आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नागरी समस्या कळीचा मुद्दा ठरणार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर - प्रभाग नऊमध्ये नागरी सुविधांचा प्रश्न गंभीर आहे. रस्ते, पाणी व ड्रेनेज या पायाभूत सुविधा नसल्याने नागरिकांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. इच्छुक उमेदवारांकडून त्याचे भांडवल करण्यात येणार असल्याने विद्यमान नगरसेवकाची मोठी कोंडी होणार आहे. प्रभागातील एक जागा नागरिकांचा मागास प्रवर्ग, तर दुसरी जागा महिलासांठी राखीव आहे. त्यामुळे मागील निवडणुकीत अपक्ष म्हणून निवडून आलेले नगरसेवक हाजी नजीर शेख निवडणूक रिंगणातून बाहेर पडले आहेत. समाजवादी पक्षाकडून निवडून आलेले व काही दिवसांपूर्वीच राष्ट्रवादीत प्रवेश केलेले विद्यमान नगरसेवक अय्युब शेख यांनी मात्र जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. त्यांची राष्ट्रवादीची उमेदवारी निश्चित मानली जाते. राखीव जागेमुळे त्यांनी पत्नी सफिया शेख यांना निवडणूक रिंगणात उतरवले आहे. महिला राखीव जागेवर खैरुनिसा शेख यांनी राष्ट्रवादीकडून उमेदवारी मागितली आहे.

नागरिकांच्या मागास प्रवर्ग जागेसाठी समाजवादी पक्षाकडून माजी नगरसेवक मुदस्सर शेख, आबिद हुसैन व मुनाफ बागवान यांची नावे चर्चेत आहेत. राष्ट्रवादीकडून असिफ सुलतानी, काँग्रेसकडून फैयाज शेख व मनसेकडून नसीम शेख इच्छुक आहेत. शिवसेना-भाजपकडून मात्र अजून एकही नाव चर्चेत नाही. दोन्ही पक्षांकडून प्रभागात उमेदवारी देण्यात येईल की, नाही याबाबत सर्वांनाच उत्सुकता आहे. वर्षानुवष्रे प्रभागातील प्रश्न ‘जैसे थे’ आहेत. त्यामुळे विद्यमान नगरसेवक हाजी नजीर शेख व अय्युब शेख यांच्याबाबत नागरिकांमध्ये नाराजी आहे. हाजी नजीर शेख निवडणूक लढवणार नाहीत. त्यामुळे प्रभागातून नवीन चेहर्‍याला संधी मिळण्याची शक्यता आहे.

विकासकामांना प्राधान्य द्यावे
मनपा कर्मचारी, ठेकेदार व पदाधिकारी यांच्या संगनमतामुळे अनेक प्रश्न सुटलेले नाहीत. मोकाट जनावरांचा प्रश्न गंभीर आहे. वेळोवेळी तक्रार करूनही दखल घेतली जात नाही. नगरसेवकाने प्राथमिक आरोग्य केंद्र, भाजीमार्केट, समाजमंदिर यांसारख्या विकासकामांना प्राधान्य देणे गरजेचे आहे’’ सय्यद शफी, मतदार.

प्रभागातील पाणीप्रश्न गंभीर
पाण्याचा प्रश्न गंभीर आहे. मनपाकडे सक्षम यंत्रणा असतानाही केवळ कर्मचारी, नगरसेवक व पदाधिकार्‍यांच्या दुर्लक्षामुळे पाणी वितरणाचे नियोजन कोलमडले आहे. पाणीपट्टी भरूनही वेळेत व पुरेसे पाणी मिळत नाही. त्यामुळे पाणीपट्टी घेण्याचा मनपाला अधिकार नाही. नगरसेवकही त्याकडे दुर्लक्ष करतात.’’ मुश्ताक खान, मतदार

ओपनस्पेसचा प्रश्न गंभीर
घंटागाडी येत नसल्याने उघड्यावर कचरा टाकावा लागतो. ओपनस्पेस असूनही त्यांची मोठी दुरवस्था झाली आहे. ओपनस्पेसवर कचर्‍यांचे ढीग लागले आहेत. त्यामुळे आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. भावी नगरसेवकाने ओपनस्पेस विकसित करून ते नागरिकांसाठी उपलब्ध करून द्यावेत. यावेळी योग्य उमेदवारालाच मतदान करणार आहे.’’ शाहीन शेख, मतदार.