आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गाडे-खान यांच्यात अटीतटीचा सामना

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर - प्रभाग दहामधील एक जागा नागरिकांचा महिला मागास प्रवर्ग, तर दुसरी जागा सर्वसाधारण प्रवर्गासाठी आहे. त्यामुळे दोन्ही विद्यमान नगरसेवक संजय गाडे व समद खान यांनी सर्वसाधारण जागेसाठी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. गाडे यांनी दोन वेळा अपक्ष निवडणूक लढवून एकदा स्थायी समितीचे सभापतिपदही मिळवलेले आहे. यावेळी देखील त्यांनी अपक्ष लढण्याचा निर्णय घेतला आहे. नवीन प्रभागरचना त्यांच्या सोईची आहे. आतापर्यंत केलेल्या चांगल्या विकासकामांमुळे नागरिक पुन्हा निवडून देतील, असा त्यांना विश्वास आहे. खान यांना मात्र राष्ट्रवादीचे चिन्ह बरोबर असल्याने आपलाच विजय होणार असल्याचा विश्वास त्यांना आहे. गाडे यांच्यापेक्षा आपल्या पूर्वीच्या प्रभागात मोठी कामे मार्गी लागली आहेत, असा दावाही त्यांनी केला आहे. असे असले, तरी प्रभागात हिंदू-मुस्लिम मतदारांची संख्या मोठी आहे. त्यामुळे दोघांनाही जातीय समीकरणांचा आधार घ्यावा लागणार आहे. सुशिक्षित मतदारांची संख्याही अधिक आहे. त्यामुळे मतदार जातीय समीकरणांना कितपत महत्त्व देतात, हे वेळ आल्यावरच स्पष्ट होईल. याशिवाय भाजपचे आनंद लहामगे मनसेचे विकी सानी या इच्छुक उमेदवारांचे आव्हानही दोघांसमोर आहे.

नागरिकांचा महिला मागास प्रवर्ग जागेसाठी मात्र अनेक इच्छुकांनी जोरदार मोर्चेबांधणी केली आहे. मागील निवडणुकीत थोड्या फरकांनी पराभव पत्करावा लागलेल्या रामचंद्र दिघे (अण्णा) यांच्या सूनबाई विजया दिघे यांनी राष्ट्रवादीकडून उमेदवारी मागितली आहे. काँग्रेसकडून दीपाली देशमुख यांचे नाव चर्चेत आहे. दोन्ही जागांवर इच्छुकांची संख्या अधिक नसली, तरी ऐनवेळी अपक्षांची फौज रिंगणात उतरण्याची शक्यता आहे. शिवसेनेकडून अद्याप एकही नाव चर्चेत नाही. त्यामुळे खरी लढत गाडे व खान यांच्यात होणार आहे.

महिलांचे प्रश्न सोडवणार
आतापर्यंतच्या नगरसेवकांनी प्रभागात अनेक कामे केली असली, तरी महिलांनी पुढे येण्याची गरज आहे. महिलांचे प्रश्न एक महिलाच सोडवू शकते, हाच उद्देश समोर ठेवून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. पाणीप्रश्न, भाजीमार्केट, दवाखाना, उद्यान या कामांना प्राधान्य देणार आहे. कुटुंबातील राजकीय वातावरणाचा फायदा होईल. नागरिकांची चांगली साथ आहे.’’ दीपाली देशमुख, इच्छुक उमेदवार.

संपूर्ण कुटुंब पक्षाशी एकनिष्ठ
गेल्या 15 वर्षांपासून संपूर्ण कुटुंब राष्ट्रवादी पक्षाशी एकनिष्ठ आहे. 2003 मध्ये सासूबाई विमल दिघे निवडून आल्या होत्या. त्यांनी पाच वर्षांत अनेक विकासकामे केली. 2008 मध्ये मात्र सासरे रामचंद्र दिघे (अण्णा) यांचा थोड्या मतांनी पराभव झाला. मागील दहा वर्षांत प्रभागात अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. ते सोडवण्याठी नागरिकांच्या आग्रहास्तव निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे.’’ विजया दिघे, इच्छुक उमेदवार.

आरोग्याचा प्रश्न गंभीर
घंटागाडी नियमित येत नसल्याने उघड्यावर कचरा टाकावा लागतो. काही ठिकाणी कचराकुंड्या आहेत. परंतु त्या देखील ओव्हरफ्लो होतात. त्या खाली करण्यासाठी देखील मनपाचे कर्मचारी येत नाहीत. परिसरात नेहमी दुर्गंधी असते. त्यामुळे अनारोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. नगरसेवकांनी हा प्रश्न सोडवला पाहिजे.’’ संतोष हारेर, मतदार.

रस्त्यांची कामे झाली
प्रभागातील रस्त्यांची मोठी दुरवस्था झाली होती. रस्ते नव्हतेच असे म्हटले, तरी चालेल. परंतु आता परिस्थिती थोडी बदलली आहे. अनेक रस्त्यांची कामे मार्गी लागली असली, तरी प्रभागात उद्यानाची आवश्यकता आहे. ओपनस्पेस विकसित झाले, तर हा प्रश्नही सुटू शकेल.’’ शफीक शेख, मतदार.