आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘त्यांनी’ नगरकरांप्रमाणेच कीर्तीकरांचीही दिशाभूल केली

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर - शिवसेनेचे आमदार अनिल राठोड यांनी ज्याप्रमाणे पंचवीस वष्रे नगरकरांची दिशाभूल केली, तशी दिशाभूल त्यांनी शिवसेनेचे ज्येष्ठ नेते गजानन कीर्तीकर यांची केली आहे, अशी मार्मिक प्रतिक्रिया भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष अँड. अभय आगरकर यांनी शुक्रवारी दिली. कीर्तीकर यांनी ‘टिकोजीराव’असे संबोधून आगरकर यांच्यावर गुरुवारी टीका केली होती. त्यास प्रत्युत्तर म्हणून आगरकरांनी ही मार्मिक प्रतिक्रिया दिली आहे.

आगरकर म्हणाले, शिवसेना-भाजपची युती होणार, असे स्वत:हून जाहीर केले होते. त्याचबरोबर भाजपला पन्नास टक्के जागा द्याव्यात, अशी मागणीही केली होती. पक्षासाठी जास्त जागा मागणे यात काहीच गैर नाही. शहराच्या राजकारणात भाजपने नेहमीच समंजसपणाची भूमिका घेऊन युतीचा धर्म पाळला. परंतु राठोड यांनी हा धर्म पाळला का? याची माहिती कीर्तीकर यांनी घेतली असती, तर बरे झाले असते. महापालिका निवडणुकीत युती होऊ नये, यासाठी शिवसेनेच्या स्थानिक नेतृत्वाने राष्ट्रवादीबरोबर पडद्याआड राहून तडजोड केली, असे म्हणण्यास वाव आहे. तसे नसते तर कीर्तीकर यांची दिशाभूल करून त्यांना भाजपवर टीका करण्यास भाग पाडले नसते. महापालिकेच्या मागील निवडणुकीतही युतीची सत्ता जाण्यास शिवसेना स्थानिक नेतृत्वाच्या पडद्याआडच्या तडजोडीच कारणीभूत आहेत. जनतेने विश्वासाने युतीच्या बाजूने कौल दिला होता, मग माशी शिंकली कुठे? असा प्रश्नही आगरकर यांनी उपस्थित केला आहे. कीर्तीकरांना माहिती असूनही त्यांनी मित्रपक्षावर अशी चिखलफेक करणे योग्य नाही. भाजपने सौदेबाजीचे राजकारण केले नाही. शिवसेनेच्या स्थानिक नेतृत्वाने मात्र दिशाभूल करून स्वत:चे स्तोम माजवल्याचा आरोप त्यांनी केला.

लाल दिवा का गेला?
खासदारकीच्या निवडणुकीत शिवसेनेचे अधिकृत उमेदवार परवेझ दमानिया यांच्या पराभवाला कोण जबाबदार होते, हे नगरकरांना माहिती आहे. या प्रकरणामुळेच शिवसेनाप्रमुखांनी राठोड यांचा लाल दिवा काढून घेतला होता, हे कीर्तीकर कसे विसरतात? असा सवाल देखील आगरकर यांनी उपस्थित केला आहे.

आरोपांमुळे युतीच्या निर्णयात अडथळे
युतीबाबत शिवसेनेने पुढाकार घेतला आहे. भाजप व आरपीआयच्या स्थानिक पदाधिकार्‍यांशी याबाबत शुक्रवारी चर्चा होणार असल्याचे कीर्तीकर यांनी गुरुवारी जाहीर केले होते. परंतु कीर्तीकरांनी केलेल्या टीकेमुळेच ही बैठक होऊ शकली नाही, अशी चर्चा आहे.