आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानगर - महापालिका निवडणुकीतील आपल्या उमेदवारांच्या प्रचारावर राष्ट्रवादी-काँग्रेस आघाडीकडून 5 लाख 60 हजार 942 रुपये खर्च करण्यात आला. शिवसेनेचा खर्च अवघा 1 लाख 40 हजार 846 रुपये झाला. भारतीय जनता पक्ष, महाराष्ट्र नवनिर्माण सेना व बहुजन समाजवादी पक्ष या पक्षांनी त्यांचा अंतिम खर्च अद्याप सादर केलेला नाही.
निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार निवडणुकीत भाग घेणार्या राजकीय पक्षांनी त्यांचा अंतिम खर्च निकाल लागल्यानंतर तीन दिवसांत सादर करणे बंधनकारक आहे. त्यानुसार काँग्रेस व राष्ट्रवादीने मुदतीत त्यांचा अंतिम खर्च सादर केला आहे. शिवसेना, भारतीय नवजवान पक्ष व शिवराज्य पक्षानेही त्यांच्या अंतिम खर्चाचे विवरण सादर केले आहे.
निवडणूक आचारसंहिता लागू झाल्यानंतर 20 व्या दिवशी पहिल्या, तर 30 व्या दिवशी दुसर्या टप्प्यातील खर्च आयोगाने निर्धारित केलेल्या अधिकार्याकडे सादर करणे बंधनकारक असते. निवडणुकीत भाग घेणार्या दहापैकी एकाही राजकीय पक्षाने पहिल्या टप्प्याचा खर्च मुदतीत सादर केला नसल्याचे ‘दिव्य मराठी’ने उघडकीस आणले. त्यानंतर सर्वपक्षीयांना पत्र पाठवून महापालिका प्रशासनाने खर्च सादर करण्याबाबत कळवले होते. पहिल्या व दुसर्या टप्प्याचा खर्च मुदतीत सादर न करणार्या पन्नास टक्के पक्षांनी त्यांचा अंतिम खर्च मुदतीत सादर केला आहे.
भाजप व मनसे या पक्षांनी अद्याप त्यांचा अंतिम खर्च सादर केलेला नाही. पक्षांच्या सर्व उमेदवारांचा व पक्षाचा एकूण खर्च तीन लाखांपर्यंत असणे बंधनकारक आहे. निवडणूक विभागाकडे सादर झालेल्या खर्चाचा एकत्रित अहवाल निवडणूक आयोगाकडे पाठवण्यात येणार आहे.
अहवाल निवडणूक आयोगाकडे पाठवणार
हिशेबासाठी दोन प्रकारची जोडपत्रे आहेत. एका प्रपत्राप्रमाणे उमेदवारांनी दैनंदिन हिशेब सादर केले आहेत. पण दुसर्या प्रपत्राबरोबर एकूण हिशेब व प्रतिज्ञापत्र सादर करणे आवश्यक आहे. पण, अद्याप एकाही उमेदवाराने हिशेब सादर केलेला नाही. भाजप, मनसे व बसपा या पक्षांनी हिशेब सादर केलेला नाही. यासंदर्भात सविस्तर अहवाल लवकरच निवडणूक आयोगाला पाठवला जाईल.’’ - ए. बी. मातकर, हिशेब तपासणी पथकप्रमुख.
आम्ही हिशेब सादर केला
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ज्येष्ठ नेते वसंत लोढा व प्रवक्ते चेतन नवले यांनी पक्षाच्या खर्चाचा हिशेब वेळेत सादर केला असल्याचे ‘दिव्य मराठी’शी बोलताना स्पष्ट केले. परंतु हिशेब तपासणी पथकप्रमुखांकडून हिशेब सादर झाले नसल्याची माहिती देण्यात आली.
दोन पक्षांनी खर्च केला नाही
निवडणूक कालावधीत समाजवादी पक्ष व शिवराज्य पक्षाच्या उमेदवारांनी वैयक्तिक खर्च केला, पण पक्षाने एकही रुपया प्रचारावर खर्च केला नसल्याचा निरंक अहवाल निवडणूक विभागाला मिळाला आहे.
15 जानेवारीपर्यंत मुदत
पक्षांचा दुसर्या टप्प्यातील हिशेब सादर करण्याची मुदत यापूर्वीच संपली आहे. मात्र, उमेदवारांसाठी वैयक्तिक हिशेब सादर करण्यासाठी 15 जानेवारीपर्यंत शेवटची मुदत आहे. त्यानंतर हिशेब अधिकारी निवडणूक आयोगाला अहवाल सादर करतील.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.