आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उमेदवारांची यादी तयार;मुलाखतीनंतर निर्णय

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर - गणेशोत्सवातील जोरदार शक्तिप्रदर्शनानंतर सध्या सर्व राजकीय पक्षांमध्ये शांतता आहे. महापालिका निवडणुकीसाठी युती-आघाडीचा निर्णय असो की, उमेदवारांची नावे सर्वच पक्षांच्या पदाधिकार्‍यांनी ‘वेट अँण्ड वॉच’ची भूमिका घेतली आहे. काही पक्षांकडे उमेदवारांची यादी तयार आहे. त्यांची नावे मात्र मुलाखतीनंतरच जाहीर होणार आहेत. मुलाखती देताना इच्छुक उमेदवारांना मोठी कसरत करावी लागणार आहे.

पितृ पंधरवडा सुरू झाल्याने मनपा निवडणुकीचे पडघम सध्या कमी झाले आहेत. आणखी दहा दिवसांनी पितृ पंधरवडा संपेल. त्यानंतरच युती व आघाडीचा निर्णय होणार असल्याने सर्व राजकीय पक्षांच्या पदाधिकार्‍यांनी सध्या शांततेची भूमिका घेतली आहे. काही पक्षांनी उमेदवारांची चाचपणी करून याद्या तयार केल्या आहेत. यादीतील नावे मात्र मुलाखतीनंतरच निश्चित होणार आहेत. यादीत नावे नसलेल्या अनेक इच्छुक उमेदवारांनी निवडणुकीची तयारी सुरू केली आहे, तर यादीत नावे असलेल्या इच्छुकांना मुलाखतीचा सोपस्कार पार करावा लागणार आहे. मुलाखतीनंतर ऐनवेळी संधी नाकारण्यात आली, तर पक्षबदल अथवा अपक्ष, असा मार्ग स्वीकारून निवडणूक लढवण्याचे अनेकांचे गणित पक्के आहे.

मागील निवडणुकीसाठीही विविध पक्षांच्या वरिष्ठांनी स्वत: उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या होत्या. पक्षनिरीक्षक, मंत्री, स्थानिक पदाधिकारी यांच्या उपस्थितीत या मुलाखती घेतल्या जातात. ऐनवेळी अनेकांना डावलण्याचे प्रकार यापूर्वी घडले आहेत. काही पक्षांकडून मुलाखत ही केवळ औपचारिकता असते, त्यांचे उमेदवार अगोदरच निश्चित असतात. यावेळी मात्र एका प्रभागात दोन उमेदवार असतील, तसेच जागावाटपातही मागील निवडणुकीपेक्षा मोठय़ा प्रमाणात बदल होणार आहेत. त्यामुळे मुलाखतीसाठी मोठी स्पर्धा असणार आहे. मुलाखतीचे विघ्न पार करणार्‍या उमेदवारांना निवडणूक सोपी असेल, परंतु विघ्न पार करता न आलेल्या उमेदवारांना निवडणूक लढवताना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागणार आहे.

प्रभागरचनेच्या अंतिम मंजुरीनंतर निवडणूक आयोगाकडून आता मतदार यादी प्रसिध्द करण्यात येईल. त्यानंतर निवडणूक कार्यक्रम जाहीर होताच सर्व पक्षांकडून उमेदवारांच्या मुलाखती सुरू होतील. प्रत्येक पक्षाच्या समितीद्वारे उमेदवाराचे नाव मुलाखतीसाठी निश्चित करण्यात येणार आहे. मात्र, काही पक्षांच्या समिती सदस्यांमध्ये मोठय़ा प्रमाणात मतभेद असल्याने उमेदवारी निश्चित करताना पक्षातील वाद समोर येणार आहेत. त्यामुळे काही पक्षांमध्ये मुलाखतीला महत्त्व असेल, तर काही पक्षांमध्ये मुलाखत ही केवळ ‘फार्स’च ठरणार आहे.

लवकरच निर्णय
पक्षाकडे प्रत्येक प्रभागात चांगले उमेदवार आहेत. त्यांची यादी तयार आहे. वरिष्ठांकडून प्रत्येक उमेदवाराची मुलाखत घेतली जाईल. त्यानंतरच उमेदवार निश्चित होतील. दुसर्‍या पक्षांतील कार्यकर्तेही येऊन भेटत आहेत. नवडणुकीसाठी चांगले वातावरण आहे. आघाडीबाबत लवकरच निर्णय होईल.’’ ब्रिजलाल सारडा, शहर जिल्हाध्यक्ष, काँग्रेस.

मुलाखत द्यावीच लागणार
मागील निवडणुकीत मीदेखील मुलाखत दिली होती. पक्षनिरीक्षक, तसेच वरिष्ठांच्या उपस्थितीत मुलाखती घेतल्या जाणार आहेत. योग्य उमेदवारांचीच नावे मुलाखतीसाठी पुढे केली जातील. वरिष्ठांच्या निर्णयानुसारच उमेदवार निश्चित होणार आहेत.’’ संग्राम जगताप, शहर जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी.

उमेदवारांची यादी तयार
पक्षाकडे चांगल्या उमेदवारांची यादी आहे. योग्य उमेदवारालाच उभे करण्याचा प्रयत्न असेल. मुलाखतीतून उमेदवारांची चाचपणी करूनच उमेदवार निश्चित होतील. संघटनांनी खुशाल निवडणूक रिंगणात उतरावे. त्यांना कोण अडवणार? पितृ पंधरवडा संपल्यानंतर युतीचा निर्णय घेऊ.’’ अनिल राठोड, आमदार, शिवसेना.

अजून कोणाला शब्द नाही
उमेदवारांची चाचपणी झाली असली, तरी अजून कोणालाही शब्द दिलेला नाही. त्यामुळे पक्षातील एखाद्याने निवडणूक लढवण्याची तयारी सुरू केली असली, तर तो त्याचा वैयक्तिक निर्णय आहे. मुलाखती घेऊनच उमेद्वार निश्चित केले जातील. पक्षाची पाच सदस्यांची समिती याबाबत महत्त्वाची भूमिका बजावणार आहे.’’ अभय आगरकर, शहर जिल्हाध्यक्ष, भाजप.

संघटनाही उतरणार निवडणूक रिंगणात
शहरात फार सक्रिय नसलेल्या काही लहान पक्षांबरोबरच अनेक संघटनाही निवडणूक रिंगणात उतरणार आहेत. त्यात भारतीय नवजवान सेना, शिवराज्य पक्ष, सावेडी घरमालक संघटना, संभाजी ब्रिगेड, दलित महासंघ, शेतकरी संघटना, ज्येष्ठ नागरीक संघटना आदींचा समावेश आहे. प्रचार करताना या संघटनांकडून विकासकामे, तसेच पक्षांनी दिलेल्या आश्वासनांचे मुद्दे पुढे केले जाणार आहेत. त्याचे उत्तर देताना अनेक राजकीय पक्षांची कोंडी होणार आहे. पक्षाने नाकारलेले काही उमेदवार संघटनांच्या तिकिटावर उभे राहतील. त्यामुळे ही निवडणूक अटीतटीची होणार आहे.