक आहे.’’ आशिष पाटोळे, मतदार.

उमेदवारांचा चुकीचा समज
एसएमएस व व्हाईस कॉलद्वारे प्रचार करणे ही चुकीची पध्दत आहे. ही पध्दत अवलंबून मते मिळतील, हा उमेदवारांचा चुकीचा समज आहे. यात केवळ मोबाइल व सॉफ्टवेअर कंपन्यांचेच भले होणार आहे.’’ प्रियदर्शनी गायकवाड, मतदार.