आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिवसेनेच्या विरोधात ‘पुरस्कृत’ची खेळी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर - शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या प्रभाग 13 मधील विद्यमान नगरसेवक अनिल बोरुडे यांचे वर्चस्व मोडून काढण्यासाठी मित्रपक्ष भाजपने अपक्ष उमेदवार अर्जुन बोरुडे यांना पुरस्कृत करून खेळी केली. तथापि, अनिल बोरुडे यांचे प्रभागातील भरीव काम व जनसंपर्क पाहता भाजपची ही खेळी यशस्वी होईल का, याबाबत शंका आहे.

शिवसेनेचे नगरसेवक अनिल बोरुडे यांचा पूर्वीच्या प्रभाग 27 मध्ये एकछत्री अंमल आहे. त्यांच्यामुळेच शिवसेनेचा बालेकिल्ला अशी ओळख या प्रभागाला मिळाली. या निवडणुकीत आतापर्यंत त्यांचा विजय एकतर्फी मानला जात होता. परंतु त्यांच्या विरोधात अपक्ष म्हणून निवडणूक रिंगणात उतरलेले अर्जुन बोरुडे यांना भाजपने ऐनवेळी पुरस्कृत केले. मात्र, अनिल बोरुडे यांचा आतापर्यंतचा प्रवास पाहता त्यांच्यासाठी अर्जुन बोरुडे यांचे आव्हान नगण्य आहे. अर्जुन बोरुडे यांनी नगरपालिकेत दोन वेळा नगरसेवकपद मिळवले, परंतु दरम्यानच्या काळात ते मतदारांपासून दुरावले गेले. पुढे महापालिकेत त्यांची जागा अनिल बोरुडे यांनी भरून काढली. पहिल्या पाच वर्षांतच अनिल बोरुडे यांनी प्रभागात भरीव विकासकामे करून नागरिकांचा विश्वास संपादन केला. शिवाय या काळात त्यांनी प्रभागासाठी जास्तीत जास्त वेळ दिल्याने प्रत्येक कुटुंब त्यांना घरातील सदस्य मानून हक्काने समस्या सांगते. त्यामुळे त्यांच्यासाठी ही निवडणूक सोपी झाली आहे. परंतु भाजपच्या ‘पुरस्कृत’ खेळीने त्यांच्यासमोर नवे आव्हान निर्माण झाले. त्यास ते कसे तोंड देतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

अर्जुन बोरुडे हे अनिल बोरुडे यांचे चुलते आहेत. एकाच घरातून दोन उमेदवार निवडणूक रिंगणात उतरल्याने मतदारांचा काहीसा गोंधळ उडणार आहे. अनिल बोरुडे यांच्या पाठीशी कार्यकर्त्यांसह शिवसेनेचे मोठे पाठबळ आहे. पाच वर्षांत केलेल्या कामांच्या जोरावर ते प्रचार करत आहेत. अर्जुन बोरुडे यांच्याकडे मात्र आपल्या प्रचारासाठी कोणतेही ठोस मुद्दे नाहीत. त्यामुळे ते अनिल बोरुडे यांच्या वर्चस्वाला कसे तोंड देतात, हे पहायचे.