आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खासदारपुत्राचे चोपडा यांच्यापुढे आव्हान

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर - खासदारपुत्र सुवेंद्र गांधी यांच्या विरोधात भारतीय जनता पक्षाचे विद्यमान नगरसेवक संजय चोपडा यांनी बंडखोरी करत दंड थोपटले आहेत. चिरंजीवासाठी खासदार दिलीप गांधी स्वत: घरोघरी प्रचार करत आहेत. चोपडा यांच्या पाठीवर शिवसेनेचे आमदार अनिल राठोड यांचा हात असला, तरी गांधी यांचे आव्हान त्यांना पेलवणार का, याकडे शहराचे लक्ष लागले आहे.

लहानपणापासून भाजपचे बाळकडू मिळालेल्या सुवेंद्र यांना नगरसेवक पदाच्या उमेदवारीसाठी मोठी प्रतीक्षा करावी लागली. वडील खासदार असूनही त्यांना पक्षाचे पद मिळाले नाही. मागील निवडणुकीत मिळालेली उमेदवारी त्यांना शिवसेना-भाजपतील वादामुळे ऐनवेळी सोडावी लागली. त्यांच्या उमेदवारीमुळे दोन्ही पक्षांतील वाद विकोपाला गेला होता. गांधी यांच्याऐवजी उमेदवारी चोपडा यांना देण्यात आली. चोपडा यांनी पाच वर्षांत प्रभागात भरीव कामे केली. परंतु या निवडणुकीत सुवेंद्र यांना उमेदवारी देण्यात आल्याने दुखावलेल्या चोपडा यांनी थेट शिवसेनेचा आधार शोधला. शिवसेनेकडून अधिकृत उमेदवारी नसली, तरी ते शिवसेनेचे उमेदवार म्हणून ओळखले जातात.

खासदार गांधी यांनी आमदार राठोड यांचे चिरंजीव विक्रम यांच्या विरोधातील मनसे उमेदवार किशोर डागवाले यांना मदत केली. त्यामुळे संतापलेल्या आमदार राठोड यांनी चोपडा यांना जवळ करत शिवसेनेचे पाठबळ दिले. अधिकृत नसले, तरी चोपडा हे शिवसेनापुरस्कृत उमेदवार असल्याचे स्पष्ट झाले आहे. सुवेंद्र गांधी व चोपडा यांच्यातील लढतीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

या लढतीमुळे खासदार गांधी व आमदार राठोड यांच्यातील शीतयुध्द चव्हाट्यावर आले आहे. चोपडा यांच्या पराभवासाठी खासदारांनी, तर सुवेंद्रच्या पराभवासाठी आमदारांनी जोर लावला आहे. यावेळी मिळालेल्या संधीचे सोने करण्यासाठी सुवेंद्र यांनी जोरदार मोर्चेबांधणी केली आहे. विद्यमान नगरसेवक असतानाही पक्षाने आपल्याला डावलून सुवेंद्र यांना उमेदवारी दिली, याचा बदला घेण्यासाठी चोपडा यांनी प्रभाग पिंजून काढला आहे