आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काँग्रेस-राष्ट्रवादीची महापालिकेत सत्ता?

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर - महापालिकेत सत्ता स्थापन करण्यासाठी आवश्यक असलेले 35 संख्याबळ गाठण्यात अखेर काँग्रेस व राष्ट्रवादीला यश आले. दोन्ही पक्ष सोमवारी गटनोंदणी करणार आहेत. आघाडीचा सत्तास्थापनेचा मार्ग मोकळा झाल्याचे राष्ट्रवादीच्या गोटातून सांगण्यात आले. मात्र, ऐनवेळी अपक्ष कोणत्या गटात नोंदणी करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. महापौर-उपमहापौरपदाचा तिढा अजून कायम आहे. दरम्यान, सत्तास्थापनेच्या प्रयत्नांत असलेले शिवसेनेचे सर्व उमेदवार गट नोंदणीसाठी रविवारी ठाण्याहून परतले.

निकालानंतर सात दिवसांनी सत्ता कोण स्थापन करणार, याचे चित्र स्पष्ट झाले. आघाडीला सर्वाधिक 29, तर युतीला 26 जागा मिळाल्या आहेत. सत्ता स्थापण्यासाठी 4 मनसे व 9 अपक्ष उमेदवारांची भूमिका निर्णायक ठरणार आहे. परंतु आघाडीने मनसेशिवाय सत्तेचे समीकरण जुळवले. सहा अपक्षांना बरोबर घेत त्यांनी सत्ता स्थापन करण्याचा दावा केला. त्यामुळे मनसे व इतर अपक्षही राष्ट्रवादीच्या गळाला लागल्याची चर्चा आहे.

सर्वाधिक 18 जागा मिळवणार्‍या राष्ट्रवादीने सुरुवातीपासूनच सत्तास्थापनेसाठी आघाडी घेतली. प्रभाग 23 मध्ये बाळासाहेब बोराटे यांची बिनविरोध निवड करून राष्ट्रवादीने शिवसेनेला पहिला धक्का दिला. हे धक्कातंत्र त्यांनी कायम ठेवले. सर्वाधिक जागा मिळवून सत्ता स्थापन करण्यासाठी 6 अपक्षांची जुळवाजुळव करण्यातही राष्ट्रवादीनेच बाजी मारली. स्वप्निल शिंदे, कुमार वाकळे, नंदा कुलकर्णी, नसीम शेख, ख्वाजाबी कुरेशी व अनिता भोसले या अपक्षांची आघाडीला साथ मिळाली असल्याची चर्चा आहे. शिवाय आघाडीची सत्ता येणार म्हणून मनसेसह इतर अपक्षही आघाडीच्या वाटेवर असल्याचे राष्ट्रवादीच्या गोटातून सांगण्यात येते.

सत्ता स्थापन करण्यात शिवसेना-भाजपमध्ये सुरुवातीपासून उत्साह दिसत नाही. आमदार अनिल राठोड यांनी निकाल जाहीर झाल्यानंतर दोन दिवसांनी अपक्ष व मनसे उमेदवारांची जुळवाजुळव करण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी शिवसेनेच्या सर्व उमेदवारांना ठाणे येथे सहलीसाठी पाठवण्यात आले. परंतु आघाडीचे पारडे जड असल्याचे लक्षात येताच सर्व उमेदवार रविवारी शहरात परतले. शिवसेना, भाजप, काँग्रेस व राष्ट्रवादी हे चारही पक्ष सोमवारी नाशिक येथे गटनोंदणी करणार आहेत.

मनसेची झोळी पुन्हा राहणार रिकामी..
निकाल जाहीर झाल्यानंतर मनसेचे 4 उमेदवार किंगमेकर ठरतील, असे सर्वांना वाटले होते. परंतु आघाडीने अपक्षांना बरोबर घेत सत्तेचा दावा केल्याने मनसेच्या पदरी निराशा पडली. मागील निवडणुकीतही मनसेचे किशोर डागवाले व गणेश भोसले यांच्या पदरात फारसे काही पडले नव्हते. पक्षर्शेष्ठींच्या सांगण्यानुसार कोणतेही पद न घेता ते प्रथम आघाडी व नंतर युतीच्या सत्तेत सहभागी झाले होते. या वेळी त्यांना मोठय़ा अपेक्षा होत्या. परंतु आघाडीचे संख्याबळ पाहता या वेळीही त्यांचे हात रिकामेच राहतील.

आजच्या गटनोंदणीकडे कार्यकर्त्यांचे लक्ष
शिवसेना, भाजप, काँग्रेस व राष्ट्रवादी हे चारही पक्ष सोमवारी नाशिक येथे गटनोंदणी करतील. आघाडीने सत्ता स्थापण्याचा दावा केला असला तरी अपक्षांची नावे अधिकृतपणे जाहीर करण्यात न आल्याने कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम आहे. युतीचे पदाधिकारी काहीच बोलण्यास तयार नाहीत. आम्ही शिवसेनेबरोबर आहोत, असे भाजपकडून सांगण्यात येत आहे. शिवसेनेचे पदाधिकारी संख्याबळाबाबत काहीच बोलण्यास तयार नाहीत. त्यामुळे सोमवारी होणार्‍या गटनोंदणीकडे कार्यकर्त्यांसह शहराचे लक्ष लागले आहे.