आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवडणुकीत हरलो तरी मोडला नाही कणा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर - महापालिकेच्या तिसर्‍या सार्वत्रिक निवडणुकीत तब्बल 15 विद्यमान नगरसेवक पराभूत झाले. पराभवामुळे अनेकांचे राजकारण धोक्यात आले आहे. यामध्ये काही दिग्गजांचाही समावेश आहे. पण मतदारांचा कौल मोठय़ा मनाने स्वीकारत या मंडळींनी पुन्हा एकदा रिंगणात उतरायचा निर्धार केला आहे. एका पराभवाने राजकारण संपत नाही. त्यामुळे समाजकारणात सक्रिय राहून पुन्हा दंड थोपटणार असल्याचे संकेत काहींनी ‘फेसबुक’वर दिले आहेत.

आमदार अनिल राठोड यांचे पुत्र व युवा सेनेचे विक्रम राठोड यांनी महापालिकेच्या निवडणुकीत दुसर्‍यांदा आपले नशीब आजमावले, परंतु दोन्ही वेळा त्यांच्या वाट्याला अपयश आले. तरीही आपला लढावू बाणा त्यांनी सोडलेला नाही. जोपर्यंत मी जिंकत नाही तोपर्यंत लढाई संपलेली नाही, असा खणखणीत इशाराच विक्रम यांनी दिला आहे. ‘फेसबुक’वर मनोगत व्यक्त करून निवडणुकीत मतदारांनी दिलेला कौल विक्रम यांनी मान्य केला आहे. आगामी काळात समाजकार्य सुरू ठेवण्याचा निर्धारही त्यांनी व्यक्त केला.

महापालिका निवडणुकीत शिवराज्य पक्षाने प्रथमच आपले नशीब आजमावले. प्रभाग क्रमांक ‘आठ ब’मधून शिवराज्य पक्षातर्फे संगीता भोर यांना उमदेवारी देण्यात आली होती. सर्वसाधारण जागेसाठी निवडणूक लढवणार्‍या त्या एकमेव महिला उमेदवार होत्या. त्यांनाही या निवडणुकीत पराभव पत्करावा लागला. संगीता भोर यांचे पती संजीव भोर शिवराज्य पक्षाचे प्रदेश सचिव आहेत. जिजाऊ ब्रिगेड या संघटनेच्या माध्यमातून केलेल्या सामाजिक कार्याच्या बळावर भोर यांनी निवडणुकीत नशीब आजमावले होते. प्रभागातील मतदारांनी दिलेला कौल अनपेक्षित असल्याचे भोर यांचे मत आहे.

विचारांपेक्षा पैसा महत्त्वाचा!
‘शिवराज्य पक्षाने विचार व विकासाच्या मुद्दय़ावर निवडणूक लढवली. पण तुम्ही किती समाजकार्य करता, समाजासाठी किती लढता, तुमची विचारधारा काय आहे, तुम्ही किती शिकलेले आहात, यापेक्षा तुम्ही किती पैसे वाटू शकता, यावर राजकारणातील यश ठरते. त्यामुळे या निवडणुकीतून बोध घेऊन कार्यकर्त्यांनी राजकारणातील वाटचाल करावी,’ अशा आशयाचे स्टेटस अपडेट शिवराज्य पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष संजीव भोर यांनी केले आहे.

मतदारांचे मानले आभार..
माजी नगरसेवक धनंजय जाधव व संजय चोपडा, माजी विरोधी पक्षनेता विनीत पाऊलबुधे यांना निवडणुकीत पराभवाला सामोरे जावे लागले. प्रभागातील मतदारांनी आतापर्यंत सेवेची संधी दिल्याबद्दल या उमेदवारांनी मोठय़ा मनाने आभार व्यक्त केले आहेत. चोपडा व पाऊलबुधे यांनी जाहिरातीद्वारेही मतदारांना धन्यवाद दिले आहेत.

मी काही संत नाही..
‘लढता लढता हरलो तरी हरल्याची मला खंत नाही, माझा लढा सर्वसामान्य जनतेसाठी, लढाईला माझ्या अंत नाही. पुन्हा उठेन, पुन्हा लढेन, शांत बसायला मी काही संत नाही’ असे स्टेटस अपडेट युवा सेनेचे उमेदवार विक्रम राठोड यांनी केले आहे. ‘आयुष्यातली प्रत्येक लढाई मी जिंकली नाही, पण लढली जरूर आहे. आजपासून एका नव्या पर्वाची सुरुवात करुयात.’ अशा आशयाचा निर्धारही त्यांनी ‘फेसबुक’वर व्यक्त केला. इतर काही पराभूतांनीही आपल्या भावना व्यक्त केल्या.