आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आधी ‘कट्टी’, आता ‘सो’

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर - युतीमधील मतभेदांनंतर शिवसेनेचे आमदार अनिल राठोड व भारतीय जनता पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष अँड. अभय आगरकर यांनी पत्रक काढून शनिवारी नगरकरांची जाहीर माफी मागितली. स्वपक्षावर मनापासून प्रेम असल्यामुळेच मतभेद निर्माण झाले असल्याचा साक्षात्कार या दोघांना झाला.

शिवसेना-भाजपमध्ये गेल्या पंधरा दिवसांपासून धुसफूस सुरू होती. कधी जागावाटपाचा प्रश्न, कधी उमेदवारीचा गोंधळ, तर कधी पुरस्कृतांसाठी आपसातील स्पर्धा यामुळे नगरकरांची चांगलीच करमणूक झाली. आमदार राठोड यांनी तर भाजप पंच कमेटीवर गंभीर स्वरूपाचे आरोप केले होते. त्यास उत्तरे देताना भाजप पदाधिकार्‍यांच्या नाकीनव आले. मात्र, एकमेकांशिवाय पर्याय नसल्याचे पाहून दोन्ही पक्ष बॅकफूटवर गेले. युतीची सत्ता हीच जनतेची इच्छा आहे, असे स्पष्टीकरण राठोड यांनी शिवसेनेचा प्रचाराचा नारळ फोडल्यानंतर दिले होते. ‘शिवसेना आमदार राठोड बॅकफूटवर’ असे वृत्तही ‘दिव्य मराठी’ने प्रसिध्द केले होते. शनिवारी दोन्ही पक्षांनी संयुक्त माफीनामा प्रसिद्ध केल्याने हे वृत्त तंतोतंत खरे ठरले. माफीनाम्यावरून राठोड यांनी माघार घेतल्याचे स्पष्ट झाले.

भाजपने राष्ट्रवादीशी युती करून 11 जागांवर उमेदवार आयात केले आहेत. त्यामुळे या उमेदवारांशी शिवसेनेचा कोणताही संबंध राहणार नसल्याचे राठोड यांनी स्पष्ट केल्यानंतर भाजप पदाधिकार्‍यांनी त्यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी संयुक्त पत्रकार परिषदही बोलावली. परंतु पत्रकार परिषद संपताच राठोड यांनी शिवसेना आपल्या भूमिकेवर ठाम असल्याचे सांगितले. त्यामुळे भाजप नेत्यांनीही आक्रमक पवित्रा घेत पुरस्कृत उमेदवार देण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे बॅकफूटवर गेलेल्या शिवसेनेला माफीनाम्याचा साक्षात्कार झाला.