आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पळवलेले मतदार पुन्हा मूळ जागी..

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर - महापालिका निवडणुकीसाठी अंतिम प्रभागनिहाय मतदारयादी बुधवारी प्रसिध्द झाली. त्यानुसार 2 लाख 14 हजार 650 नागरिकांना मतदानाचा हक्क बजावता येणार आहे. प्रारुप यादीत अनेक प्रभागांतील मतदारांची नावे दुसर्‍या प्रभागात गेली होती. त्यामुळे या यादीबाबत 2196 हरकती आल्या होत्या. अंतिम यादीत मतदारांची नावे मूळ जागी आल्याने अनेकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.

एकूण 34 प्रभागांपैकी सर्वाधिक 8276 मतदार प्रभाग 31 मध्ये आहेत, तर सर्वात कमी 4700 मतदार प्रभाग 7 मध्ये आहेत. प्रारुप मतदारयादीबाबत अनेकांनी आक्षेप घेतला होता. काही नगरसेवकांनी बूथ लेव्हल अधिकार्‍यांना हाताशी धरून मतदार पळवले, असा आरोप नगरसेवक बाळासाहेब बोराटे यांनी केला होता. काही इच्छुक उमेदवारांनी न्यायालयाचे दरवाजे ठोठावले होते. हरकतींचे प्रमाण पाहून आयुक्त विजय कुलकर्णी यांनी संबंधित अधिकार्‍यांना खडसावले होते. प्रत्येक हरकतीची नि:पक्षपणे शहानिशा करा; अन्यथा निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार कडक कारवाई करण्याचा इशाराही त्यांनी दिला होता. त्यामुळे काही प्रभागांतून दुसर्‍या प्रभागात पळवण्यात आलेली मतदारांची नावे अंतिम मतदारयादी पुन्हा मूळ जागी आली. आलेल्या हरकतींपैकी किती निकाली काढण्यात आल्या, याबाबतची माहिती प्रशासनाने जाहीर केलेली नाही.