आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इच्छुक उमेदवारांकडून जातनिहाय सर्व्हे सुरू

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर - महापालिका निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांनी आतापासूनच प्रभागातील जातनिहाय सर्व्हे सुरू केला आहे. त्यासाठी शहरातील विविध जाहिरात एजन्सींकडून मतदारांचा डाटा पुरवला जात आहे. मनपा प्रशासनाकडून अजून मतदारयादी जाहीर झाली नसली, तरी इच्छुकांनी मात्र मतदारयादी मिळवून जातीय समिकरणे मांडण्यास सुरुवात केली आहे. सोबतच मतदारांना स्वत:च्या वैयक्तिक माहितीसह दसर्‍याच्या शुभेच्छा देखील देत आहेत. त्यामुळे मतदारही हुरळून जात आहेत.

मनपा निवडणूक अवघ्या दीड महिन्यावर आल्याने इच्छुकांची चांगलीच धावपळ सुरू आहे. कोणत्या प्रभागातून निवडणूक लढवायची, हे नक्की झाले. प्रभागातील कोणत्या भागात कोणत्या जाती-धर्माचे मतदार आहेत, याची माहिती घेण्यास सुरुवात झाली. त्यासाठी शहरातील विविध जाहिरात एजन्सींना काम सोपवण्यात आले आहे. या एजन्सीकडून डाटा मिळाल्यानंतर इच्छुकांनी जातीय समिकरणे मांडण्यास सुरुवात केली आहे. मतदारांपर्यंत स्वत:ची वैयक्तिक माहिती पोहोचवण्यासाठी नामी शक्कल लढवण्यात आली आहे. दसर्‍याच्या शुभेच्छा देण्याचा बहाणा करून इच्छुक उमेदवार मतदारांना आकर्षक पत्रके वाटत आहेत. पत्रकांमध्ये शुभेच्छांसह स्वत:ची वैयक्तिक माहिती देखील देत आहेत.

आपल्या भागातील इच्छुक उमेदवाराने दसर्‍याच्या शुभेच्छा दिल्याने मतदारही हुरळून जात आहेत. प्रभागरचना जाहीर होताच नगरसेवकांसह इच्छुकांनी प्रभाग व स्वत:च्या वैयक्तिक माहितीची पत्रके वाटली होती. भोसले आखाड्यातील एका विद्यमान नगरसेवकाने सुरू केलेला हा ‘ट्रेंड’ सर्वांनीच सुरू केला. प्रत्येक इच्छुक उमेदवाराकडून मतदारांवर वेगवेगळ्या पत्रकांचा वर्षाव सुरू आहे. राजकीय पक्षांकडून मात्र अजूनही उमेदवारीची समिकरणे सुरू आहेत. आघाडी व युतीबाबत निर्णय प्रलंबित असला, तरी कोणती जागा मित्रपक्षाला सोडायची, कोणत्या जागेवर हक्क सांगायचा, विरोधी पक्षाची मदत कशी घ्यायची, उमेदवार कसे फोडायचे अशी अनेक समीकरणे राजकीय पक्षांकडून गुप्त बैठकांमधून सुरू आहेत. या महिनाअखेरीस मनपा प्रशासनाकडून अधिकृत मतदारयादी जाहीर होईल, त्यावरील हरकतींची सुनावणी झाल्यानंतर निवडणूक कार्यक्रम जाहीर होणार आहे. इच्छुक उमेदवार मात्र त्यापूर्वीच प्रभागातील जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहेत.

आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी सुरू
राजकीय पक्षांच्या बैठका सुरू झाल्या आहेत. मनसे, भाजप, काँग्रेस या पक्षांनी, तर जाहीर कार्यकर्त्यांचे जाहीर मेळावेही घेतले. मेळाव्यात प्रत्येकाकडून विरोधी पक्षांवर जोरदार चिखलफेक करण्यात आली. इच्छुक उमेदवारही विद्यमान नगरसेवक व तसेच स्पर्धकाच्या विरोधात माऊथ पब्लिसिटी करत आहेत. त्यामुळे मतदारांचाही गोंधळ उडाला आहे.

विद्यमान नगरसेवकांकडून होत आहे आश्वासनांची खैरात
अनेक प्रभागांत विद्यमान नगरसेवक पुन्हा एकदा निवडणूक लढवणार आहेत. त्यासाठी आतापर्यंत केलेले काम मतदारांपर्यंत पोहोचवण्यात येत आहे. त्यासाठी केलेल्या विकासकामांच्या 20 ते 25 पानी अहवालाची पुस्तिका मतदारांना देण्यात येत आहे. काही विद्यमान नगरसेवक, तर आतापासूनच आश्वासनांची खैरात करत आहेत. कोणती कामे राहून गेली, ती का पूर्ण झाली नाहीत, याचे स्पष्टीकरण देत पुन्हा निवडून दिले, तर ही कामे पूर्ण करू, असे आश्वासन मतदारांना देण्यात येत आहे.