आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाडोत्री कार्यकर्त्यांचा सावेडीत भरतो बाजार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर - महापालिका निवडणुकीत प्रचारफेर्‍यांच्या माध्यमातून शक्तिप्रदर्शन घडवण्यासाठी उमेदवारांची सध्या धावपळ सुरू आहे. प्रचारफेर्‍यांसाठी लागणार्‍या भाडोत्री कार्यकर्त्यांचा बाजार सध्या सावेडीत भरतो आहे. उमेदवार आपल्या निकटवर्तीयांना तेथे पाठवून कार्यकर्ते गोळा करताना दिसत आहेत.

प्रचारासाठी उमेदवारांचा सध्या आटापीटा सुरू आहे. प्रचारफेर्‍यांना वेग आला असून प्रत्येक प्रभागात दोन ते तीनवेळा घरोघरी जाऊन भेटी घेतल्या जात आहेत. उमेदवारांना असलेली कार्यकर्त्यांची गरज ओळखून शेकडो महिला व पुरूष मुलाबाळांसह झोपडी कॅन्टीन परिसरात येऊन बसतात. एखाद्या उमेदवाराला भाडोत्री कार्यकर्ते हवे असल्यास तेथे जाऊन मुकादमांकडे आवश्यक कार्यकर्त्यांची संख्या सांगावी लागते. उमेदवाराची पत व ऐपतीनुसार कार्यकर्त्यांची रोजंदारी ठरवली जाते.

निवडणूक लढतीचे अंतिम चित्र स्पष्ट झाल्यानंतर कार्यकर्त्यांचा बाजार भरायला सुरूवात झाली. प्रारंभी प्रतिकार्यकर्ता अवघा 200 रुपये रोज दिला जात होता. मात्र, प्रचारासाठी अवघे सात दिवस उरल्याने हा भाव आता वाढला आहे. आता मुकादमच उमेदवार पाहून भाव ठरवत आहेत. सध्या प्रतिकार्यकर्ता 400 ते 500 रुपये रोज घेतला जात आहे. त्यामुळे भाडोत्री कार्यकर्त्यांना चांगले दिवस आले आहेत.

इतर कामांपेक्षा हे बरे..
एरवी रोजंदारीचे काम करताना अवघा शंभर ते दीडशे रुपये रोज मिळतो. मात्र, निवडणूक कालावधीत आमचे दैनंदिन उत्पन्न चारशे ते पाचशे रुपये झाले आहे. त्यामुळे आम्ही इतर कामे सोडून सध्यातरी निवडणूक प्रचाराचे काम करत आहोत. हे आम्हाला चांगले परवडते, असे एका भाडोत्री कार्यकर्त्याने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले.

या खर्चाचे काय ?
उमेदवाराने किती खर्च करावा, याची चौकट निवडणूक आयोगाने उमेदवारांना घालून दिली आहे. प्रत्येक उमेदवाराला तीन लाख खर्च करण्यास परवानगी आहे. दैनंदिन खर्चाचा हिशेब द्यावा लागतो. परंतु भाड्याने बोलावलेल्या कार्यकर्त्यांचा दररोजचा हिशेब कोणीही देत नाही. त्यामुळे या खर्चाचे काय, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.