आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मनपा निवडणूक : अभय आगरकर यांच्या नेतृत्वात ठरणार रणनिती

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर - भारतीय जनता पक्षाच्या शहर जिल्हाध्यक्षपदी अँड. अभय आगरकर यांची निवड झाल्याने कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. आगरकर यांच्या नेतत्वाखाली आगामी महापालिकेची निवडणूक लढवणे ही गौरवास्पद बाब आहे, असे प्रतिपादन उपमहापौर गीतांजली काळे यांनी सोमवारी केले.

शहर जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल आगरकर यांचा भाजप नगरसेवकांच्या वतीने महापालिकेत सत्कार करण्यात आला. त्यावेळी उपमहापौर बोलत होत्या. याप्रसंगी नवनिर्वाचित प्रदेश सचिव सुरेखा विद्ये, स्थायी समितीचे सभापती बाबासाहेब वाकळे, नगरसेवक नितीन शेलार, दत्तात्रेय कावरे, मनेष साठे, अंबादास पंधाडे, संगीता खरमाळे, नीलिमा गायकवाड, सुनील काळे, शुभांगी ठाकूर आदी उपस्थित होते. उपमहापौर काळे म्हणाल्या, आगरकर यांच्या निवडीचे सर्वच स्तरांतून स्वागत होत आहे. ‘एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ’ या उक्तीप्रमाणे सर्वांना बरोबर घेऊन चालणारा नेता, अशी आगरकरांची प्रतिमा आहे. त्याचा पक्षाला निश्चित फायदा होईल. त्यांच्याच मार्गदर्शनाखाली आम्ही सर्व घडलो. उपमहापौर होण्याची संधी त्यांच्यामुळेच मिळाली, असे काळे यांनी सांगितले. महापालिकेची निवडणूक आगरकर यांच्या नेतृत्वाखाली लढवली जाणार आहे, जास्तीत जास्त नगरसेवक निवडून येण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत, असे आवाहनही त्यांनी केले.

माजी नगरसेवक अनंत जोशी म्हणाले, आगरकर यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या मागील निवडणुकीच्या वेळी भाजपचे अधिवेशन सुरू होते. प्रदेशाध्यक्ष नितीन गडकरी यांनी अध्यक्षीय भाषणात आगरकर यांनी लिहिलेले पत्र कार्यकर्त्यांना वाचून दाखवले होते. पक्षाच्या सर्व उमेदवारांचा प्रचार करता यावा, यासाठी मी स्वत: निवडणूक लढवणार नाही, असे आगरकर यांनी पत्रात लिहिले होते. मनपा निवडणुकीची जबाबदारी पुन्हा एकदा आगरकर यांच्यावर आल्याने सर्वजण सुखावले आहेत.

आयुक्तांशी चर्चा
शहर जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर आगरकर सोमवारी प्रथमच महापालिका कार्यालयात आले. त्यांनी आयुक्त विजय कुलकर्णी यांची भेट घेऊन शहरातील आरोग्यसेवेच्या प्रश्नांबाबत चर्चा केली. डेंग्यूबाबत तातडीने ठोस उपाययोजना करण्याची मागणी त्यांनी केली. यासंदर्भात तातडीने बैठक घेऊन संबंधितांना सूचना देण्याचे आश्वासन आयुक्तांनी दिले.

वेळ आल्यानंतरच पुढील पत्ते जाहीर करणार
सत्कार समारंभानंतर आगरकर पत्रकारांशी बोलताना म्हणाले, शिवसेनेशी युती करताना आम्हाला समान जागा मिळाल्या पाहिजेत, हा आमचा अधिकार आहे. त्यामुळेच पन्नास टक्के जागेची मागणी मी केली आहे. त्यावर पक्ष ठाम असून आता निर्णय शिवसेनेने घ्यायचा आहे. स्वत: निवडणूक लढवणार का, असा प्रश्न विचारला असता आगरकर म्हणाले, आता एक पत्ता उघड केला आहे. पुढील पत्ते वेळ आल्यानंतरच उघड करण्यात येतील.