आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

युतीसाठी शिवसेनेचा पुढाकार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर - युतीसाठी आम्ही पुढाकार घेतला असून भारतीय जनता पक्षाला 30 जागा देण्याची आमची तयारी आहे. युतीबाबत भाजपच्या स्थानिक पदाधिकार्‍यांशी शुक्रवारी (15 नोव्हेंबर) चर्चा करण्यात येणार आहे. तोडगा निघाला नाही, तर मुंबईत वरिष्ठ पातळीवर निर्णय घेण्यात येईल, असे शिवसेना नेते गजानन कीर्तीकर यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत सांगितले.

याप्रसंगी आमदार अनिल राठोड, महापौर शीला शिंदे, शहरप्रमुख संभाजी कदम, माजी महापौर भगवान फुलसौंदर आदी उपस्थित होते. उमेदवारांच्या गुरूवारी दिवसभर घेण्यात आलेल्या मुलाखतींबाबत माहिती देण्यासाठी पत्रकार परिषद बोलावण्यात आली होती.

कीर्तिकर म्हणाले, भाजपकडून साथ मिळत नसल्याने अखेर शिवसेनेने युतीबाबत पुढाकार घेतला. भाजप व आरपीआयच्या स्थानिक पदाधिकार्‍यांशी चर्चा करूनही निर्णय झाला नाही, तर मुंबईत दोन्ही पक्षांच्या वरिष्ठ पदाधिकार्‍यांची बैठक घेऊन युतीचा निर्णय घेतला जाईल.

भाजपला देशात मोदींचे सरकार आणायचे आहे. त्यामुळे त्यांनी महापौर पदापेक्षा मोदींच्या पंतप्रधानपदाला प्राधान्य देऊन युती करावी, असे आवाहन कीर्तिकर यांनी केले. जागावाटपाचा तिढा सोडवण्यासाठी ‘38-30’चा फॉर्म्युला मान्य केला आहे. आरपीआयला काही जागा द्याव्या लागणार आहेत. आरपीआयला सांभाळण्याचा ठेका एकट्या शिवसेनेने घेतलेला नाही, याचा विचार भाजपने केला पाहिजे, असेही कीर्तिकर म्हणाले.

शिवसेनेत कार्यकर्त्याची निष्ठा महत्त्वाची मानली जाते. त्यामुळे काँग्रेस-राष्ट्रवादीकडून आलेल्यांना उमेदवारी दिली जाणार नाही. अशा 10-12 उमेदवारांची मुलाखत घेतली असली, तरी त्यांचा विचार होणार नाही. भाजपनेही अशा उमेदवारांना स्थान देऊ नये, असे आवाहन स्थानिक पदाधिकार्‍यांना करणार आहे. इतर पक्षांप्रमाणे शिवसेनेला उमेदवार आयात करण्याची गरज नसल्याचेही कीर्तिकर यांनी सांगितले.

जोरदार शक्तिप्रदर्शन
चितळे रस्त्यावरील जिल्हा वाचनालयाच्या सभागृहात उमेदवारांच्या मुलाखती सुरू होत्या. शिवसेनेत आलेले नगरसेवक दशरथ शिंदे यांनी मोठे शक्तिप्रदर्शन केले. दिगंबर ढवण, मदन आढाव, वत्सलाबाई वाकळे, सचिन जाधव, विक्रम राठोड, अर्चना देवळालीकर, मनोज दुलम, प्रदीप परदेशी आदींनीही शक्तिप्रदर्शन केले. त्यामुळे चितळे रस्त्यावरील वाहतूक व्यवस्थेचा दिवसभर बोजवारा उडाला.

आगरकरांवर टीका
पक्षात काम करताना निष्ठा महत्त्वाची असते. शहरप्रमुख (भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष अभय आगरकर) वेडेवाकडे वागतात, पण त्यांचे आमदार-खासदार समजदार आहेत. शहरप्रमुखाने कितीही उड्या मारल्या, तरी युतीचा निर्णय वरिष्ठ पातळीवर घेऊ, स्थानिक पातळीवर एखादा ‘टिकोजीराव’ असतो याचा अनुभव मला अनेक ठिकाणी आला, अशी टीका कीर्तिकर यांनी केली.

90 उमेदवारांच्या मुलाखती
गजानन कीर्तिकर, आमदार राठोड, महापौर शिंदे, शहरप्रमुख कदम, फुलसौंदर यांच्या समितीने 15 प्रभागांतील 90 उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या. त्यात तीन मुस्लिम उमेदवारांचाही समावेश होता. शुक्रवारी मोहरममुळे मुलाखती होणार नाहीत. शनिवारी उर्वरित उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात येतील. उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी अधिकृत यादी जाहीर करण्यात येणार आहे.